21 September 2020

News Flash

जुन्या डोंबिवलीत करोनाचा प्रादुर्भाव

वाढती रुग्णसंख्या चिंताजनक; बाजार तसेच वर्दळीची केंद्रे पुन्हा चर्चेत

करोना व्हायरसनं जगभरात थैमान घातलं आहे. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे त्याच्यावरील लसीबरोबरच रोगप्रतिकारक शक्ति व प्रतिपिंड (अँटीबॉडीज्) विषयीही संशोधन केलं जात आहे. जगभरात वेगवेगळ्या संस्था यावर संशोधन करत असून, प्रतिपिंडाविषयी (अँटीबॉडीज्) करोनामुक्त रुग्णांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. (प्रातिनिधीक छायाचित्र- इंडियन एक्स्प्रेस/रॉयटर्स)

वाढती रुग्णसंख्या चिंताजनक; बाजार तसेच वर्दळीची केंद्रे पुन्हा चर्चेत

डोंबिवली : गेल्या काही महिन्यांपासून कल्याण परिसरातील ठरावीक भागांपुरता मर्यादित असलेला करोनाचा संसर्ग आता जुनी डोंबिवली म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पूर्व परिसरावर दिसू लागला आहे. पूर्वेतील फडके रस्ता, नेहरू रस्ता, सारस्वत वसाहत, पेंडसेनगर, रामनगर, राजाजी रस्ता, शिव मार्केट, मानपाडा, सावरकर रस्ता आणि टिळकनगर परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोठय़ा संख्येने रुग्ण सापडत आहेत. या भागात नियमित भरणारे बाजार तसेच वर्दळीची केंद्रे पुन्हा एकदा चर्चेत आली आहेत.

डोंबिवली पूर्वेतील रेल्वे स्थानक भागातील ‘जुनी डोंबिवली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील इमारती ४० ते ५० वर्षांपूर्वीच्या आहेत. या इमारतींमध्ये राहणाऱ्या घरांमधील तरुण डोंबिवली परिसरात नव्याने उभ्या राहिलेल्या गृहसंकुलांमध्ये कुटुंबांसह राहण्यासाठी गेले आहेत. जुन्या घरांमध्ये वृद्ध मंडळी घराचे अस्तित्व टिकविण्यासाठी राहतात. या वृद्ध मंडळींच्या सेवेसाठी गृहसेविका, सेवक असा राबता असतो. सकाळ, संध्याकाळ ज्येष्ठ, वृद्ध मंडळी जवळील गणपती मंदिर, साईबाब, शिव मंदिरात दर्शनासाठी जातात. घरातून बाहेर पडल्यानंतर घरालगतचे रस्ते, बाजार, रिक्षा, बस वाहनतळ, फेरीवाले, भाजी खरेदी करताना, ये-जा करताना लोकांशी संपर्क आल्याने काही ज्येष्ठ मंडळी करोनाने बाधित झाली असल्याचा प्राथमिक निष्कर्ष महापालिकेच्या आरोग्य विभागाने काढला आहे. अनेक इमारतींच्या समोर नोकरीला जाणारी मंडळी दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून निघून जातात. तेथे त्यांचा वावर झालेला असतो. काही ज्येष्ठ मंडळी आपल्या मुलाच्या कार्यालय, दुकानात वेळ घालविण्यासाठी जाऊन बसतात. तेथे आलेल्या ग्राहक, अभ्यागतांमुळे ही मंडळी बाधित झाली आहेत. रेल्वे स्थानक भागात चाकरमान्यांची सतत वर्दळ असते. पूर्व भागात शिळ फाटा, पलावा, २७ गाव, एमआयडीसी परिसरातून लोक रेल्वे स्थानक भागात येतात. अत्यावश्यक सेवेच्या जलदगती लोकल ठाकुर्ली, कोपर येथे थांबत नसल्याने तेथील प्रवासी डोंबिवली रेल्वे स्थानक गाठण्यासाठी येतो. या सगळ्या प्रवाही लोकसंख्येच्या समूह संपर्कात आल्याने पूर्वेतील ‘जुनी डोंबिवली’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भागातील रहिवासी, ज्येष्ठ नागरिक, वृद्ध मंडळी करोनाने सर्वाधिक बाधित झाली, अशी माहिती या भागातील जुन्याजाणत्या मंडळींनी दिली.

रामनगर, सावरकर रस्ता, टिळकनगर, शिव मार्केट, मानपाडा रस्ता, सारस्वत वसाहत, पेंडसेनगर, फडके रस्ता, राजाजी, मढवी बंगला परिसर, नेहरू मैदान परिसरात जून, जुलैमध्ये एका दिवशी २० ते ३० करोनाबाधित रुग्ण आढळून येत होते. करोनाचे सर्व नियम पाळणारी, आटोपशीर जीवन जगणारी ज्येष्ठ, जुनीजाणती मंडळी नोकरी, व्यवसाय असा कोठेही संपर्क नसताना करोनाने बाधित झाल्यामुळे अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले.

पूर्व भागातील लोकसंख्या सुमारे सहा ते सात लाख आहे. या भागात रस्त्यावर फिरणारी प्रवाही लोकसंख्या सर्वाधिक आहे. या संपर्कात आल्याने घरात करोना संसर्गाचे काटेकोर नियम पाळूनही घरातून कामानिमित्त बाहेर पडल्याने जुनीजाणती मंडळी करोनाने बाधित झाली, असे या भागातील रहिवाशांनी सांगितले.

