ठाणे : करोनाच्या टाळेबंदीमुळे गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली ठाणे शहरातील ग्रंथालये येत्या दोन दिवसांमध्ये सूरू होणार आहेत. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्य शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनांमधील नियमांची अंमलबजावणीचे व्यवस्थापन करण्यासाठी ग्रंथालय व्यवस्थापनाला आणखी दोन दिवस लागणार असून त्यानंतर शहरातील ग्रंथालये वाचकांसाठी खुली होणार आहेत. त्यामुळे साहित्य मिळवण्यासाठी वाचकांना आणखी दोन दिवस प्रतीक्षा करावी लागणार आहे.

करोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्याच्या अखेरीपासून राज्यात टाळेबंदी लागू करण्यात आली होती. त्यामुळे राज्यातील सर्वच ग्रंथालये बंद झाली होती. राज्य सरकारने जून महिन्यापासून टाळेबंदी शिथिलीकरणास सुरुवात केली. तरीही ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी देण्यात आलेली नव्हती. सात महिन्यांपासून बंद असलेल्या या ग्रंथालयांमुळे व्यवस्थापनांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागला होता. त्यामुळे ग्रंथालये सुरू करावी अशी मागणी जोर धरू लागली होती. या मागणीनुसार राज्य सरकारने १५ ऑक्टोबरपासून ग्रंथालये सुरू करण्यास परवानगी दिली आहे. असे असले तरी करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू केलेल्या नियमांच्या अंमलबजावणीचे व्यवस्थापन करण्यासाठी दोन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यानंतरच ठाणे शहरातील ग्रंथालये सुरु होणार आहेत. त्यामुळे शहरातील ग्रंथालये सुुरू होण्यासाठी आणखी दोन दिवस वाचकांना वाट पाहावी लागणार आहे.

ठाणे शहरात एकू ण ८ ग्रंथालये आहेत. गेल्या सात महिन्यांपासून बंद असल्यामुळे ग्रंथालय व्यवस्थापनाने ग्रंथालयाची स्वच्छता सुरू केली आहे. तसेच राज्य शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार यापुढे ग्रंथालयामध्ये येणाऱ्या प्रत्येक नागरिकाचे शरिराचे तापमान, ऑक्सिजनची पातळी तपासणी करून वाचनालयात येणाऱ्या प्रत्येकाची नोंदणी करणे अनिवार्य केले आहे. तसेच वाचकांकडून येणाऱ्या पुस्तकांना दोन दिवस वेगळे ठेवणे बंधनकारक करण्यात आले आहे. तर, ग्रंथालयामध्ये सॅनिटायझर आणि हात धुण्याच्या व्यवस्थेसोबत वेळोवेळी निर्जुंतुकीकरण करणेही बंधनकारण करण्यात आले आहे.

ग्रंथालय व्यवस्थापनाला वीज देयकांची चिंता

गेल्या सात महिन्यांपासून दोन्ही शहरातील ग्रंथालये बंद आहेत. असे असतानाही महावितरणाने या ग्रंथालयांकडून भरमसाठ देकये आकारली आहेत. त्यामुळे आधीच सात महिन्यांपासून बंद असलेल्या ग्रंथालयांमुळे आर्थिक नुकसान झाले असताना, आता या वीज देयकांसाठी पैसे आणायचे कोठून असा प्रश्न ग्रंथालय व्यवस्थापनासमोर उभा राहीला आहे.

गेल्या सात महिन्यांपासून बंद असलेली ग्रंथालये सुरू करण्यास अखेर राज्य शासनाने परवानगी दिली आहे. त्यामुळे आनंदाचे वातावरण आहे. नवरात्राच्या काळात आणि दिवाळीच्या तोंडावर ग्रंथालये सुरु होत असल्यामुळे वाचकांना वैचारीक फराळाचा आस्वाद घेता येणार असून येत्या दोन दिवसात आपले आवडते साहित्य वाचकांना उपलब्ध होणार आहे.

– विनायक गोखले, अध्यक्ष, ठाणे जिल्हा ग्रंथालय संघ