14 August 2020

News Flash

ठाण्यात करोना मृतांच्या आकडय़ांचा घोळ?

भाजपच्या आरोपामुळे प्रशासनाभोवती संशयाचे धुके

संग्रहित छायाचित्र

ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत ५८९ नागरिकांचा करोनामुळे मृत्यू झाल्याचे प्रशासनाने जाहीर केले असले तरी जवाहरबाग स्मशानभूमीत मात्र आतापर्यंत करोना संसर्गाने मृत झालेल्या १०२२ नागरिकांवर अंत्यसंस्कार करण्यात आल्याचा गंभीर आरोप भाजपने केला आहे. तसेच राज्य आणि महापालिकेकडून जाहीर होणाऱ्या करोना रुग्ण आणि मृतांच्या आकडेवारीत तफावत असल्याचाही आरोप करत भाजपने या सर्व प्रकरणांची चौकशी करण्याची मागणी आयुक्तांकडे केली आहे. या आरोपांमुळे महापालिका प्रशासनाभोवती पु्न्हा एकदा संशयाचे धुके दाट झाले. मात्र प्रशासनाने हे सर्व आरोप फेटाळून लावत वाढीव आकडेवारीचे स्पष्टीकरण दिले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रातील करोनाबाधित रुग्ण आणि मृतांचा आकडा प्रशासनाकडून दररोज जाहीर करण्यात येतो. मात्र या आकडय़ांमध्ये लपवाछपवी केली जात असल्याचा आरोप भाजपकडून काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. त्या वेळेस प्रशासनाने मात्र हे सर्व आरोप फेटाळून लावले होते. असे असतानाच भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक नारायण पवार यांनी पुन्हा अशाचप्रकारचे गंभीर आरोप केले आहेत. ठाणे महापालिका क्षेत्रात आतापर्यंत १७ हजार ६० नागरिकांना करोनाचा संसर्ग झाला आहे. त्यापैकी १२ हजार ५१५ नागरिक उपचार घेऊन घरी परतले आहेत, तर ५ हजार ४५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ५८९ जणांचा मृत्यू झाला आहे, असे महापालिका प्रशासनाने २८ जुलै रोजीच्या प्रसिद्धीपत्रकात स्पष्ट केले आहे. मात्र, कोविड रुग्णालयातून जवाहरबाग स्मशानभुमीमध्ये २० मार्च ते २८ जुलै या कालावधीत १०२२ मृतदेह आल्याची नोंद आहे. याशिवाय, मुस्लीमधर्मीयांची संख्या वेगळी असल्याचे समजते, असा गंभीर आरोप पवार यांनी केला आहे. राज्य सरकार आणि महापालिकेकडून जाहीर केल्या जाणाऱ्या करोना मृतांची संख्या तसेच एकूण रुग्णांच्या संख्येत तफावत कायम असून याबाबत गेल्या चार महिन्यांत प्रशासनाने स्पष्टीकरण दिलेले नाही. सद्य:स्थितीत राज्य सरकारकडून मृतांची संख्या ६८१ जाहीर करण्यात आली. तर महापालिकेकडून ५८९ जणांचा मृत्यू झाल्याचे म्हटले आहे, असेही त्यांनी म्हटले आहे. या संदर्भात चौकशी करण्याची मागणी त्यांनी आयुक्तांकडे केली आहे.

जवाहरबाग स्मशानभूमीमध्ये करोनाबाधित तसेच करोना संशयित मृतांची नोंद केली जात असून यामुळेच ही आकडेवारी जास्त दिसून येत आहे. प्रत्यक्षात मात्र शहरात ५८९ इतकेच कोविड मृत्यू झाले असून हीच आकडेवारी राज्य शासनाला दिली आहे. त्यामुळे जे आरोप करण्यात आले आहेत, तशी वस्तुस्थिती नाही. त्यामुळे राज्य शासन आणि महापालिकेची वेगळी यादी असा काहीच प्रकार नाही.

– संदीप माळवी, उपायुक्त, ठाणे महापालिका

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2020 12:05 am

Web Title: corona death toll rises in thane abn 97
टॅग Coronavirus
Next Stories
1 करोना रुग्णांचा २० हजारांचा टप्पा पार
2 Coronavirus : ग्रामीण भागात करोनावाढ
3 उल्हास नदीची पूररेषा निश्चित
Just Now!
X