जिल्ह्यात चार हजार जणांचा मृत्यू

ठाणे : जिल्ह्यातील करोना रुग्णांच्या संख्येने नुकताच दीड लाखांचा टप्पा ओलांडला असून आतापर्यंत ४ हजारांहून अधिक रुग्णांचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. कल्याण-डोंबिवली शहरात करोनाचा सर्वाधिक संसर्ग पसरला असून या शहरातील ३६ हजारांहून अधिक नागरिकांना करोनाची लागण झाली आहे. जिल्ह्यातील वाढत्या संसर्गामुळे आरोग्य व्यवस्थेवरचा ताणही वाढू लागला आहे.

ठाणे जिल्ह्यात मे आणि जून महिन्यांत करोनाचे दररोज सरासरी १,५०० रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे परिस्थिती अधिक चिंताजनक बनली होती. याच काळात केंद्र सरकार आणि राज्य सरकारने टाळेबंदी शिथिलीकरणाचा पहिला टप्पा जाहीर केला होता. तरीही जिल्ह्यातील  बहुतांश स्थानिक स्वराज्य संस्थांच्या प्रशासकांनी करोनाचा संसर्ग लक्षात घेत आपआपल्या हद्दीत टाळेबंदी कायम ठेवली होती. त्यामुळे जुलैअखेरपर्यंत जिल्ह््यातील सर्वच व्यवहार ठप्प होते. याचा परिणाम जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील दररोज आढळणा ऱ्या करोना रुग्णांच्या संख्येवर दिसू लागला होता. या काळात जिल्ह्यात दररोज सरासरी १,२०० हूनही कमी रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे करोना सक्रिय रुग्णांची संख्याही १२ हजारांवर आली होती. मात्र, गणेशोत्सवाच्या काळात नागरिकांच्या गृहभेटी वाढल्याने तसेच टाळेबंदीमध्ये शिथिलता आल्यामुळे करोनाचा पुन्हा उद्रेक झाला असल्याचे जिल्हा आरोग्य विभागाने सांगितले.

सध्या दररोज १,७०० हून अधिक करोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यामुळे १ सप्टेंबर रोजी १ लाख २५ हजारांवर असलेल्या करोना रुग्णांच्या संख्येने अवघ्या दोन आठवड्यांमध्ये दीड लाखांचा टप्पा पार केला आहे.