अंबरनाथ शहरात दोन महिन्यांपूर्वी एका दुचाकीला झालेल्या अपघातात गंभीर जखमी झालेल्या रिटा प्रसाद नामक महिलेचा काही दिवसांपूर्वी मृत्यू झाला. या मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल त्यावेळी दुचाकी चालविणारी त्यांची मुलगी प्रीतीकुमारी वकील प्रसाद (२८) हीच्यावर पोलिसांनी निष्काळजीपणे गाडी चालवून मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे. मात्र, ज्या रस्त्यांवरील खड्डय़ांमुळे हा अपघात झाला त्या रस्त्याचे ठेकेदार व रस्ता बनविणाऱ्या एमएमआडीएचे अधिकारी यांची देखील चौकशी केली जाणार आहे, अशी माहिती गुरुवारी पोलिसांनी दिली. दरम्यान, खड्डयातून वाट काढत वाहन चालविणाऱ्या मुलीला तुर्तास अटक केली जाणार नाही, असेही पोलिसांनी स्पष्ट केले.
प्रीतीकुमारी ही २६ जुलै रोजी रात्री साडेआठच्या सुमारास आपली आई रिटा यांना घेऊन दुचाकीवरून अंबरनाथ पश्मिकेडील फॉरेस्ट नाका येथून पनवेलकर ग्रीन सिटी येथे असलेल्या आपल्या घरी जाण्यास निघाली होती. मात्र जय अंबे हॉटेल परिसरात या दोघींचा अपघात झाला. यात रिटा यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व त्यामुळे त्या त्यानंतर अनेक दिवस कोमात होत्या. काही दिवसांपूर्वी त्यांचा मृत्यू झाला होता.