News Flash

करोना कराल : पालिका पास की नापास? ठाणे पालिका – एक रुग्णालय ते जागोजागी केंद्रे

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाला. त्या वेळेस करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे एकमेव रुग्णालय होते.

जिल्ह्य़ात करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर हे रुग्णालय उपचारासाठी अपुरे पडू लागले. त्यामुळे महापालिकांनी त्यांच्या हद्दीतील काही मोठी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन ती कोविड रुग्णालये म्हणून घोषित केली.

करोनासारखी महासाथ शतकातून एकदा येणारी. अशा साथींना तोंड देण्यासाठी प्रशासकीय यंत्रणांकडे योजना तयार असेल, अशी अपेक्षा करणे चुकीचेच. त्यामुळेच महामुंबई क्षेत्रात जेव्हा करोनाचा शिरकाव होऊ लागला तेव्हा या स्थानिक स्वराज्य संस्थांसमोर असंख्य प्रश्न उभे ठाकले. टाळेबंदीची कठोर अंमलबजावणी असो की जीवनावश्यक वस्तूंचा व्यवस्थित पुरवठा असो, करोना रुग्ण आढळणाऱ्या वस्त्या, वसाहतींतील र्निजतुकीकरण असो की प्रतिबंधित क्षेत्रे जाहीर करणे असो यातील प्रत्येक गोष्ट पालिकांतील कर्मचारीवर्गासाठी नवीन होती.  याहीपलीकडे वाढत्या रुग्णसंख्येला पुरेशा ठरतील, अशा उपचार सुविधा निर्माण करणे, रुग्णालये, करोना केंद्रे तयार करणे किंवा चाचण्या वाढवण्यासाठी शहरांतर्गत प्रयोगशाळा उभारणे अशी एक ना अनेक आव्हानात्मक कामे गेल्या वर्षभरात स्थानिक स्वराज्य संस्थांना करावी लागली. यात त्यांना कितपत यश आले हे फेब्रुवारीपर्यंत घटत चाललेली करोना रुग्णसंख्या दाखवू शकेल किंवा त्या अपयशी ठरताहेत का, हे सध्याची रुग्णवाढ सांगू शकेल. पण गेले वर्षभर सर्वच पालिकांच्या यंत्रणा ज्या पद्धतीने सक्रिय राहिल्या, त्याची वर्षभरानंतर दखल घ्यावीच लागेल.

लोकसत्ता ठाणे

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या वर्षी मार्च महिन्यात करोनाचा शिरकाव झाला. त्या वेळेस करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय हे एकमेव रुग्णालय होते. जिल्ह्य़ात करोनाचा संसर्ग वाढू लागल्यानंतर हे रुग्णालय उपचारासाठी अपुरे पडू लागले. त्यामुळे महापालिकांनी त्यांच्या हद्दीतील काही मोठी खासगी रुग्णालये ताब्यात घेऊन ती कोविड रुग्णालये म्हणून घोषित केली. या रुग्णालयांमध्ये रुग्णांकडून अवाजवी देयके आकारण्यात येत असल्याच्या तक्रारी पुढे आल्या होत्या. तसेच या रुग्णालयांमध्ये सर्वसामान्यांना उपचार घेणे परवडत नव्हते. या पाश्र्वभूमीवर महापालिकांनी एमएमआरडीए, सिडको आणि म्हाडाच्या माध्यमांतून एक हजार ते पाचशे खाटांची कोविड रुग्णालये उभारली. याशिवाय विलगीकरण कक्षांची उभारणी केली होती. तर काही ठिकाणी कोविड रुग्णालये उभारणीची कामे सुरू होती. मात्र, गेल्या चार महिन्यांत करोनाचा संसर्ग कमी झाला आणि शासनाच्या नियमावलीनुसार अनेक जण घरीच उपचार घेऊ लागले. त्यामुळे रुग्णालयात फारसे रुग्ण उपचारासाठी येत नसल्यामुळे काही खासगी रुग्णालयांनी कोविड रुग्णालयांची मान्यता रद्द करण्याची मागणी केली होती. त्यानुसार पालिकांनी काही रुग्णालयांची कोविड मान्यता रद्द केल्याने तिथे इतर रुग्णांवर उपचार सुरू झाले. पालिकेची काही रुग्णालये आणि विलगीकरण कक्षही पालिकांनी बंद केले होते. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्या वाढल्यानंतर पालिकांनी बंद केलेली रुग्णालये आणि विलगीकरण कक्ष पुन्हा सुरू केली आहेत.

