ठाणे : बाळकूम येथील ग्लोबल हब करोना रुग्णालयाच्या तिसऱ्या मजल्यावरून उडी मारून एका रुग्णाने आत्महत्या केल्याचा प्रकार रविवारी उघडकीस आला. भिकाजी वाघुले (७०) असे मृताचे नाव असून, गेल्या चार दिवसांपासून त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते.

नौपाडा येथील रहिवासी भिकाजी वाघुले यांना करोना संसर्गाचे निदान झाल्यानंतर ठाणे पालिकेच्या ग्लोबल हब करोना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते. रविवारी दुपारी ३ वाजेच्या सुमारास रुग्णालयाच्या खिडकीतून त्यांनी उडी घेऊन त्यांनी आत्महत्या केली.

वाघुले यांच्याकडे कोणतीही चिठ्ठी आढळली नसून आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली.

वाईत रुग्णाची नदी पात्रात उडी

वाई येथील कोविड  रुग्णालयात उपचार सुरू असणाऱ्या रुग्णाने कृष्णा नदी पात्रात उडी मारून आत्महत्या केली. संचित कोविड रुग्णालयानजीक रविवारी दुपारी दोनच्या सुमारास ही घटना घडली.

पाचवड (ता. वाई) येथील एक ६५ वर्षीय नागरिक चार दिवसांपूर्वी करोनाबाधीत असल्याचे आढळून आले होते. त्यांना वाई येथील संचित कोविड  रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, पहाटे साडेचारच्या सुमारास त्यांनी आरोग्यसेविका व डॉक्टरांना धक्काबुक्की करून रुग्णालयातून पलायन केले. ताबडतोब डॉक्टरांनी  रात्रगस्तीवरील पोलिसांच्या मदतीने पकडून रुग्णालयात आणले. त्यांची समजूत घालून त्यांना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला.

दरम्यान, रविवारी दुपारी त्यांनी पुन्हा डॉक्टर व आरोग्य सेविकेला धक्काबुक्की व मारहाण करून संरक्षक दरवाजा तोडून रुग्णालयातून पळ काढला व लगतच्या कृष्णा नदी पात्रात उडी मारली. यात त्यांचा मृत्यू झाला.

पालघरमध्ये बाधिताचा आत्महत्येचा प्रयत्न

विक्रमगड येथील रिवेरा या करोना रुग्णालयाच्या छतावरून उडी मारून एका ३८ वर्षीय रुग्णाने आत्महत्येचा प्रयत्न केला. प्रकृती खालवत असल्याने त्याला शनिवारी रात्री विक्रमगड येथील रिवेरा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र रविवारी सकाळी त्याने रुग्णालयाच्या छतावरून उडी मारली. त्याच्या डोक्याला गंभीर इजा झाली असून, प्रकृती चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्याला मुंबई येथे हलविण्यात येणार असल्याची माहितीही डॉक्टरांनी दिली.