करोनाबाधितांना तात्काळ उपचार मिळावेत, यासाठी म्हाडाच्या माध्यमातून चार महिन्यांपूर्वी कळवा आणि मुंब्रा परिसरात उभारण्यात आलेली करोना रुग्णालये बंद करण्याचा निर्णय शुक्रवारच्या सर्वसाधारण सभेत घेण्यात आला. ही दोन्ही रुग्णालये तीन महिने वापरासाठी मोफत दिल्यानंतर म्हाडाने आता रुग्णालयाच्या वापरापोटी दोन कोटी ६६ लाख रुपये इतके भाडे दरमहा देण्याची मागणी केली आहे. मात्र, हा खर्च महापालिकेला आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नसल्याचे कारण पुढे करत सत्ताधारी शिवसेनेने हा निर्णय घेतला.

ठाणे महापालिका क्षेत्रात मे महिन्यात करोनाचा प्रादुर्भाव वाढू लागल्यानंतर रुग्णांच्या उपचारासाठी रुग्णालये अपुरी पडू लागली. त्यामुळे जून महिन्यात महापालिकेने साकेत परिसरात ‘एमएमआरडी’च्या माध्यमातून एक हजार खाटांचे करोना रुग्णालय उभारले होते. त्यापाठोपाठ ऑगस्ट महिन्यात म्हाडाच्या माध्यमातून कळवा परिसरात ४०० आणि मुंब्रा परिसरात ४१० अशा एकूण ८१० खाटांचे करोना रुग्णालय उभारण्यात आले होते. या रुग्णालयांच्या उभारणीसाठी राज्याचे गृहनिर्माणमंत्री आणि कळवा-मुंब्रा विभागाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी प्रयत्न केले होते. या रुग्णालयाचा शेकडो रुग्णांना फायदा झाला आहे. मात्र, त्यांच्याच अखत्यारित असलेल्या म्हाडाच्या हट्टामुळे ही दोन्ही रुग्णालये चार महिन्यांतच बंद करण्याची वेळ ओढवल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

या दोन्ही रुग्णालयांच्या खर्चाचा प्रस्ताव शुक्रवारी झालेल्या सर्वसाधारण सभेपुढे मंजुरीसाठी आला होता. या प्रस्तावाच्या चर्चेदरम्यान शिवसेनेचे नगरसेवक राम रेपाळे यांनी म्हाडाने दोन्ही रुग्णालयांच्या वापरापोटी मागितलेल्या खर्चाचा मुद्दा उपस्थित केला. ही रुग्णालये बांधून दिली म्हणून म्हाडाने त्याच्या वापरापोटी दरमहा २ कोटी ६६ लाख रुपयांचे भाडे देण्याची मागणी केली आहे. मात्र, ही रुग्णालये चालविण्याचा संपूर्ण खर्च महापालिका करीत असताना म्हाडाला भाडे का द्यावे, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच महापालिकेची आर्थिक परिस्थिती चांगली नसल्यामुळे ही रुग्णालये बंद करावीत, असा ठरावही त्यांनी मांडला. त्याचे अन्य नगरसेवकांनी समर्थन केले. तर, महापालिकेला हा खर्च आर्थिकदृष्टय़ा परवडणारा नसल्याचे सांगत महापौर नरेश म्हस्के यांनी दोन्ही रुग्णालये बंद करण्याचे प्रशासनाला आदेश दिले.

झाले काय?

* या दोन्ही रुग्णालयांमध्ये मनुष्यबळ, जेवण, औषध आणि ऑक्सिजनचा पुरवठा करण्याचा संपूर्ण खर्च महापालिका करीत आहे. म्हाडाने ही दोन्ही रुग्णालये बांधून दिली असून त्याच्या वापरासाठी तीन महिने भाडे घेतले नव्हते.

* मात्र, नोव्हेंबर महिन्यापासून म्हाडाने रुग्णालयाच्या वापरासाठी प्रत्येकी एक कोटी ३३ लाख १२ हजार असे दोन्ही रुग्णालयांसाठी दोन कोटी ६६ लाख २४ हजार रुपये इतके भाडे देण्याची मागणी पालिकेकडे केली होती.

* तर, ही रुग्णालये आम्ही चालवू, पण त्याच्या वापराचे भाडे देऊ शकत नसल्याची प्रशासनाची भूमिका होती, असे सूत्रांनी सांगितले.