ठाणे महापालिका परिवहन उपक्रमात भाडय़ाने बस चालवण्यासाठी एकही ठेकेदार पुढे येत नसल्याने मेटाकुटीस आलेल्या महापालिका प्रशासनाने आता ठेकेदारांसाठी आखण्यात आलेल्या अटी-शर्तीमध्ये नव्याने सवलती जाहीर केल्या आहेत. यानुसार एखाद्या ठेकेदाराच्या स्वत:च्या मालकीच्या ७० बसगाडय़ा असल्या तरीही टीएमटीच्या १९० बस भाडय़ाने चालविण्याचा ठेका त्यास मिळू शकणार आहे. याशिवाय या ठेक्यासाठी व्हॅट प्रमाणपत्राची नोंदणी बंधनकारक असण्याची आधीची अटही वगळण्यात आली आहे.
केंद्र शासनाच्या जवाहरलाल राष्ट्रीय नागरी पुनरुत्थान अभियानाच्या (जेएनयूआरएम) मााध्यमातून ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात २२० बसगाडय़ा नव्याने दाखल होणार आहेत. यापैकी ३० बस या वातानुकूलित असतील, तर १९० साध्या बसगाडय़ांचा समावेश आहे. त्यापैकी १५ वातानुकूलित बस ताफ्यात नुकत्याच दाखल झाल्या आहेत.  या बस चालविण्यासाठी परिवहनकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नाही. नव्याने दाखल होणाऱ्या बसगाडय़ा चालविण्यासाठी ठेकेदार नेमावा, असा निर्णय यापूर्वीच घेण्यात आला आहे. या बस चालविण्याचे कंत्राट देण्याकरिता ठाणे परिवहन उपक्रमाने तीनदा निविदा काढल्या. त्यांना ठेकेदारांनी प्रतिसाद दिला नाही. यामुळे निविदा प्रक्रियेतील अटी व शर्तीमध्ये काही बदल करण्याचा निर्णय परिवहन प्रशासनाने घेतला आहे.
परिवहन प्रशासनाने आधीच्या २२० बस चालविण्याकरिता निविदा काढली होती. मात्र, त्यातून वातानुकूलित बसगाडय़ा वगळल्या आहेत. या बसगाडय़ा टीएमटीच्या चालकांमार्फत चालविण्यात येणार आहेत. त्यासाठी टीएमटीच्या ४० चालकांना व्होल्वो कंपनीकडून बस चालविण्याचे प्रशिक्षण देण्यात आले आहे. त्यामुळे उर्वरित १९० साध्या बसगाडय़ांकरिताच जीसीसी (ग्रॉस कॉस्ट कॉन्ट्रक्ट) पद्धतीने निविदा काढण्यात येणार आहेत. यात पूर्वीच्या निविदेपेक्षा ठेकेदारांना अटी आणि शर्तीमध्ये अनेक सवलती देऊ केल्या आहेत.

निविदेतील बदल
* पूर्वीच्या निविदेत बस खरेदी रकमेच्या जास्तीत जास्त १५ टक्के रक्कम कंत्राटदाराला भरण्याची अट होती. नव्या निविदेत ही रक्कम १० टक्के करण्यात आली आहे.
* पूर्वीच्या निविदेतील व्हॅट नोंदणी प्रमाणपत्राची अटही वगळण्यात आली आहे.  
* अनुभवाच्या अटींमध्ये स्वत:च्या मालकीच्या कमीत कमी ७० बसची अट ग्राह्य धरण्यात येणार आहे.
* सरकारी आणि निमसरकारी उपक्रमातील किमान १०० बसगाडय़ांची देखभाल आणि दुरुस्तीचा दोन वर्षांचा वा दोनशे बसगाडय़ा दुरुस्ती व देखभालीचा तीन वर्षांचा अनुभवही ग्राह्य आहे.