ठाणे पालिकेच्या मालकीचा असलेला ‘ठाणे क्लब’ एका ठेकेदाराच्या उत्पन्नवाढीचे साधन बनले असल्याची धक्कादायक बाब उजेडात आली असून, ठाण्यातील एक बडा राजकीय नेता या क्लबचा एक नाथ असून, मुंबई पोलिसांतील एका चकमक बहाद्दर अधिकाऱ्याच्या साह्य़ानेच नागरिकांच्या लुटमारीचे हे प्रदीप लखलखत असल्याचे सांगितले जाते. शहरातील तीन हात नाक्यासारख्या मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेने ऑलिम्पिक दर्जाच्या तरणतलावासह उभारलेल्या या क्लबच्या ठेकेदाराने पालिकेचे सर्व नियम पायदळी तुडवत आपली तुंबडी भरण्याचे उद्योग चालविले आहेत. त्यासाठी या ठेकेदाराने पालिकेशी केलेला करार धाब्यावर बसवून क्लबचे वार्षिक सदस्यत्व शुल्क तब्बल पाच पटीने वाढविले आहे.
मेसर्स गणेशानंद डेव्हलपर्स हे या क्लबचे ठेकेदार असून, प्रशासनाने त्यांच्याशी केलेल्या करारानुसार या क्लबच्या सदस्यत्वाकरिता वर्षभरासाठी १८ हजार रुपये शुल्क आकारावेत असे ठरले. मात्र या ठेकेदाराने ही शुल्करचना गुंडाळून ठेवत ६० हजार रुपये वार्षिक शुल्क आकारण्यास सुरुवात केली आहे. पती-पत्नींना या क्लबचे सदस्यत्व हवे असेल तर त्यासाठी त्याने ‘उदार अंत:करणा’ने ४० हजार रुपयांची सूटही देऊ केली आहे. करारानुसार जेथे या दोघांना मिळून वार्षिक ३६ हजार रुपये शुल्क भरावे लागले असते तेथे आता ८० हजार रुपये घेतले जात आहेत. या शुल्कवाढीस महासभेची मंजुरीही घेण्यात आलेली नाही. ठाण्यातील एका बडय़ा राजकीय नेत्याचे ‘पालकत्व’ आणि मुंबई पोलीस दलातील एका ‘चकमक बहाद्दर’ अधिकाऱ्याचे अर्थपूर्ण पाठबळ यामुळेच हा ठेकेदार महासभेलाही धाब्यावर बसवू धजावला असल्याचे सांगितले जाते.
ठाणेकरांना तरण तलावासह अद्ययावत अशा सोयी-सुविधांनी सज्ज असे संकुल उपलब्ध व्हावे यासाठी पालिकेने उभारलेल्या आणि पालिकेकडेच मालकी असलेल्या या क्लबसंकुलाचा लाभ घेण्यासाठी एवढी प्रचंड रक्कम भरावी लागत असल्याने संतापलेल्या नागरिकांच्या तक्रारींचा पाऊसच आता आयुक्त संजीव जयस्वाल यांच्याकडे पडू लागला असल्याचे समजते. एरव्ही ठाणेकरांच्या हिताच्या बाता मारणारी सत्ताधारी शिवसेना याबाबत मूग गिळून का बसली आहे हा मात्र नागरिकांच्या औत्सुक्याचा विषय आहे.
दरम्यान, ठाणे महापालिकेच्या स्थावर मालमत्ता विभागाचे उपायुक्त संजय हेरवाडे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता, त्यांनी या प्रकरणाविषयी काहीही सांगण्यास आपण असमर्थ असल्याचे सांगितले. पालिकेचे माहिती व जनसंपर्क अधिकारी संदीप माळवी यांना वारंवार दूरध्वनी करूनही त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही. ‘मेसर्स गणेशानंद डेव्हलपर्स’चे गणेश वाघ यांच्याशीही मोबाइलवर संपर्क साधला. मात्र, त्यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.

तेव्हा आणि आता..
गेल्या वर्षांपर्यंत हे संकुल ‘अ‍ॅक्वॉटिक रिक्रिएशन क्लब ऑफ नायर्स’ या संस्थेच्या व्यवस्थापनामार्फत चालविण्यात येत होते. हे व्यवस्थापन तरणतलावाच्या वापरासाठी वार्षिक सात हजार ८६६ रुपयांची आकारणी सदस्यांकडून करत असे. आता व्यवस्थापन बदलले आणि या दरात मनमानी पद्धतीने वाढ करण्यात आली.