भिवंडी, कल्याण शहरांजवळील गावांमध्ये करोनाचा अधिक फैलाव

सागर नरेकर, लोकसत्ता

ठाणे : जिल्ह्य़ातील महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रांमध्ये करोना रुग्णसंख्या कमी होत असली तरी या शहरांच्या वेशीवर असलेल्या विविध तालुक्यांतील ग्रामीण भागातही करोना वाढल्याचे दिसून आले आहे. ठाणे जिल्ह्य़ातील पाच ग्रामीण तालुक्यांतील भिवंडी तालुक्यात सर्वाधिक बाधित रुग्ण आहेत. त्याखालोखाल कल्याण तालुक्याच्या ग्रामीण भागात रुग्णसंख्या अधिक आहे. तर शहरांपासून थोडे दूर असलेल्या अंबरनाथ, शहापूर आणि मुरबाड तालुक्यांत तुलनेने कमी रुग्णांची नोंद झाली आहे. सर्वाधिक मृत्यूंची नोंदही भिवंडी तालुक्यातच झाली आहे.

जिल्ह्य़ात आतापर्यंत २९ हजार रुग्णांची तर ७३६ मृत्यूंची नोंद झाली आहे. सर्वाधिक स्थलांतर, गर्दी आणि नागरिकीकरण असलेला जिल्हा म्हणून ठाणे जिल्हा ओळखला जातो. ठाणे जिल्ह्य़ातील भिवंडी आणि अंबरनाथ तालुक्यांत मोठय़ा प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र आहे. महामार्गाने जोडलेला तालुका म्हणून भिवंडी तालुक्याची ओळख आहे. विविध कंपन्यांचे गोदाम आणि उद्योगांमुळे ग्रामीण भागाचेही शहरीकरण झालेल्या या तालुक्यांमध्ये करोनाचा संसर्गही तितक्याच प्रमाणात झाला आहे. भिवंडी तालुक्यात आतापर्यंत १० हजार ७७१ करोनाबाधितांची नोंद झाली आहे, तर ग्रामीण भागातील सर्वाधिक मृत्यूही भिवंडी तालुक्यात झाले आहेत. जिल्हा परिषदेतील नोंदीनुसार या मृत्यूंची संख्या २७१ आहे. भिवंडीपाठोपाठ कल्याण तालुक्यातही संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. एकीकडे कल्याण-डोंबिवली महापालिकेशेजारील २७ गावे, पुढे अंबरनाथ तालुक्यातील नेवाळी, पाले हा भाग तीनही बाजूंनी शहरांनी वेढलेला आहे. पुढे उल्हासनगर शहराच्या वेशीवर असलेली म्हारळ, वरप, कांबा यांसारखी गावे जवळपास शहरे झालेली आहेत. त्यामुळे येथेही संसर्गाचे प्रमाण मोठय़ा प्रमाणावर आहे. कल्याण तालुक्यात आतापर्यंत ८ हजार ९६३ रुग्णांची नोंद झाली आहे.

शहापूर तालुक्यात गेल्या काही दिवसांत करोनाबाधितांची संख्या वाढली आहे. जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार तालुक्यात आतापर्यंत ४ हजार ९६२ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. या तालुक्यात शहापूर, वासिंद, आसनगाव, खर्डी या रेल्वे स्थानकांनी जोडलेल्या गावांमध्ये संसर्गाचे प्रमाण अधिक आहे. अंबरनाथ तालुक्यातही रुग्णसंख्या मोठी आहे. अंबरनाथ आणि बदलापूर नगरपालिका क्षेत्र लागून असल्याने बदलापूरशेजारील वांगणी, सोनावळे आणि बदलापूरशेजारचा भाग येथे करोनाच्या रुग्णांची संख्या तीन हजारांच्या घरात आहे. अंबरनाथ तालुक्यात जिल्हा परिषदेच्या नोंदीप्रमाणे २ हजार ९०३ रुग्ण आहेत. शहरांपासून काही अंशी दूर असलेल्या मुरबाड तालुक्यात करोनाचा ससंर्ग इतर तालुक्यांच्या तुलनेत कमी आहे. मुरबाड तालुक्यात आतापर्यंत करोनाच्या १ हजार ९५४ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. गेल्या दोन आठवडय़ांपासून येथे कठोर टाळेबंदी लागू करण्यात आली आहे.

आकडेवारीत तफावत

जिल्हा प्रशासनाने दिलेल्या आकडेवारीनुसार आतापर्यंत ठाणे जिल्ह्य़ात २९ हजार ९९८ रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. जिल्हा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंत जिल्ह्य़ात २९ हजार ५५३ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या आकडेवारीतही मोठी तफावत असल्याचे दिसून आले आहे. शहापूर तालुक्यात पंचायत समितीच्या अहवालानुसार ७ हजार ५२५ रुग्ण बाधित आढळले आहेत. जिल्हा परिषदेकडे फक्त ४ हजार ९६२ रुग्णांची नोंद आहे. ही स्थिती अंबरनाथ, मुरबाड तालुक्यांबाबतही आहे. त्यामुळे आकडेवारीचा घोळ जिल्ह्य़ात सुरूच आहे.

संसर्गाची कारणे

व्यवहार, व्यवसाय, खरेदी-विक्रीसाठी ग्रामीण भागातून शहराकडे वाहतूक सुरू असते. त्यामुळे वेशीवरच्या भागात संसर्ग वाढला आहे. त्याचप्रमाणे ग्रामीण भागात कमी असलेल्या आरोग्य सुविधांमुळे लक्षणांकडे दुर्लक्ष करण्याचे प्रमाण अधिक आहे. लसीकरणाकडेही ग्रामस्थांनी गांभीर्याने पाहिले नाही. परिणामी संसर्ग वाढला आहे.