एक हजार नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था

बदलापूर: करोना संसर्गामुळे सर्वत्र संचारबंदी असल्याने अनेक कामगार, स्थलांतरित कामगार, बेघर अशांच्या दोन वेळच्या जेवणाची अडचणी झाली आहे. त्यावर उपाय म्हणून बदलापुरात शिवसेना शहर शाखेच्या माध्यमातून बदलापूर पश्चिमेतील रेल्वे स्थानकाशेजारी दररोज एक हजार नागरिकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे. त्या त्या भागातील नागरिकांना त्यांच्या घरी जाऊन जेवण देण्यात येते आहे. अशा सर्वांना दोन वेळचे जेवण देण्यासाठी बदलापूर शहर शाखेच्या वतीने शिव भोजन कक्षाची सुरूवात करण्यात आली आहे. भाजप आमदार किसन कथोरे यांच्या उपस्थितीत शनिवारी या कक्षाची सुरुवात करण्यात आली. या शिवभोजन कक्षाच्या माध्यमातून कामगार, मजूर वर्ग राहतो त्या ठिकाणी घरपोच जेवणाची सुविधाही देण्यात येते असल्याची माहिती शिवसेना शहरप्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे. याठिकाणी दररोज एक हजार लोकांच्या जेवणाची व्यवस्था करण्यात आली असून येत्या १५ एप्रिलपर्यंत ही सेवा सुरू राहणार असल्याचेही म्हात्रे यांनी स्पष्ट केले आहे. तसेच वेळ पडल्यास १५ एप्रिलनंतरही ही सेवा सुरू ठेवली जाईल, असे ते म्हणाले.

महावितरणही सज्ज

कल्याण : करोना संसर्गामुळे बहुतांश नागरिक घरात बसले असताना वीजपुरवठा खंडित होऊन त्यांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर महावितरणच्या कल्याण परिमंडळातील भागांचा वीजपुरवठा अखंडित रहावा, यासाठी महावितरणचे दोन हजार अभियंते, वायरमन आणि इतर साहाय्यक कर्मचारी तैनात करण्यात आले असल्याचे वीज मंडळाकडून सांगण्यात आले. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देत महावितरण अभियंते, कर्मचाऱ्यांनी आपल्या कार्यालय परिसरात रक्तदान शिबीर आयोजित केली आहेत. या शिबीरांना कर्मचाऱ्यांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. संकलित रक्त मान्यताप्राप्त रक्तपेढीत जमा केले जात

रक्तदानासाठी आवाहन

ठाणे – करोनाच्या पार्श्वभूमीवर रक्त संकलन घटू नये यासाठी भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांच्यामार्फत गृह संकुलातच रक्तदानाची सुविधा करून देण्यात येणार आहे. गृहसंकुलातील २५ टक्के सदस्य रक्तदान करण्यास तयार झाल्यास संकुलामध्ये शिबीर भरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.करोना विषाणूचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशात टाळेबंद जाहीर केला आहे. त्यातच राज्यातील रक्तपेढय़ांमध्ये रक्तपुरवठा कमी झालेला आहे. येत्या काळात हा रक्त पुरवठा कमी पडू नये यासाठी आमदार अ‍ॅड. निरंजन डावखरे यांच्यावतीने शहरातील गृहसंकुलांमध्ये रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे. संकुलातील २५ सदस्य रक्तदानासाठी तयार असल्यास हे रक्तदान शिबीर आयोजित करण्यात येईल. अधिक माहितीसाठी ९०८२७६२३३२ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

कल्याण, डोंबिवलीत रक्तदानाचे उपक्रम

कल्याण- महाराष्ट्र शासनाने खासगी संस्थांना रक्तदान शिबीर आयोजित करण्याचे सूचित केल्याने कल्याण, डोंबिवलीतील अनेक संस्थांनी शहराच्या विविध भागात रक्तदान शिबीरांचे आयोजन केले आहे. परिसरातील रक्तपेढय़ांमध्ये करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर हे रक्त पेढय़ांमध्ये संकलित केले जाणार आहे. कल्याणमध्ये राष्ट्र पार्टीचे राहुल काटकर, स्काय रिचर्र संस्थेचे ओम, के. सी. प्रवीण यांनी रक्तदान शिबारीचे आयोजन केले होते.  संकल्प रक्तपेढी आणि पालिका प्रशासन यांचे या उपक्रमास सहकार्य लाभले. डोंबिवतील आश्रय संस्थेचे डॉ. अरूण पाटील यांनी तरुणांना रक्तदान करण्याचे आवाहन केले आहे.

पोलिसांकडून धान्यवाटप

डोंबिवली: करोना विषाणूच्या भीतीने सर्वत्र टाळेबंदीमुळे हातावर पोट असलेल्या मजुरांची उपासमार होत आहे. अशा कामगारांच्या कुटुंबीयांना दिलासा म्हणून विष्णूनगर पोलिसांनी सुमारे साठ किलो तांदळाचे डोंबिवली पश्चिमेकडील परिसरातील रहिवाशांत वाटप केले. या अंतर्गत प्रत्येक कुटुंबाला तीन ते चार किलो तांदूळ पुरवण्यात आले. म्डोंबिवली पश्चिमेत विष्णुनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गोपीनाथ चौक जगदंबा माता मंदिर परिसरात हा कार्यक्रम करण्यात आला. पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मुणगेकर, या भागातील सामाजिक कार्यकर्ते बाळा म्हात्रे, विष्णुनगर पोलीस ठाण्यातील कर्मचारी प्रदीप सावंत, गुरुनाथ जरग, नीलेश पाटील, संपत जाधव यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम करण्यात आला.

बाजार समितीत नियंत्रण कक्ष

ठाणे – वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजीपाला आणि धान्याची आवक-जावक सुरळीत राहाण्यासाठी  कोकण विभागीय आयुक्तांनी आठ अधिकाऱ्यांचा नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाल्याच्या आणि धान्याच्या गाडय़ांची वाहतूक सुरळीत ठेवण्याची जबाबदारीही या नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांवर सोपवण्यात आली असून या कक्षामुळे ठाणे, नवी मुंबई, पनवेल शराहात पुरेशा प्रमाणात भाजीपाला उपलब्ध होणार आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत येणाऱ्या भाजीपाला आणि धान्यांच्या गाडय़ा अनेक ठिकाणी अडविल्या जात असल्याने पुरेशा प्रमाणत माल उपलब्ध होत नाही. ही बाब विभागीय कोकण आयुक्तांच्या लक्षात आल्याने त्यांनी यावर उपाययोजना करण्यासाठी आठ आधिकाऱ्यांचा कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात नियंत्रण कक्ष स्थापन केला आहे. ठाणे जिल्हा कृषी सहसंचालक विकास पाटील, ठाणे जिल्हा कृषी अधिक्षक अंकुश माने, सहय्यक पोलीस आयुक्त विनायक वत्स, पनवेल उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ठाणे जिल्हा फ परिमंडळाचे शिधावाटप उपनियंत्रक नरेश वंजारी, ठाणे जिल्हा पुरवठा अधिकारी राजु थोटे, मुंबई कृषी उत्तन्न बाजार समितीचे उपसचिव व्हि.पी. शिंगाडे आणि ठाणे जिल्हा उपनिबंधक शहाजी पाटील या आठ अधिकाऱ्यांना नियंत्रण कक्षात नियुक्त करण्यात आले आहे. कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज होणारी भाजीपाला आणि धान्याची आवाक जावक सुरळीत ठेवण्याचे महत्वाचे काम कक्षाकडे असणार आहे.