वाहतूक व्यवस्थेअभावी शेकडो जण अडकले

वसई : करोनाच्या प्रसाराला प्रतिबंध करण्यासाठी संचारबंदी लागू झाल्यानंतर सार्वजनिक तथा खासगी वाहतूक व्यवस्था ठप्प झाल्याने अनेक दिवसांच्या मासेमारीनंतर खोल समुद्रातून किनाऱ्यावर परतलेल्या मच्छीमार बोटींमधील परप्रांतीय तथा तालुक्याबाहेरील खलाशांचे हाल सुरू झाले आहेत. प्रवासाकरिता वाहन नसल्यामुळे तालुक्याबाहेर राहणाऱ्या खलाशांनी गावी पोहोचण्यासाठी शेकडो मैलांची पायपीट सुरू केली आहे, तर किनारपट्टीलगतच्या गावांमधील खलाशांना बोटींतून त्यांच्या गावानजीकच्या किनाऱ्यावर सोडण्यात आले आहे. मात्र, अन्य राज्यांतील खलाशांना अत्यंत प्रतिकूल परिस्थितीला तोंड देत आला दिवस ढकलावा लागत आहे.

वसई तालुक्याच्या किनारपट्टीवरील मासेमारी बोटी १७ मार्चपासूनच खोल समुद्रात मासेमारीकरिता गेल्या होत्या. दहा-बारा दिवसांच्या मासेमारीनंतर आता या बोटी किनाऱ्यावर आल्या आहेत. नायगावपासून अर्नाळापर्यंतच्या किनारपट्टीवर मोठय़ा प्रमाणात मासेमारी व्यवसाय चालतो. या बोटींमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, झारखंड, कोलकाता यांसारख्या परराज्यांप्रमाणेच तालुक्याबाहेरील पालघर, सफाळे, दातिवरे, वाडा, विक्रमगड, जव्हार या ठिकाणचे आदिवासी तथा बिगरआदिवासी

मजूर खलाशी म्हणून काम

करतात. किनाऱ्यावर आल्यानंतर करोनाच्या भीतीमुळे बाहेरील खलाशांची आपापल्या गावी परतण्यासाठी लगबग सुरू झाली आहे. मात्र, संचारबंदीमुळे सार्वजनिक तसेच खासगी वाहतूक व्यवस्थाही पूर्णत: बंद असल्यामुळे या खलाशांना मोठय़ा गैरसोयींना तोंड द्यावे लागत आहे.

पालघर, सफाळे, दातिवरे यांसारख्या किनाऱ्यालगतच्या गावांतील खलाशांना बोटींतून त्यांच्या गावी पोहोचविण्याची व्यवस्था मच्छीमारांकडूनच केली जात आहे, तर तालुक्याच्या वाडा, विक्रमगड, जव्हार याअंतर्गत भागात राहणारे खलाशी महामार्गावरून पायी गावाकडे निघाले आहेत. मात्र, परराज्यांतून आलेल्या खलाशांची मोठी अडचण झाली आहे.

काही कायम खलाशांची बोटमालकांनी तात्पुरती व्यवस्था केली असली तरी कित्येक परप्रांतीय खलाशी अक्षरश: बेघर झाल्याप्रमाणे आला दिवस काढत आहेत. गावी पोहोचण्यासाठी कोणतीही व्यवस्था नसल्यामुळे ते पुरते हतबल झाले आहेत.

परप्रांतीय खलाशांची अडचण आम्ही तहसीलदार तथा पोलिसांच्या माध्यमातून प्रशासनाच्या निदर्शनास आणली आहे. वाहतुकीस पूर्णत: बंदी असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते.

– संजय कोळी, अध्यक्ष, वसई मच्छीमार सर्वोदय सहकारी संस्थासंपूर्ण देशात टाळेबंदी आहे. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी कठोरपणे संचारबंदीची अंमलबजावणी केली जात आहे. जे ज्या ठिकाणी आहेत, त्याच ठिकाणी थांबण्याचे त्यांना आदेश आहेत.

– किरण सुरवसे, तहसीलदार, वसई तालुका