‘एमएमआरडीए’, म्हाडाच्या माध्यमातून रुग्णालये

गेल्या वर्षी ठाणे महापालिका क्षेत्रात एमएमआरडीएच्या माध्यमातून साकेत परिसरात एक हजार खाटांचे ग्लोबल कोविड रुग्णालय, म्हाडाच्या माध्यमातून मुंब्रा भागात ४१० आणि कळवा भागात ४०० असे ८१० खाटांचे कोविड रुग्णालय, वागळे इस्टेटमधील बुश कंपनीत ४९० खाटांचे रुग्णालय उभारले होते. तर पूर्व द्रुतगती महामार्गालगतच्या वाहनतळामध्ये एक हजार खाटांचे आणि पोखरण भागातील व्होल्टास कंपनीतही कोविड रुग्णालय उभारणीचे काम सुरू केले होते. याशिवाय, भाईंदरपाडा येथील लोढा इमारतीसह शहरातील शाळा आणि सभागृहांमध्ये विलगीकरण कक्षाची सुविधा सुरू केली होती. मात्र, रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे यापैकी केवळ ग्लोबल रुग्णालय आणि काही खासगी रुग्णालये सुरू ठेवण्यात आली होती. तर उर्वरित सर्व रुग्णालये आणि विलगीकरण कक्ष बंद केले होते. मात्र, आता रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर घोडबंदरचा विलगीकरण कक्ष सुरू केला असून त्याचबरोबरच वाहनतळ इमारतीतील रुग्णालये सुरू करण्यासाठी पालिकेने हालचाली सुरू केल्या आहेत. त्याचबरोबर रुग्णाच्या संसर्गात आलेल्यांचे विलगीकरण, ताप तपासणी आणि करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर दिला आहे.

कल्याण-डोंबिवली पालिका – २५ खासगी करोना रुग्णालये

कल्याण-डोंबिवली पालिका हद्दीत करोनाचे रुग्ण वाढू लागताच प्रशासनाने पालिकेच्या नियंत्रणाखाली रुक्मिणीबाई, शास्त्रीनगर रुग्णालये अद्ययावत केली. या रुग्णालयांची करोना रुग्ण सामावून घेण्याची क्षमता १०० ते २०० होती. रुग्णवाढ झाल्यावर प्रशासनासमोर मोठे संकट उभे राहू शकते म्हणून पालिकेने खासगी तज्ज्ञ डॉक्टर, वैद्यकीय संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेऊन सुरुवातीला कल्याणमधील एक, डोंबिवलीतील दोन खासगी रुग्णालये ताब्यात घेतली. तोपर्यंत भिवंडीजवळील टाटा आमंत्रा येथे करोना काळजी केंद्र सुरू झाले होते. मे, जूननंतर करोना रुग्ण वाढू लागले. अतिगंभीर रुग्णांची संख्या वाढू लागली. त्यामुळे प्रशासनाने शासन आदेशानुसार खासगी रुग्णालयांना करोना रुग्णालये सुरू करण्यास मुभा दिली. अशा प्रकारची २५ खासगी करोना रुग्णालये पालिका हद्दीत सुरू झाली. पाच ते सहा हजार खाटा या रुग्णालयांच्या माध्यमातून पालिकेला उपलब्ध झाल्या. एक हजाराहून अधिक दक्षता विभाग उपलब्ध झाले. उपलब्ध रुग्णालये कमी पडू लागली म्हणून खासगी रुग्णालयांमधील ५० टक्क्यांहून अधिक खाटा प्रशासनाने अधिग्रहित केल्या.भिवंडीे पालिका – मुंबईनंतर भिवंडीत प्रतिजन चाचणी सुरू