उल्हासनगर, बदलापुरात ९० टक्के रुग्ण बरे

बदलापूर : अंबरनाथ आणि बदलापूर यांसारख्या शहरात रुग्णांची संख्या वाढत असतानाच उल्हासनगर शहरात रुग्णवाढ गेल्या काही दिवसांपासून मंदावल्याचे समाधानकारक चित्र समोर आले आहे. तर उल्हासनगर आणि बदलापूर शहरांतील करोनाबाधितांचा बरे होण्याचा टक्काही सुधारला असून तो थेट ९० टक्क्यांपर्यंत गेला आहे. उल्हासनगर शहराचा मृत्यूदर अवघा २.२ टक्के असून बदलापुरात हाच दर फक्त १.६६ टक्कय़ांवर आहे. अंबरनाथ शहरातील रुग्ण बरे होण्याचा दरही ८७ टक्क्यांपर्यंत आला आहे. मात्र, अंबरनाथ शहराचा मृत्यूदर ४ टक्क्यांपर्यंत पोहोचण्याची शक्यत आहे.

अत्यंत दाटीवाटीचे शहर आणि लोकसंख्येची सर्वाधिक घनता असलेले शहर म्हणून उल्हासनगर शहर ओळखले जाते. त्यामुळे शहरात करोनाबाधितांची संख्या मे ते जुलै महिन्यात सर्वाधिक होती. मात्र, गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या उपाययोजनांमुळे उल्हासनगर शहरात रुग्णांची संख्या खालावली आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज आढळणाऱ्या रुग्णांची संख्या ही ५० पेक्षाही कमी असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरात समाधानाचे वातावरण आहे.

विशेष म्हणजे ५ जूनपासून शहरातील बाजारपेठा सम-विषम पद्धतीने सुरू करण्यास परवानगी देण्यात आली होती. जुलै महिन्यात काही दिवस दुकाने बंद होती. मात्र, आगस्ट महिन्यापासून ती पुन्हा सुरू करण्यात आली आहे. दुकाने आणि शहरातील गर्दी असतानाही रुग्णसंख्या कमी होत असल्याने पालिकेच्या उपाययोजनांना यश आल्याचे बोलले जाते आहे. त्याच वेळी शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांवर गेले आहे. सोमवारी शहरातील एकूण ७ हजार १३७ रुग्णांपैकी ६ हजार ४६० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे रुग्ण बरे होण्याचा दर हा ९०.८० टक्क्यांपर्यंत सुधारला आहे. तर शहरात आतापर्यंत १५७ करोनाबाधितांचा मृत्यू झाला असला तरी ही टक्केवारी अवघी २.२ टक्के आहे. दुसरीकडे मंद गतीने रुग्णवाढ होत असलेल्या बदलापूर शहरातही रुग्णांची संख्या वाढत असली तरी रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८९.३३ टक्क्यांवर पोहोचले आहे. शहरात एकूण ३ हजार ६७ रुग्णांपैकी २ हजार ७४० रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत. तर ५१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. बदलापुरात मृत्यूदर हा अवघा १.६६ टक्के आहे. त्यामुळे शहरात उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या अवघी २७६ आहे.

अंबरनाथमध्ये मृत्यूदराची चिंता

अंबरनाथ शहरात सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांवर प्रभावीपणे उपचार केले जात असल्याने पालिकेच्या दंत महाविद्यालयात उभारण्यात आलेल्या करोना काळजी आणि आरोग्य केंद्रातील रुग्ण बरे होण्याचा दर ९१ टक्क्यांवर पोहोचला आहे. या रुग्णालयातील मृत्यूदर अवघा ०.२० टक्के आहे. मात्र, एकूण शहरातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे ८७.४२ टक्क्यांवर आहे. तर आतापर्यंत १६६ करोनाबाधितांचे मृत्यू झाले आहे. त्यामुळे मृत्यूदर हा ३.९० टक्क्यांपर्यंत पोहोचला असून हे प्रमाण ४ टक्क्यांवर पोहोचण्याची भीती व्यक्त होत आहे.

डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरात बाजारपेठ, रिक्षा, बस वाहनतळ आहे. अत्यावश्यक सेवा कर्मचारी, फेरीवाले, व्यापारी यांची या भागात सतत वर्दळ असते. त्यामुळे घरात करोना संसर्गाचे कितीही काटेकोरपणे नियम पाळले तरी अनेक मंडळी रस्त्यावरील समूहाच्या संपर्कात आली. त्यामुळे एरवी शिस्तबद्ध म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरालाही करोनाने कवेत घेतले असावे.

– हरिश्चंद्र जोशी,  रहिवासी,  पुष्कराज, सावरकर रस्ता.

डोंबिवली पूर्व भागात शिळ फाटा, २७ गाव, एमआयडीसी भागातून येणाऱ्या लोकांची संख्या अधिक आहे. याशिवाय स्थानिकांची वर्दळ असते. रेल्वे, बस स्थानक, रिक्षा वाहनतळ, व्यापारी पेठा येथे आहेत. अशा वातावरणात कोणाचा संपर्क कोठे आला आहे हे आपणास कळत नाही. या भागातील ज्येष्ठ रहिवाशांना करोनाची बाधा झाल्याचे दिसून येते.

– रेवा नाफडे, रहिवासी

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 12, 2020 3:07 am

Web Title: corona outbreak in old dombivli zws 70
Next Stories
1 उपजिल्हा रुग्णालयाला लालफितीची बाधा
2 गणेशोत्सवासाठी मीरा-भाईंदर महापालिकेची नियमावली
3 मालजीपाडा उड्डाणपुलाची रखडपट्टी
Just Now!
X