अवघ्या पाच महिन्यांत दुर्दशा झालेल्या ‘थिम पार्क’चे संवर्धन करणार; खासगी कार्यक्रमांच्या आयोजनाचाही मार्ग मोकळा

ठाणे शहराच्या जुन्या तसेच आधुनिक रूपाचे प्रतीकात्मक दर्शन घडवणाऱ्या घोडबंदर परिसरातील ‘जुने-नवे ठाणे’ उद्यानाची उद्घाटनानंतर अवघ्या पाच महिन्यांत दुर्दशा झाल्याने पालिकेने आता या उद्यानाची देखभाल ठेकेदारावर सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. देखभाल-दुरुस्तीचा खर्च करण्याच्या मोबदल्यात ठेकेदाराला उद्यानात खासगी कार्यक्रम आयोजित करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र, यातून मिळणाऱ्या उत्पन्नात पालिकेलाही काही भाग द्यावा लागणार आहे.

ठाणे शहराचे ऐतिहासिक, सांस्कृतिक, सामाजिक, भौगोलिक घडामोडी तसेच आकर्षणस्थळांची प्रतिकृती असलेले डोंगरीपाडा येथील हे उद्यान सुमारे पाच महिन्यांपूर्वी खुले करण्यात आले. १०० वर्षांपूर्वी धावलेली पहिली रेल्वेगाडी, मासुंदा तलाव, कौपिनेश्वर मंदिर, मध्यवर्ती कारागृह अशा अनेक मानबिंदूंच्या प्रतिकृती या उद्यानात पाहायला मिळतात. त्यामुळे उद्यान खुले झाल्यानंतर अल्पावधीतच तेथे भेट देण्यासाठी येणाऱ्यांची संख्या वाढली. मात्र, गेल्या पाच महिन्यांत या उद्यानाची व्यवस्थित देखभाल न घेतली गेल्याने येथे अस्वच्छता आणि घाणीचे साम्राज्य पसरले आहे. तसेच कचऱ्यामुळे उंदीर, घुशी तसेच सापांचाही उद्यानात वावर वाढला.

याबाबतचे वृत्त ‘लोकसत्ता ठाणे’ने काही दिवसांपूर्वी दिले होते. त्यानंतर पालिकेचे या उद्यानाकडे झालेले दुर्लक्ष आणि उद्यानाची दुरवस्था चव्हाटय़ावर आली. या वृत्ताची दखल घेत पालिकेच्या उद्यान विभागामार्फत वर्तकनगर प्रभाग समितीअंतर्गत जुने नवे ठाणे प्रतिकृती उद्यानाची निगा देखभाल करण्यासाठीची १४ लाख ४२ हजार रुपयांची निविदा काढण्यात आली आहे. ही निविदा पहिल्यांदाच काढण्यात आल्याचे महापालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. तसेच महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागातर्फे प्रतिकृती पार्कचे खासगी लोकसहभाग तत्त्वावर संचलन आणि परिचलन करण्याच्या कामाचे स्वारस्य अभिव्यक्ती निविदा काढण्यात आली आहे. जुने नवे ठाणे थिम पार्कमध्ये एखादा कार्यक्रम झाल्यास त्यातील अर्धा हिस्सा हा महापालिकेला द्यावा लागेल. मात्र त्यासाठी कोणत्याही प्रकारचे शुल्क हे नागरिकांकडून आकारण्यात येणार नसल्याचे महापालिकेचे कार्यकारी अभियंता मोहन कलाल यांनी सांगितले.

जुने नवे ठाणे थिम पार्कमध्ये उद्यानाची दुरवस्था झाली होती. मात्र आता उद्यानाच्या निगा आणि देखभालीसाठी निविदा काढल्यामुळे उद्यानात स्वच्छता राहील. उद्यानातील माळी काम हे मुख्य काम या निविदेद्वारे करण्यात येईल.

-केदार पाटील, प्रभारी वरिष्ठ उद्यान अधीक्षक, ठाणे महानगरपालिका