ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या काही दिवसांपासून खाटा न मिळणे, रेमडेसिविर इंजेक्शन आणि प्राणवायूचा तुटवडा यामुळे करोना रुग्णांची फरफट होत असतानाच, गेल्या वर्षी म्हाडाच्या माध्यमातून कळवा आणि मुंब्रा भागांत उभारलेली करोना रुग्णालये बंदावस्थेत असल्याचे समोर आले आहे.

या दोन्ही रुग्णालयांच्या वापरापोटी म्हाडाला भाडे देण्यास नकार देत महापालिकेने रुग्णालये बंद केली होती. मात्र, आता रुग्णसंख्या वाढल्यानंतर दोन्ही यंत्रणांनी जागेचा भाडे वाद मागे ठेवत रुग्णालये सुरु करण्याचा निर्णय घेतला असला तरी, प्राणवायू पुरवठ्याअभावी ही रुग्णालये सुरू होऊ झाली नसल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. ही रुग्णालये सुरू झाली तर ८१० खाटा रुग्णांसाठी उपलब्ध होतील आणि त्यामुळे कळवा, मुंब्रा, दिवा भागांतील रुग्णांची फरफट थांबण्यास मदत होईल, असेही सूत्रांनी सांगितले.

गेल्या वर्षी जून महिन्यात महापालिकेने साकेत परिसरात ‘एमएमआरडीए’च्या माध्यमातून एक हजार खाटांचे करोना रुग्णालय उभारले होते. त्यापाठोपाठ ऑगस्ट महिन्यात म्हाडाच्या माध्यमातून कळवा परिसरात ४०० आणि मुंब्रा परिसरात ४१० अशा एकूण ८१० खाटांचे करोना रुग्णालय उभारण्यात आले होते. त्याचा फायदा कळवा आणि मुंब्रा परिसरातील रुग्णांना झाला होता. ही दोन्ही रुग्णालये तीन महिने वापरासाठी मोफत दिल्यानंतर म्हाडाने रुग्णालयाच्या वापरापोटी दोन कोटी ६६ लाख रुपये इतके भाडे दरमहा देण्याची मागणी केली होती. मात्र, हा खर्च महापालिकेला आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याचे कारण पुढे करत ही रुग्णालये बंद करण्याचा निर्णय सर्वसाधारण सभेत घेतला होता.

यासंदर्भात ठाणे महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त गणेश देशमुख यांच्याशी संपर्क साधला असता, कळवा आणि मुंब्रा भागांतील करोना रुग्णालयांच्या जागांचा भाडे वादाचा प्रश्न आता राहिलेला नसून रुग्णसंख्या वाढत असल्यामुळे म्हाडा आणि पालिकेने ही रुग्णालये सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, प्राणवायू पुरवठा होत नसल्यामुळे ही रुग्णालये सुरु होऊ शकलेली नसून त्यामुळे प्राणवायुचा पुरवठा मिळविण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत, असे त्यांनी स्पष्ट केले. कळवा, मुंब्रा येथील ही रुग्णालये सुरु झाली तर ठाण्यात उपचारांसाठी येणाऱ्या कळवा, मुंब्रामधील रुग्णांना फायदा होऊ शकेल.