ठाणे महापालिका आयुक्तांचे आवाहन

ठाणे : शहरामध्ये करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्यास उशीर करणाऱ्या तसेच दुसऱ्या लाटेमध्ये घरीच उपचार घेण्यावर भर देऊन अंगावर दुखणे वाढल्यानंतर रुग्णालयात उपचारासाठी दाखल होणाऱ्या सुमारे ६०० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. अशा प्रकारे मृत पावणाऱ्या रुग्णांचे प्रमाण ३५ टक्क्यांच्या आसपास असून ते वेळीच रुग्णालयात दाखल झाले असते तर त्यांचे प्राण वाचू शकले असते, अशी माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.

ठाणे शहरात आतापर्यंत १ हजार ७७६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी वेळीच रुग्णालयात उपचारासाठी दाखल न झाल्यामुळे सुमारे ६०० रुग्णांना आपले प्राण गमवावे लागले आहेत. करोनाच्या पहिल्या लाटेमध्ये अनेक रुग्णांनी अंगावर दुखणे काढले आणि त्यानंतर चाचणी करून निदान केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाल्याने त्यांना प्राण गमवावा लागला. दुसऱ्या लाटेमध्ये शासनाच्या आदेशानुसार अनेकजण घरीच उपचारावर भर देत आहेत. त्यापैकी अनेकजण बरे होतात. पण काही बरे होत नाहीत. घरीच दोन ते तीन दिवस उपचार घेतल्यानंतरही अनेकांच्या प्रकृतीत सुधारणा होत नाही. तरीही ते घरीच उपचारावर भर देतात. या उपचारादरम्यान त्यांची प्राणवायूची पातळी कमी होऊन त्यांची प्रकृती गंभीर होते. अशा परिस्थितीत रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांचे प्राण वाचविण्याचा प्रयत्न डॉक्टर करतात. पण उशिरा दाखल झाल्यामुळे रुग्णांच्या प्रकृतीत सुधारणा होत  नाही आणि त्यांचा मृत्यू होतो.

नागरिकांना आवाहन

ठाणे शहरामध्ये आतापर्यंत झालेल्या एकूण मृत्यूमध्ये सहव्याधी आणि ज्येष्ठांच्या मृत्यूचे प्रमाण ६० टक्के आहे. त्यामुळे व्यक्तींना करोनाची लागण झाली तर त्यांनी घरी उपचार घेण्याऐवजी रुग्णालयामध्ये दाखल व्हावे. तसेच इतर रुग्णांनी घरीच उपचार घेत असताना एक ते दोन दिवसांत प्रकृतीत सुधारणा झाली नाही तर त्यांनी तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल व्हावे, असे आयुक्त पालिकेने केले आहे.

मृत्यूचे प्रमाण

वयोगट  रुग्णांचे मृत्यू

७१ ते ८०      ४२१

६१ ते ७०      ५०९

५१ ते ६०      ३७५