एक लाख ‘कोविड १९ रॅपिड अ‍ॅण्टिजन किट’ची खरेदी; चाचण्या वाढवण्यासाठी महापालिकेचे पाऊल

ठाणे : ठाणे महापालिका क्षेत्रातील करोनाची लक्षणे आढळणाऱ्या व्यक्तींची आणि संशयितांची चाचणी आता अवघ्या तीस मिनिटांत होणार आहे. या चाचण्यांसाठी लागणारे १ लाख ‘कोविड १९ रॅपिड अ‍ॅण्टिजन किट’ ठाणे महापालिका प्रशासनाने खरेदी केले आहेत. येत्या दोन दिवसांमध्ये हे किट महापालिकेला प्राप्त होणार असून यामुळे शहरातील करोना चाचण्यांची संख्याही वाढणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांनी दिली.

ठाणे शहरातील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढू लागली आहे. रविवार सायंकाळपर्यंत शहरातील रुग्णसंख्या ८ हजार १६८ वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा टाळेबंदी लागू करण्याची नामुष्की महापालिका प्रशासनावर ओढवली आहे. शहरातील करोनाची वाढती रुग्णसंख्या आटोक्यात आणण्यासाठी करोनाच्या चाचण्या वाढवण्याचे आदेश काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महापालिका प्रशासनाला दिले होते. तसेच जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका प्रशासनासोबत नुकत्याच झालेल्या बैठकीत चाचण्या वाढवण्याच्या सूचना दिल्या होत्या. या आदेशानुसार ठाणे महापालिका प्रशासनाने राज्याच्या सार्वजनिक आरोग्य विभागाने निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे १ लाख ‘कोविड १९ रॅपिड अ‍ॅण्टिजन किट’ खरेदी केले आहेत. या किटमुळे करोनाची लक्षणे आढळणाऱ्या आणि करोना संशयित असणाऱ्या व्यक्तींची केवळ ३० मिनिटांत चाचणी करून अहवाल प्राप्त होणार आहे. येत्या दोन दिवसांत हे किट महापालिका प्रशासनाला प्राप्त होणार असून या किटमुळे शहरातील करोना चाचण्यांची संख्या वाढणार आहे. तसेच तात्काळ अहवाल मिळाल्याने शहरातील करोनाचा संसर्ग रोखण्यासही मदत होणार आहे.

‘किट’मुळे मोठा फायदा

ठाणे महापालिका प्रशासनातर्फे राज्य शासनाने नियुक्त केलेल्या कंपनीकडून आणि शासनाने निर्धारित केलेल्या किमतीमध्ये हे एक लाख किट खरेदी करण्यात आले आहेत. येत्या दोन दिवसांत हे किट महापालिकेला प्राप्त होणार आहेत. विशेष म्हणजे या किटच्या माध्यमातून स्वॅब घेण्यासाठी नागरिकांना प्रयोगशाळेची गरज भासणार नसून करोना हॉटस्पाट, महापालिकेच्या वतीने सर्वेक्षण सुरू असलेली ठिकाणे आणि प्रतिबंधित क्षेत्रात सहज करोना चाचणी करणे शक्य होणार आहे. केवळ ३० मिनिटांत करोनाचा अहवाल मिळाल्याने रुग्णांवर उपचार करणे सहज शक्य होणार असून शहरातील चाचण्यांची संख्या मोठय़ा प्रमाणात वाढणार आहे.