आशिष धनगर, लोकसत्ता

ठाणे : महापालिका क्षेत्रामधील दिवा परिसरात दुकाने सुरु करण्यासाठी व्यापाऱ्यांना करोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय प्रभाग समिती प्रशासनाने घेतला असून या अजब फतव्याविरोधात व्यापारी वर्गातून नाराजीची सुर उमटत आहे. आधीच टाळेबंदीत दुकाने बंद ठेवावी लागल्याने व्यापाऱ्यांना आर्थिक फटका बसला असतानाच, त्यांना आता करोना चाचणीसाठी पैसे खर्च करावे लागणार आहे. यामुळे दिव्यातील व्यापारी वर्ग हवालदिल झाला असून त्यांनी या फतव्याला कडाडून विरोध केला आहे.

राज्य सरकारने जुन महिन्यात राज्याच्या अर्थचक्राला गती देण्यासाठी टाळेबंदी शिथिल केली. या शिथिलीकरणानंतर महापालिका प्रशासनाने शहरातील दुकाने आणि बाजारपेठा सुरु करण्यास परवानगी दिली होती. मात्र, शहरातील प्रतिबंधित क्षेत्रासह दाट लोकवस्ती असलेल्या दिवा परिसरात करोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून प्रशासनाने येथील दुकाने जून महिन्यातही बंद ठेवली. त्यानंतर करोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी २ जुलैपासून संपुर्ण महापालिका क्षेत्रात टाळेबंदी लागू केली. या टाळेबंदीची मुदत १९ जुलैपर्यंत संपुष्टात आल्यानंतर महापालिका प्रशासनाने केवळ अतिसंक्रमित क्षेत्रातच ३१ जुलैपर्यंत टाळेबंदी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला. या निर्णयामुळे दुकाने आणि बाजारपेठा सुरु झाल्याने व्यापारी आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला. मात्र, दिव्यातील व्यापाऱ्यांची दुकाने सुरु होण्याची प्रतिक्षा अजूनही संपलेली नसल्याचे चित्र आहे.  दुकाने सुरु करण्यासाठी व्यापाऱ्यांना आणि त्यांच्या कर्मचाऱ्यांना करोना चाचणी बंधनकारक करण्याचा निर्णय दिवा प्रभाग समिती प्रशासनाने घेतला आहे. तसेच चाचणी केली नाहीतर दुकानांना टाळे ठोकण्यात येईल, असा इशारा प्रशासनाने दिला आहे. दिवा प्रभाग समितीचे सहायक आयुक्त सुनील मोरे आणि व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची बैठक गुरूवारी पार पडली. त्यामध्ये सहायक आयुक्त मोरे यांनी हा इशारा दिला आहे. मात्र, गेल्या चार महिन्यात उत्पान्नापेक्षा खर्चच अधिक झाल्यामुळे आता चाचणी करण्यासाठी पैसै आणायचे कोठून असा प्रश्न या व्यापाऱ्यांपुढे उभा राहीला असून या निर्णयाला व्यापाऱ्यांनी कडाडून विरोध केला आहे.

दिवा प्रभाग समितीचा अजब फतवा

सुमारे चार महिन्यापासून दुकाने बंद असल्यामुळे उत्पन्न शुन्य आहे. पण, दुकानाचे भाडे, वीज देयके आणि कामगारांचे वेतन देण्याचा खर्च करावा लागत आहे. त्यातच टाळेबंदी शिथिलीकरणानंतर दुकान सुरु केली असली तरी ग्राहकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे उत्पन्नावर परिणाम झाला असून या सक्तीच्या करोना चाचणीसाठी हजारो रुपये आणायचे कुठून असा प्रश्न आमच्यापुढे आहे.

– सागर राणे, कपडे व्यापारी, दिवा

टाळेबंदी शिथिलीकरणानंतर दिव्यातील दुकाने सुरु झाली आहेत. मात्र, दुकानदार अंतर नियम पाळत नसून दुकानांमध्ये खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांना करोना चाचणी करण्यास सांगण्यात आले आहे. तसेच या व्यापाऱ्यांकडे काम करणाऱ्या मजुरांची पालिकेतर्फे जलद प्रतिजन चाचणी करण्याची आमची तयारी आहे. तसेच व्यापाऱ्याला खासगी प्रयोग शाळेत चाचणी करणे परवडत नसल्यास त्यांनी कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात चाचणी करण्यासाठी जावे.

– सुनिल मोरे,  सहाय्यक आयुक्त, दिवा प्रभाग समिती