ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांचे प्रशासनावर गंभीर आरोप

ठाणे :  फेरीवाल्यांवर कारवाई करण्यासाठी नेमलेल्या ठेकेदाराचे कंत्राटी कर्मचारी संभाव्य कारवाईची माहिती फेरीवाल्यांना देतात. त्याबदल्यात फेरीवाले त्यांना पैसे देतात, त्याचे पुरावेही आहेत, असा आरोप ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी सोमवारी केला.

ठाणे स्थानक आणि नौपाडय़ात काम करण्यासाठी अनेक कर्मचारी आग्रह धरतात आणि वर्षांनुवर्षे काही अधिकारी आणि कर्मचारी एकाच जागेवर ठाण मांडून का बसले आहेत, त्याची चौकशी का केली जात नाही, असे प्रश्न उपस्थित करत महापौरांनी प्रशासनावर गंभीर आरोप केले.

महापालिकेच्या माजिवाडा- मानपाडा प्रभाग समितीच्या सहायक आयुक्त कल्पिता िपपळे आणि त्यांच्या अंगरक्षकावर फेरीवाल्याने केलेल्या जीवघेणा हल्ल्याचे पडसाद सोमवारच्या सर्वसाधारण सभेत उमटले. त्याचबरोबर शहरातील बेकायदा इमारतींचा मुद्दाही उपस्थतीत झाला. ठाणे महापालिका क्षेत्रात जुने आणि स्थानिक फेरीवाले म्हणून सतत ओरड केली जाते. पण  त्यापकी २५० फेरीवाल्यांकडे वास्तव्याचा दाखला आहे. त्यामुळे उर्वरित फेरीवाले दाखले देऊ शकलेले नसून ते बाहेरचे आहेत. तसेच सहायक आयुक्त फेरीवाल्यांवर कारवाई करत नाहीत आणि त्यामुळे फेरीवाला मुद्यावरून राजकारण्यांवर टीका होते, असेही महापौर म्हणाले. फेरीवाला संघटनेचे पदाधिकारी अधिकाऱ्यांच्या दालनात काय करतात आणि त्यांच्याबरोबर वाढदिवस साजरा कसे करतात, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

सहायक आयुक्तांची बदली झाल्यानंतर ते नव्या प्रभागात कारवाई करतात. मग आधीच्या सहायक आयुक्तांना ही बांधकामे उभी राहताना दिसली नव्हती का, तसेच नऊ मजल्यांची इमारत एका दिवसात तोडून होते का? असे प्रश्न महापौरांनी  उपस्थित केले. सहायक आयुक्त सचिन बोरसे यांनी हॉटेलवर कारवाई केली आणि व्यावसायिकांना महापौरांच्या आदेशाने कारवाई केल्याचे सांगितले. माझ्या नावाचा वापर त्यांनी केला, असे ते म्हणाले.

गावठाणातील बांधकामांचा प्रश्न वेगळा आहे. त्यासाठी वेगळा निर्णय आम्ही घेणार आहोत. परंतु भूमिपुत्रांच्या नावाने गावठाणातील बेकायदा बांधकामे वाचविण्याचा प्रकार सुरू आहे. काही दिवसांपूर्वी भूमिपुत्रांचे शिष्टमंडळ माझ्याकडे आले होते, त्यावेळी बांधकाम करणाऱ्यांची माहिती त्यांच्याकडून घेतली. ते सर्व उत्तर भारतीय आहेत.                – नरेश म्हस्के, महापौर, ठाणे