ठेकेदारांना वठणीवर आणण्यासाठी पालिका आयुक्तांचा निर्णय
ठाण्यातील राबोडी परिसरात पदपथ खचल्याने एका महिलेला प्राण गमवावे लागल्याच्या घटनेचे तीव्र पडसाद शहरातील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात उमटू लागताच महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी निकृष्ट कामे आणि भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे बदनाम झालेल्या बांधकाम विभागाच्या शुद्धीकरणाची मोठी मोहीम हाती घेतली आहे. महापालिकेच्या कामांसाठी एकाही कंत्राटदारास मुदतवाढ अथवा कामाचे जादा पैसे द्यायचे नाहीत, असे फर्मान त्यांनी काढले आहेत.
ठाणे कारागृहालगत महापालिकेच्या बांधकाम विभागामार्फत बांधण्यात आलेले नवे पदपथ खचल्याने खड्डयात पडून राबोडी परिसरात राहणाऱ्या एका महिलेले प्राणास मुकावे लागले. याप्रकरणी ठाणे नगर पोलीस ठाण्यात महापालिकेचे संबंधित अधिकारी, ठेकेदार आणि स्थानिक नगरसेवकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेनंतर महापालिका प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर टीका होऊ लागल्याने आयुक्तांनी स्वत:च असे प्रकार थांबवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. राबोडी येथील घटनेच्या पाश्र्वभूमीवर गुरुवारी सायंकाळी उशिरा बांधकाम विभागातील प्रमुख अभियंत्यांची एक तातडीची बैठक महापालिका मुख्यालयात आयोजित करण्यात आली होती. बांधकाम विभागाला भ्रष्टाचार आणि टक्केवारीच्या वाळवीने पोखरल्याचा आरोप खुद्द जयस्वाल यांनी या बैठकीत केल्याचे विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. गटार, पायवाटा, पदपथ यासारखी कामे पुन:पुन्हा काढली जातात आणि ठाणेकरांच्या पैशाची नासाडी केली जाते. ‘ठेकेदारांसोबत साटेलोटे करून तुम्ही करीत असलेले रॅकेट आता थांबवा, अन्यथा घरी बसायची तयारी ठेवा,’ अशा शब्दात जयस्वाल यांनी या वेळी उपस्थित अभियंत्यांना खडसावल्याचे वृत्त आहे. ‘पुढच्या वेळी अशा घटना घडल्यास मी स्वत:च अभियंत्यांविरोधात पोलिसांत तक्रार दाखल करेन,’ असा दमही आयुक्तांनी अभियंत्यांना भरल्याचे समजते.
बांधकाम विभागामार्फत एखादे काम पुन:पुन्हा काढले जात असल्याच्या तक्रारी वाढू लागल्या असून गटार, पायवाटा, पदपथ यासारखी कामे तर ठेकेदारांसाठी कुरणे बनली आहेत, असे निरीक्षण खुद्द आयुक्तांनी या बैठकीत नोंदविल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. कामे दिलेल्या मुदतीत करायची नाहीत, मुदतवाढ द्यायची, पुन्हा कामाचे पैसे वाढवून द्यायचे असले प्रकार खपवून घेतले जाणार नाहीत. तसेच एकाही कामाला यापुढे मुदतवाढ तसेच वाढीव पैसे द्यायचे नाहीत, असे आदेश जयस्वाल यांनी या वेळी दिले. प्रत्येक कामाच्या ठिकाणी फलक असायला हवेत, त्यावर हे काम कोण करतो आहे त्या ठेकेदाराचे नाव असायला हवे. कामाची मुदत, सद्य:स्थिती याचे वेळापत्रक पाळले जायला हवे. या नियमांची पायमल्ली करणाऱ्यांची यापुढे खैर नाही, असा इशाराही आयुक्तांनी या बैठकीत दिला.