ठाणे पालिका आयुक्तांवर दबाव आणण्यासाठी कृत्य; दोघांवर गुन्हा दाखल

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर एका अल्पवयीन मुलीने गंभीर आरोप केल्याचे चित्रण असलेल्या चित्रफितीमागील सत्य आता उघड होऊ लागले आहे. बारवरील कारवाईमुळे दुखावल्या गेलेल्या एका बारमालकाने आयुक्तांवर मानसिक दबाव वाढवण्यासाठी ही चित्रफीत तयार केल्याची बाब तपासात समोर आली आहे. याप्रकरणी बारमालक अश्विन शेट्टी आणि त्याचा साथीदार संदीप गोंडुकुंबे या दोघांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुरुवारी आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता असून या दोघांनाही अटक करण्यात येऊ शकते, अशी माहिती पोलिसांनी दिली.

ठाणे महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यावर आरोप करण्यात आलेली ‘ती’ चित्रफीत समाज माध्यमांवर काही महिन्यांपूर्वी प्रसारित झाली होती. या चित्रफितीच्या माध्यमातून बदनामी सुरू असल्यामुळे आयुक्त जयस्वाल यांनी ठाणे पोलिसांकडे तक्रार देऊन याप्रकरणी चौकशीची मागणी केली होती. ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी हे प्रकरण ठाणे खंडणीविरोधी पथकाकडे वर्ग केले होते. या चित्रफितीवरून ठाण्यातील राजकीय वातावरण तापले असतानाच संबंधित मुलीने व तिच्या पालकांनी आयुक्तांवर करण्यात आलेले आरोप खोटे असल्याचे सांगितले होते. काही व्यक्तींनी आयुक्तांविरोधात बोलण्यास भाग पाडले, असेही त्यांनी पोलीस चौकशीत सांगितले होते.

ही चित्रफीत संदीप गोंडुकुंबे याने तयार केल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली. बारमालक अश्विन शेट्टी याच्या सांगण्यावरून ही चित्रफीत तयार करण्यात आल्याचे या चौकशीत उघड झाले. त्याआधारे या दोघांवर कासारवडवली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कारवाईचा सूड?

ठाणे शहरातील बेकायदा लेडीज बार आणि लॉजचे बांधकाम जमीनदोस्त करण्याची विशेष मोहीम वर्षभरापूर्वी महापालिका आयुक्त संजीव जयस्वाल यांनी राबविली होती. या मोहिमेमध्ये ठाण्यातील उपवन भागातील रेडबुल आणि राबोडीमधील आयना बारवर कारवाई करण्यात आली होती. या कारवाईमुळे दुखावलेला दोन्ही बारचा मालक अश्विन शेट्टी याने आयुक्त जयस्वाल यांना मानसिक त्रास देण्यासाठी ‘ती’ चित्रफीत तयार केल्याचे तपासात पुढे आले असून त्यासाठी त्याला संदीप गोंडुकुंबे याने मदत केल्याचेही समोर आले आहे. आयुक्तांवर आरोप करण्याच्या मोबदल्यात त्या मुलीला घर आणि पैसे देण्याचे आमिष शेट्टी याने दाखविल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. त्यानुसार या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती ठाणे खंडणीविरोधी पथकाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रदीप शर्मा यांनी दिली.