दररोज आढळणाऱ्या रुग्णसंख्येत घट

ठाणे : महापालिका क्षेत्रामध्ये सर्वाधिक करोना रुग्ण आढळून येत असलेल्या घोडबंदर भागामध्ये गेल्या काही दिवसांपासून करोनाचा संसर्ग कमी होऊ लागला असून या भागात दररोज आढळणारी रुग्णसंख्या ६०० वरून १३० वर आली आहे. यामुळे या भागातील परिस्थिती आटोक्यात असली तरी हा परिसर आजही शहरात रुग्णसंख्येत आघाडीवरच असल्याचे दिसून येत आहे, तर मुंब्रा परिसरात सर्वात कमी रुग्ण आढळून येत आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये मार्च महिन्यात करोनाचा संसर्ग पुन्हा वाढला. सुरुवातीला शहरात दररोज १५०० ते १८०० रुग्ण आढळून येत होते. त्यामध्ये सर्वाधिक म्हणजेच सहाशेहून अधिक रुग्ण घोडबंदर भागात आढळून येत होते. या भागातील मोठय़ा गृहसंकुलांमध्ये करोनाचा शिरकाव झाला होता. तसेच हा परिसर करोना संसर्गाचे केंद्र बनल्याचे चित्र होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून रुग्णसंख्येत मोठी घट झाली असून आता दररोज ५०० ते ६०० रुग्ण आढळून येत आहेत. त्याचबरोबर घोडबंदर भागातील रुग्णसंख्येतही मोठी घट झाली असून या ठिकाणी आता दररोज १३० ते १५० रुग्ण आढळून येत आहेत. यामुळे या भागातील परिस्थिती आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे. असे असले तरी शहरातील इतर भागांच्या तुलनेत हा परिसर रुग्णसंख्येत आजही आघाडीवरच असल्याचे दिसून येते. घोडबंदरच्या तुलनेत शहरातील दाट लोकवस्ती असलेल्या वागळे इस्टेट, कळवा, मुंब्रा आणि दिवा या भागांत करोनाचा संसर्ग कमी असल्याचे दिसून येते. गेल्या वर्षी हे परिसर करोना संसर्गाचे केंद्र बनल्याचे चित्र होते. त्यामुळे पालिका प्रशासनाची डोकेदुखी वाढली होती. मुंब्रा परिसरात सर्वात कमी रुग्ण आढळून येत असून या ठिकाणी मंगळवारी केवळ सहा रुग्णच आढळले होते.

प्रभाग समितीनिहाय रुग्णसंख्या 

प्रभाग समिती          २९ एप्रिलची रुग्णसंख्या   ४ मेची रुग्णसंख्या      

माजिवडा-मानपाडा             २३७                 १३८

वर्तकनगर                         ११२                  ८३

लोकमान्य-सावरकर            ६९                   ४५

नौपाडा-कोपरी                     ८७                   ७१

उथळसर                            ८४                   ४०

वागळे इस्टेट                     ३०                   २४

कळवा                              ९१                   ६०

मुंब्रा                                 २७                   ६

दिवा                                ७८                   ३९

इतर                               ४८                   ४६

एकूण                            ८६३                    ५५२

घोडबंदर भागामध्ये गेल्या काही वर्षांत लोकवस्ती मोठय़ा प्रमाणात वाढली आहे. नवीन गृहप्रकल्पांची कामे सुरू असून या ठिकाणी बांधकाम मजूर राहतात. तसेच या भागात करोना चाचणीचे प्रमाणही अधिक आहे. यामुळे शहरातील इतर भागांच्या तुलनेत या ठिकाणी रुग्ण जास्त होते. मात्र गेल्या काही दिवसांपासून या भागात रुग्णसंख्या कमी झाली आहे. हे प्रमाण आणखी कमी करण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. आमचे पथक पोलिसांसोबत परिसरात गस्ती घालत असते. तसेच नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जात आहे.

अनुराधा बाबर, सहायक आयुक्त, माजीवडा मानपाडा प्रभाग समिती.