भिवंडी शहरात सुरुवातीपासूनच करोनाची परिस्थिती आटोक्यात असल्याचे चित्र आहे. परंतु सुरुवातीला अत्यंत दाटीवाटीची लोकसंख्या असलेल्या भिवंडी शहरात करोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भीती निर्माण झाली होती. शहरात नागरिक रस्त्यावर विनामुखपट्टी फिरत होते. त्यामुळे स्थिती गंभीर होती. त्यामुळे मालेगाव येथील करोनाचा संसर्ग आटोक्यात आणण्याचा अनुभव असलेल्या डॉ. पंकज आशिया यांनी जून महिन्यात भिवंडी महापालिकेचा पदभार स्वीकारला. त्यांनी शहरात करोना रोखण्यासाठी विविध उपाययोजना केल्या. सुरुवातीला आशासेविका, शिक्षिका यांच्यामार्फत घरोघरी जाऊन करोनाचे रुग्ण शोधण्याचे काम सुरू होते. मात्र, त्याला नागरिकांकडून प्रतिसाद मिळत नव्हता. त्यामुळे प्रशासनाने येथील धर्मगुरू आणि काही समाजसेवकांची मदत घेतली. या धर्मगुरूंनी नागरिकांना आरोग्य केंद्रात तपासणीसाठी येण्याचे आवाहन केले. त्यानंतर सर्व प्रभाग समिती हद्दीत प्रत्येकी एक ते दोन मोहल्ला दवाखाने सुरू केले. या ठिकाणी नागरिक तपासणीसाठी येऊ लागले. त्यामुळे रुग्ण शोधणेही पालिकेला शक्य झाले. पालिकेने मुंबईनंतर सर्वप्रथम प्रतिजन चाचणी सुरू केली. तसेच करोना रुग्णांना रुग्णवाहिका आणि खाटा उपलब्ध केल्या.

उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर क्षेत्र – एमएमआरडीएतील सर्वाधिक सुविधांचे केंद्र अंबरनाथमध्ये

करोनाचा सामना करण्यासाठी अंबरनाथ नगरपालिकेला स्वत:चे कोविड रुग्णालय उभारण्यासाठी थोडा उशीर लागला होता. मात्र अंबरनाथ पश्चिमेतील चिखलोली भागात असलेले कोविड काळजी केंद्र आणि आरोग्य केंद्र मुंबई महानगर प्रदेशात सर्वाधिक सुविधा असलेले केंद्र होते. शहरात ३० हून अधिक प्रभागांमध्ये तापाची रुग्णालये उभारली होती. तहसील प्रशासनाने कामगार आणि गरिबांसाठी या काळात स्वयंपाकगृहही चालविले. रुग्णांसाठी पालिकेची सुपर ३० पथकेही तैनात करण्यात आली होती. खासगी रुग्णालयांच्या मदतीने पालिकेने रुग्णांची शहरातच व्यवस्था केली होती. बदलापूर नगरपालिका क्षेत्रात सर्वप्रथम सोनिवली येथील बीएसयूपी येथे विलगीकरण, कोविड काळजी केंद्र उभारले गेले. सुरुवातीला गंभीर रुग्णांसाठी खासगी रुग्णालयांशिवाय पर्याय नव्हता. ऑक्टोबर महिन्यात नगरपालिका संचालित राज्यातील पहिले अतिदक्षता विभाग आणि २५० खाटांचे रुग्णालय बदलापूर पालिकेने गौरी सभागृहात सुरू केले. या काळात चार ठिकाणी तापाचे दवाखाने सुरू करण्यात आले होते. डिसेंबर महिन्यापासून शहरात प्रयोगशाळाही सुरू करण्यात आली. राज्य शासनाच्या मदतीने दोन्ही शहरांना रुग्णवाहिका देण्यात आल्या होत्या. स्वच्छता, र्निजतुकीकरणासाठी स्वतंत्र यंत्रणा उभारण्यात आली होती. उल्हासनगर शहरात कामगार रुग्णालय, प्रसूती रुग्णालय, रेड क्रॉस रुग्णालय या ठिकाणी पालिकेने कोविड रुग्णांसाठी उपचार सुरू केले होते. आरोग्य केंद्रांमध्ये तापाचे दवाखाने सुरू होते. समन्वयासाठी स्वतंत्र पथक काम करीत होते. रुग्णसंख्या कमी झाली असली तरी ही केंद्रे सुरूच होती. शहरात साई प्लॅटिनम रुग्णालयात सुरुवातीला अनेक रुग्णांवर उपचार केले. पालिकेने या काळात स्वत:ची प्रयोगशाळाही उभारली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 12, 2021 2:40 am

Web Title: corona caral thane kdmc ulhasnagr bhiwandi corona timeline dd 70
टॅग : Coronavirus
Next Stories
1 निर्यातदारांकडून मच्छीमारांची लूट
2 वाढीव वीज देयकाच्या दोन लाख तक्रारी
3 बॅँक, टपाल कार्यालयांची ‘आधार’कडे पाठ
Just Now!
X