मीरा-भाईंदर महापालिकेकडून विकास हक्क प्रमाणपत्र मोडीत

भाईंदर : मीरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत तयार होणाऱ्या नाटय़गृहाचे काम अंतिम टप्प्यात आले असतानाच करोनाचा फटका नाटय़गृहाला बसला आहे. त्यामुळे आर्थिक कोंडी झालेल्या पालिकेने आता विकास हक्क प्रमाणपत्र मोबदल्यात काम पूर्ण करून घेण्याची मान्यता देण्यात यावी, अशी मागणी राज्य शासनाकडे  केली आहे.

दहिसर चेकनाका परिसरात ठाकूर मॉलजवळ मीरा-भाईंदर महानगरपालिकेमार्फत या नाटय़गृहाची निर्मिती करण्यात येत आहे. साधारण ४० कोटी रुपये या नाटय़गृहाच्या निर्मितीकरिता खर्च होणार आहे. नाटय़गृहाचे भूमिपूजन शिवसेना पक्षप्रमुख उद्धवसाहेब ठाकरे यांच्या हस्ते झाले होते. ‘बीओटी’ तत्त्वावर हे नाटय़गृह उभारले जात आहे. एका विकासकाला पालिकेने टीडीआर दिला असून त्या बदल्यात तो विकासक पालिकेला ही नाटय़गृहाची इमारत बांधून हस्तांतरित करणार आहे. त्यामुळे पालिकेचा पैसा खर्च न होता ‘टीडीआर’च्या मोबदल्यात विकासक हे नाटय़गृह बांधून देत आहे. परंतु करोनाचा फटका या नाटय़गृहाच्या निर्मितीस बसला असून सध्या काम बंद असल्याचे समोर आले आहे.

या वर्षी दसऱ्यापर्यंत नाटय़गृहाचे काम पूर्ण होणार होते, परंतु करोनामुळे  टाळेबंदी लागू करण्यात आली आणि पालिकेला नाटय़गृहाचे काम थांबावे लागले.

विकास प्रमाणपत्राच्या मोबदल्यात काम करण्याची मागणी

नाटय़गृहाच्या निर्मितीमुळे मीरा-भाईंदर शहराला सांस्कृतिक आणि आर्थिक फायदा होणार आहे. त्यामुळे या नाटय़गृहाची निर्मिती करणे हे पालिकेच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामधील एक भाग आहे. परंतु अद्यापही अंतर्गत कामाकरिता १९ कोटी रुपये अपेक्षित असल्याने काम ठप्प झाले आहे. पालिकेकडून शहरातील इतर विकास प्रमाणपत्राच्या मोबदल्यात काम पूर्ण करण्याची परवानगी महानगरपालिकेला मिळावी म्हणून राज्य शासनाकडे मागणी केली आहे. परंतु  परवानगी अद्यापही प्राप्त न झाल्याची माहिती महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक खांबित यांनी दिली.