21 September 2020

News Flash

वादग्रस्त नगररचनाकार पुन्हा नगरपालिकेत

नगरविकास विभागाच्या निर्णयावर आश्चर्य; बदली टाळून पुन्हा बदलापुरात

नगरविकास विभागाच्या निर्णयावर आश्चर्य; बदली टाळून पुन्हा बदलापुरात

बदलापूर : वादग्रस्त निर्णयांमुळे सातत्याने चर्चेत राहिलेले कुळगाव-बदलापूर नगरपालिकेचे तत्कालीन साहाय्यक नगररचनाकार सुदर्शन तोडणकर यांची राज्य सरकारने पुन्हा याच ठिकाणी नियुक्ती केल्याने राजकीय वर्तुळात या निर्णयाचे वेगवेगळे अर्थ काढले जाऊ लागले आहेत.

नगरपालिकेच्या २० वर्षांच्या इतिहासात तोडणकर यांनी सर्वाधिक काळ येथे नगररचनाकार हे पद उपभोगले आहे. २०१७ मध्ये त्यांची बदली झाली, मात्र प्रकृती बरी नसल्याचे कारण देत ते बदलीच्या ठिकाणी हजर झाले नव्हते. यापूर्वी तीन वेळा तब्बल १२ वर्षे तोडणकर बदलापूर नगरपालिकेतच कार्यरत आहेत. राज्यात भाजप सरकार असताना त्यांची बदली करण्यात आली होती. सरकारबदल होताच तोडणकर यांना पुन्हा बदलापूर नगरपालिकेत आणले जावे यासाठी येथील एक बडा राजकीय नेता प्रयत्नशील होता. पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास विभागाचे मंत्रिपद आहे. त्यामुळे याच काळात तोडणकर पुन्हा एकदा बदलापूर नगरपालिकेत नियुक्त झाल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

यापूर्वी तीन वेळा तोडणकर बदलापूर नगरपालिकेत सहायक नगररचनाकार म्हणून कार्यरत होते. पहिल्यांदा २००० ते २००४, नंतर  २००६ ते २०१० आणि पुढे २०१३ ते २०१७ असा १२ वर्षांचा काळ येथील नगररचना विभागावर तोडणकर यांची हुकमत राहिली आहे. २०१३ मध्ये तोडणकर यांची पनवेल पालिकेत बदली झाली. मात्र प्रकृती अस्वस्थ असल्याचे कारण देत तोडणकर यांनी पनवेल नगरपालिकेत जाण्यास नकार दिला. विशेष म्हणजे या काळात दोन वर्षे ते रजेवर गेले. ही रजा विनापरवानगी असल्याने त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेश नगररचना सहसंचालकांनी त्या वेळी दिले होते. मात्र, २०१५ मध्ये त्यांची पुन्हा बदलापूर पालिकेत प्रतिनियुक्ती करण्यात आली. २०१७ मध्ये त्यांची श्रीरामपूर नगरपालिकेत बदली करण्याचे आदेश काढण्यात आले. मात्र, या वेळीही  तोडणकर यांनी पुन्हा तब्येतीचे कारण देत तेथेही पदभार स्वीकारला नाही. याच काळात कुळगाव बदलापूर नगरपालिकेतील त्यांच्या काही निर्णयांची चौकशी सुरू झाली. तब्बल दोन वर्षे आठ महिने कोणत्याही पदभाराविना राहिलेले तोडणकर यांची सोमवारी नगरविकास विभागाने पुन्हा बदलापूर नगरपालिकेत नियुक्ती केल्याने हा निर्णय वादात सापडला आहे. बदलापुरातील एका नेत्याला कोणत्याही परिस्थितीत तोडणकर यांची नियुक्ती हवी होती. नगरविकास विभागाने हा निर्णय घेतल्याने या नियुक्तीमागील राजकीय आग्रहाची चर्चा अधिक रंगली आहे.

दरम्यान, सुदर्शन तोडणकर यांच्याशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांची प्रतिक्रिया मिळू शकली नाही. तर कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे मुख्याधिकारी दीपक पुजारी यांना याबाबत विचारले असता, कोणत्याही अधिकाऱ्याची सुरू असलेली चौकशी निष्पक्षपणे पार पाडली जाईल. प्रत्येक अधिकाऱ्याने कायद्याच्या चौकटीत राहूनच काम करणे अपेक्षित आहे. त्यामुळे चौकशीवर कोणताही परिणाम होणार नसल्याचा दावा पुजारी यांनी केला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 3:19 am

Web Title: controversial town planner is back in badlapur municipal council zws 70
Next Stories
1 कल्याण, डोंबिवलीची चिंता कायम
2 कल्याण, डोंबिवलीतील सीसीटीव्ही, सिग्नलला मुहूर्त
3 गुजरातच्या गुटख्याचा ठाण्याला फास
Just Now!
X