पाटबंधारे विभागाकडून महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळास होणाऱ्या पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आल्याने ठाणे शहराच्या पाणीपुरवठय़ावर पंधरवडय़ापासून प्रतिकूल परिणाम दिसू लागले आहेत. वागळे इस्टेट व कळवा-मुंब्रा परिसरात पाणी टंचाईच्या झळा अधिक तीव्र झाल्याने पाण्याचा वाढीव कोटा मिळावा यासाठी या भागातील लोकप्रतिनिधीही आक्रमक झाल्याचे चित्र मंगळवारी महापौर संजय मोरे यांच्या दालनातच दिसून आले. पाणी टंचाईवर उपाय शोधण्यासाठी महापौरांच्या अध्यक्षतेखाली बोलविण्यात आलेल्या बैठकीत उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी कळवाकरांना सलग ६० ते ७० तास पाण्यावाचून काढावे लागत असल्याची तक्रार करत ‘वागळे इस्टेटकडे लक्ष देता जरा कळवाकरांच्या पदरातही काही तरी पडू द्या’, असे आर्जव आयुक्त संजीव जयस्वाल यांना केले. त्यामुळे आक्रमक झालेल्या वागळे इस्टेटमधील नगरसेवकांनी कळव्याच्या पाणी वितरण व्यवस्थेसाठी २५ कोटी रुपये देऊ केल्याची आठवण करुन देत साप्ते यांनाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला.
ठाणे महापालिकेस विविध प्राधिकरणाकडून एरवी ४६० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असतो. पाटबंधारे विभागाने त्यामध्ये ३० टक्क्य़ांची कपात केल्याने हे प्रमाण दररोज ३२० दशलक्ष लिटरपर्यत खाली आले आहे. त्यामुळे शहरातील विविध भागांमध्ये तीव्र स्वरुपाची पाणी टंचाई निर्माण झाली आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून ठाणे महापालिकेस दररोज १२० दशलक्ष लिटर पाण्याचा पुरवठा होत असे. मात्र, पाटबंधारे विभागाने एमआयडीसीच्या पाणी पुरवठय़ात अतिरीक्त पाणी कपात लागू केली आहे. त्यामुळे ठाणे महापालिकेस एमआयडीसीकडून ९० दशलक्ष लिटर इतक्या प्रमाणात पाण्याचा पुरवठा होत आहे. पुर्वीपेक्षा हे प्रमाण कमी झाल्याने कळवा, मुंब्रा, दिवा आणि वागळे इस्टेट भागात तीव्र स्वरुपाची टंचाई निर्माण झाली आहे. यासाठी महापौर संजय मोरे यांनी मंगळवारी एका विशेष बैठकीचे आयोजन केले. आयुक्त संजीव जयस्वाल यांच्यासह पाणीपुरवठा विभागाचे वरिष्ठ अधिकारी बैठकीस उपस्थित होते. या बैठकीत जयस्वाल यांनी नव्या बोअरवेल खोदणे तसेच विहीरीमधील पाण्याचे शुद्धीकरण करणे यासारखे काही उपाय योजण्यात येत आहेत, अशी माहिती दिली. विहीरींमधील पाणी आंघोळीसाठी वापरता यावे यासाठी २३२ विहीरींवर पंप बसविण्याचे आदेश दिल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. एकीकडे उपायांसंबंधी चर्चा सुरु असताना उपमहापौर राजेंद्र साप्ते यांनी कळव्यात सलग ७० तास पाणी येत नसल्याची व्यथा मांडली. त्यामुळे तातडीने खर्च करुन हे प्रमाण कमी करण्याची विनंती त्यांनी आयुक्तांना केली. त्यावर आक्रमक झालेल्या वागळे इस्टेट भागातील नगरसेवकांनी कळव्यासाठी २५ कोटी रुपयांचा निधी देण्यात आल्याची आठवण साप्ते यांना करून दिली.