सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुकांना पालिकेचा मज्जाव; ठाणे पोलिसांचाही मोठा फौजफाटा रस्त्यावर

ठाणे : नववर्ष स्वागताच्या निमित्ताने पहाटेपर्यंत रंगणाऱ्या मेजवान्या, सोहळे, समारंभ यांतून करोनाचा फैलाव मोठय़ा प्रमाणात होण्याची शक्यता लक्षात घेऊन ठाणे महापालिका आणि पोलिसांनी ३१ डिसेंबरसाठीचे निर्बंध अधिक कडक केले आहेत. राज्य सरकारच्या मार्गदर्शक सूचनांनुसार नियमावली जारी करत महापालिकेने सार्वजनिक कार्यक्रम, मिरवणुका यांवर बंदी घातली आहे, तर पोलिसांनीही शहरातील तसेच शहराच्या हद्दीवरील उपाहारगृहे, बार, ढाबे यांची अचानक तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे. ३१ डिसेंबर रोजी सायंकाळपासूनच ठाण्यातील सर्व रस्त्यांवर पोलीस नाकाबंदी करणार असून महत्त्वाच्या रस्त्यांवरील उड्डाणपुलांवरील वाहतूकही या काळात बंद ठेवण्यात येणार आहे.

दरवर्षी ३१ डिसेंबर रोजी नववर्ष स्वागतानिमित्त रंगणाऱ्या पाटर्य़ा, मेजवान्या, सोहळे यांत नियमभंग होऊ नये, तसेच मद्यप्राशन करून वाहन चालवू नये, याकरिता पोलिसांची फौज तैनात करण्यात येते. मात्र, यंदा त्यासोबतच करोना फैलाव रोखण्यासाठीही पोलीस कडक पवित्रा घेणार आहेत. राज्य सरकारने रात्री ११ ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केली असल्याने त्याची काटेकोर अंमलबजावणी ३१ डिसेंबरच्या रात्री करण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील सर्व महत्त्वाच्या ठिकाणी पाच हजारांहून अधिक पोलिसांची फौज नाकाबंदी तसेच गस्त घालणार आहे. येऊर, उपवन, कोलशेत खाडी येथे ३१ डिसेंबरच्या मध्यरात्री मोठय़ा प्रमाणात नागरिकांची गर्दी होत असते. नागरिकांनी या भागात गर्दी करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. तसेच मध्यरात्री महामार्गालगत असलेले ढाबे, उपाहारगृहे आणि इतर आस्थापने सुरू राहणार नाही. याकडे पोलिसांची नजर असणार आहे. त्यासोबतच मद्याचा परवाना नसलेल्यांना मद्य पुरवू नये अशा सूचनाही मद्य दुकानदारांना आणि बार मालकांना पोलिसांनी दिल्या आहेत. गृह संकुलाच्या गच्चीवर किंवा आवारात रात्री पाटर्य़ाचे आयोजन करू नये असे आवाहन पोलिसांनी केले आहे. अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.

पालिकेची नियमावली

’ नववर्ष स्वागतासाठी नागरिकांनी घराबाहेर पडू नये, नववर्षांचे स्वागत घरातूनच साधेपणाने करावे.

’ ३१ डिसेंबरच्या दिवशी समुद्रकिनारे, बाग, रस्ते अशा सार्वजनिक ठिकाणी मोठय़ा संख्याने गर्दी करू नका आणि मुखपट्टीसह सॅनिटायझरचा वापर करावा. ६० वर्षे आणि १० वर्षांखालील मुलांनी सुरक्षिततेच्या आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून शक्यतो घराबाहेर जाणे टाळावे.

’  नववर्ष स्वागताच्या निमित्ताने कोणत्याही प्रकारचे धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करू नये आणि मिरवणुका काढू नये.

’ नववर्षांच्या पहिल्या दिवशी अनेक जण धार्मिक स्थळी जातात. या ठिकाणी नागरिकांनी एकाच वेळी गर्दी न करता सामाजिक अंतराच्या नियमाचे पालन करावे.

’ फटाक्यांची आतषबाजी आणि ध्वनिप्रदूषण करू नये.

आदेशाचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर आपत्ती व्यवस्थापन अधिनियम आणि साथरोग नियंत्रण अधिनियमानुसार कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे.

पोलिसांचा फौजफाटा

ठाणे पोलीस आयुक्तालयातील हद्दीतील सर्व पोलीस उपायुक्त, १७ साहाय्यक पोलीस आयुक्त, १२८ पोलीस निरीक्षक, १५० साहाय्यक पोलीस निरीक्षक आणि उपनिरीक्षक, ४ हजार ४५० पोलीस अंमलदार यांच्यासह तीन राज्य राखीव दलाच्या तुकडय़ा, दोन दंगल नियंत्रण पथके तसेच ३०० गृहरक्षक, तसेच १२०० वाहतूक पोलीस असा ५ हजारहून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात असणार आहे.

३१ डिसेंबरला उड्डाणपूल बंद

३१ डिसेंबरच्या पार्श्वभूमीवर ठाण्यात नाकाबंदी करण्यात येणार आहे. या काळात मद्यपी वाहनचालक उड्डाणपुलाचा वापर करून पसार होऊ नये म्हणून ३१ डिसेंबरच्या रात्री ११ नंतर ठाण्यातील पूर्व द्रुतगती मार्गावरील नितीन कंपनी तसेच घोडबंदर येथील काही उड्डाणपुलांवरील वाहतूक पोलिसांकडून बंद करण्यात येणार आहे. त्याऐवजी वाहनचालकांना त्यांची वाहने खालील रस्त्यांवरून चालवावी लागणार आहेत. रात्री अवजड वाहनांची वाहतूक मोठय़ा प्रमाणात होत असते. घोडबंदर आणि पूर्व द्रुतगती मार्गावर मेट्रोचे काम सुरू असल्याने रस्ते अरुंद झाले आहेत. उड्डाणपूल बंद झाल्यास  वाहतूक कोंडीची शक्यता आहे.

४१५ मद्यपी चालकांवर कारवाई (२५ ते २८ डिसेंबर)