30 September 2020

News Flash

रुग्ण करोनामुक्त होण्याच्या प्रमाणात घसरण

शहरात करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना उपचार देणे शक्य होत आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मृत्यूदर, बाधित आढळण्याच्या प्रमाणात मात्र सुधारणा

 

ठाणे : महापालिका क्षेत्रात गेल्या दहा दिवसांपासून करोना रुग्ण संख्येत वाढ होऊ लागली आहे. असे असतानाच शहरात रुग्ण बरे होण्याची टक्केवारीही घसरू लागली आहे. ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस रुग्ण करोनामुक्त होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत होते. गेल्या दहा दिवसांत घसरण होऊन हे प्रमाण ८६ टक्क्यांवर आले आहे.

शहरात करोना चाचण्यांची संख्या वाढविण्यात आल्यामुळे रुग्णांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना उपचार देणे शक्य होत आहे. यामुळे शहरातील मृत्यूचे प्रमाण ३.६ टक्क्यांवरून ३.०२ टक्क्यांवर तसेच चाचण्यांमध्ये रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ७ टक्क्यांवर आणण्यात यश आल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत २८ हजार ६८१ बाधित आढळले आहेत. त्यापैकी २४ हजार ८४० बाधित बरे होऊन घरी परतले आहेत. तर, २ हजार ९६७ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ८७४ करोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. ऑगस्ट महिन्यात शहरात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आल्याचे चित्र होते. दररोज दीडशे ते दोनशे रुग्ण आढळून येत होते. परंतु सप्टेंबर महिन्याच्या सुरुवातीपासून शहरात करोनाचा प्रादुर्भाव पुन्हा वाढू लागल्याचे चित्र असून शहरात आता सरासरी अडीचशे ते तीनशे रुग्ण आढळून येत आहेत. बुधवारी शहरात ४५५ नवे रुग्ण आढळून आले. एकीकडे रुग्ण संख्या वाढत असल्याचे चित्र असतानाच दुसरीकडे रुग्ण बरे होण्याची टक्केवारी घसरू लागल्याचे दिसून येत आहे. ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत रुग्ण बरे

होण्याचे प्रमाण ९० टक्क्यांपर्यंत पोहचले होते. त्यामुळे रुग्ण बरे होण्याच्या क्रमवारीत ठाणे शहर राज्यात पहिल्या तर देशात दुसऱ्या स्थानी पोहचले होते. गेल्या दहा दिवसांपासून शहरातील रुग्ण बरे होण्याची टक्केवारी हळूहळू घसरू लागली असून ती ९० टक्क्यांवरून आता ८६ टक्क्यांवर आली आहे.

मृत्यूदराचे प्रमाण घटले

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाकडून चाचण्यांची संख्या दिवसेंदिवस वाढविण्यात येत आहे. बुधवारी शहरात ५ हजार ८३४ चाचण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये ४५५ करोनाबाधित रुग्ण आढळून आले. चाचण्यांच्या संख्या वाढविल्यामुळे रुग्ण संख्या वाढत असली तरी चाचण्यांमुळे रुग्णांचा तात्काळ शोध घेऊन त्यांना उपचार देणे शक्य होत आहे. तात्काळ उपचार मिळत असल्यामुळे त्यांचे प्राण वाचण्यास मदत होत आहे. यामुळेच करोनाबाधितांच्या मृत्यूचे प्रमाण ३.६ टक्क्यांवरून ३.०२ टक्क्यांवर आणण्यात यश आले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये यापूर्वी एकूण चाचण्यांच्या तुलनेत करोनाबाधित रुग्ण आढळून येण्याचे प्रमाण ३३ टक्क्यांवर होते. परंतु गेल्या दोन महिन्यांत केलेल्या उपाययोजनांमुळे हे प्रमाण १३ टक्क्यांवर आणले आहे. शहरातील एक हजारांहून अधिक रुग्ण घरीच उपचार घेत आहेत. महापालिकेची आरोग्य पथके त्यांना दररोज संपर्क करून त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करत आहेत. तसेच ठाणे स्थानकात करण्यात येणाऱ्या चाचण्यांमध्ये शहराबाहेरील रुग्ण आढळून आला तर, त्याला महापालिकेच्या कोविड रुग्णालयात उपचाराची सुविधा उपलब्ध करून देण्यात येते.

__संदीप माळवी, उपायुक्त

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 11, 2020 12:35 am

Web Title: corona patient corona falling proportion akp 94
Next Stories
1 भाज्यांची आवक घटल्याने दरांमध्ये वाढ
2 भिवंडी रोड स्थानकातून माल वाहतूक, पार्सल सेवा सुरू
3 मीरा-भाईंदरमध्ये पाणीटंचाईचा प्रश्न गंभीर
Just Now!
X