|| नीरज राऊत

पर्यावरण रक्षणासाठी कृती आराखडय़ाची गरज; सरकारी यंत्रणेसह उद्योजकांची भूमिका महत्त्वाची

तारापूरमध्ये भेडसावणाऱ्या प्रदूषणाच्या समस्येवर तोडगा काढण्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक कार्यालय पालघर येथे स्थापन होणे गेल्या पाच वर्षांपासून प्रलंबित आहे. त्याचप्रमाणे तारापूर येथे असलेल्या प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या उपप्रादेशिक कार्यालयात असलेल्या उपप्रादेशिक अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी व इतर रिक्त पदांचा भरणा होणे गरजेचे आहे.

प्रदूषणकारी औद्योगिक वसाहतींमध्ये तारापूरच आघाडीवर आहे. अर्थात भविष्यात ही आघाडी मोडून काढायची असेल तर पर्यावरणाच्या रक्षणासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत आहे. तारापूर औद्योगिक परिसरात होणारे प्रदूषण नियंत्रणात आणण्यासाठी उद्योजकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरणार आहे. याकामी प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच जल, वायू, ध्वनि प्रदूषणवर ‘नियंत्रण’ पालघरमधून हवे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ या विभागांतील त्रुटी दूर करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर प्रयत्न करावे लागणार आहेत.

राष्ट्रीय हरित लवादाने प्रदूषण करणाऱ्या १०० औद्योगिक समूहाची यादी जाहीर केली आहे. त्यात तारापूर औद्योगिक वसाहतीचा पहिला क्रमांक आहे. या औद्योगिक वसाहतीच्या परिसरात असणाऱ्या सालवड, पास्थळ, पाम, टेंभी, कोलवडे, कुंभवली, सरावली, खैरेपाडा आणि बोईसर या नागरिकांना जल, वायू तसेच ध्वनिप्रदूषणाचा त्रास होत आहे. या भागांतील नागरिक प्रदूषणाच्या विळख्यात सापडले आहेत. या भागातील नागरिकांना रात्रीच्या वेळी वायू प्रदूषणामुळे श्वसनास त्रास होत आहे. रासायनिक सांडपाण्यामुळे पाणी पिण्यास अयोग्य तसेच शेतजमिनीचे नुकसान झाले आहे. येथील औद्योगिक वसाहतीमधूनच निघणाऱ्या घातक घनकचऱ्याची विल्हेवाट योग्य पद्धतीने न लागल्याने खाडी क्षेत्रातील मासेमारीवर त्याचा परिणाम झाला आहे.

सुमारे १४०० हून अधिक उद्योग असलेल्या या औद्योगिक वसाहतीमध्ये वायू व जल प्रदूषण संदर्भातील प्राथमिक चाचण्या करण्याची सुविधा उपलब्ध करून दिल्यास येथील उद्योगातून होणाऱ्या प्रदूषणावर नियंत्रण ठेवणे सोयीचे ठरणार आहे. त्याचप्रमाणे रात्रीच्या प्रसंगी सोडण्यात येणाऱ्या घातक, रासायनिक आम्लयुक्त पाण्यावर देखरेख ठेवण्यासाठी तसेच वायू प्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी कार्यालयीन कामकाजानंतर गस्त पथक कार्यशील करणे गरजेचे आहे. घातक व आम्लयुक्त रसायनांचे उत्पादन करणारे कारखान्यांचे येथे ऑनलाइन पीएच मीटरची उभारणी करणे, सेक्टरनिहाय निघणाऱ्या सांडपाण्याच्या दर्जाचे बारकाईने ऑनलाइन पद्धतीने देखरेख ठेवणे गरजेचे आहे. तारापूर येथे असलेल्या झिरो डिस्चार्ज उद्योगांमधून सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्याचा शंभर टक्के पुनर्वापर होतो का? याचा अभ्यास होणे तसेच बोअरवेल, टँकरच्या माध्यमातून पाण्याचा पुरवठा करणाऱ्या कंपन्यांचा तसेच अधिक प्रमाणात पाण्याचा वापर करणाऱ्या उद्योगांचे वॉटर ऑडिट करणे गरजेचे आहे.

त्याचप्रमाणे अनेक उद्योग कूपनलिकेचे किंवा टँकरद्वारे पाण्याचा अतिरिक्त वापर करत असून अशा उद्योगांची तपासणी करून त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यास गरजेचे आहे. अनेक उद्योगांमध्ये जलपुरवठा मोजण्यासाठी असलेले पाण्याचे मीटर सदोष असल्याने बेसुमार वापर करणाऱ्या उद्योगांना सरासरी पाण्याचे बिल दिले जात असून संपूर्ण औद्योगिक वसाहतीमधील एमआयडीसीकडून होणाऱ्या पाणीपुरवठय़ाचे ऑडिट करणे गरजेचे आहे.

तारापूरचे प्रदूषण नियंत्रण आणण्यासाठी कृती आराखडा तयार करण्यात येत असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी उद्योजक, प्रदूषण नियंत्रण मंडळ तसेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ यांच्या कृती समितीची स्थापना करून त्यांच्यामार्फत उपाययोजनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणे गरजेचे झाले आहे.

तारापूरमधील प्रदूषणाच्या समस्येबाबत कृती आराखडा तयार करण्यासाठी पालघरचे जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्या बैठकीचे आयोजन आज करण्यात आले होते. या वेळी तारापूर येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी, तारापूर येथील कारखानदारांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. या संदर्भात उद्या पालकमंत्री यांच्यासोबत मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली असून कृती आराखडा तयार करून त्याची तातडीने व प्रभावीपणे अंमलबजावणी केली जाणार असल्याचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले.

सांडपाणी प्रक्रिया केंद्राचे काय?

तारापूर येथे नव्याने उभारण्यात येणाऱ्या ५० दशलक्ष लिटर प्रति दिवस क्षमतेच्या नव्या सामुदायिक सांडपाणी प्रक्रिया केंद्राची उभारणी शासनाचे अनुदान लवकरात लवकर मंजूर करून हा प्रकल्प मार्गस्थ लावण्यासाठी शासकीय स्तरावर प्रयत्न होणे गरजेचे आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सांडपाणी वाहून नेणाऱ्या जलवाहिनी व चेंबर अनेक ठिकाणी फुटलेल्या किंवा तुंबलेल्या अवस्थेत असून त्यांची दुरुस्ती व साफसफाई होणे गरजेचे आहे. औद्योगिक वसाहतीमध्ये निर्माण होणाऱ्या सांडपाण्याला खोल समुद्रात सोडण्यासाठी समुद्रतळात टाकण्यात येणाऱ्या जलवाहिनीचे काम अपूर्णावस्थेत आहे.