ठाणे महापालिका प्रशासनाचा निर्णय; शहरात बूथ, शिबीर, मोबाइल व्हॅनद्वारे चाचण्या

जयेश सामंत-नीलेश पानमंद, लोकसत्ता

ठाणे : ठाणे शहरातील करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने उशिरा का होईना चाचण्या वाढविण्यासाटी पुढाकार घेतला असून संशयित रुग्णांना घराजवळ चाचणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील वेगवेगळ्या प्रभाग समित्यांच्या स्तरावर बूथ, मोबाइल व्हॅन आणि शिबिरांच्या माध्यमातून चाचण्या करण्यात येणार आहेत. यापूर्वी होत असलेल्या चाचण्यांच्या तुलनेत चौपट चाचण्या करण्याचे या माध्यमातून नियोजन करण्यात आले असून खासगी प्रयोगशाळा आणि महापालिकेच्या २९ आरोग्य केंद्रांच्या माध्यमातून दररोज ३ हजार ९५० चाचण्या केल्या जाणार आहेत.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये करोना विषाणूचा संसर्ग दिवसेंदिवस वाढ असून शहरातील रुग्णांचा आकडा दहा हजारांच्या पुढे गेला आहे. गेल्या काही दिवसांपासून शहरात दररोज तीनशे ते चारशे रुग्ण आढळून येत आहेत. रुग्णसंख्या वाढू लागल्याने महापालिकेने उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. या उपायांचा एक भाग म्हणून प्रभाग समिती स्तरावर बूथ, मोबाइल व्हॅन आणि शिबिरांच्या माध्यमातून करोना चाचण्या करण्याचा निर्णय घेतला आहे.

यापूर्वी भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेमार्फत परवानगी देण्यात आलेल्या खासगी प्रयोगशाळांमार्फत करोना चाचणी केली जात होती. त्यामुळे नागरिकांना शहरातील करोना चाचणी केंद्रांचा शोध घेऊन त्या ठिकाणी चाचणीसाठी जावे लागत होते. पालिकेच्या निर्णयामुळे नागरिकांना आता घराजवळील परिसरात बूथ, मोबाइल व्हॅन, शिबिरांच्या माध्यमातून चाचण्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे. त्यासाठी प्रशासनाने प्रयोगशाळांना प्रभाग समितीनिहाय कार्यक्षेत्र विभागून दिले आहे. प्रयोगशाळांसोबत समन्वय ठेवण्यासाठी अधिकाऱ्यांच्या नेमणुका केल्या आहेत.

करोनाचे निदान लवकर व्हावे आणि रुग्णाला तातडीने उपचार मिळवून त्याचे प्राण वाचावेत, या उद्देशातून चाचण्यांची संख्या वाढविण्यात आली आहे. शहरात यापूर्वी एक हजार करोना चाचण्या केल्या जात होत्या. मात्र आता चाचण्यांची संख्या चौपट करण्यात आली आहे. त्यासाठी प्रयोगशाळांना चाचण्यांची क्षमता आणि कार्यक्षेत्र ठरवून देण्यात आले असून त्याचबरोबर नागरिकांना घराजवळच चाचण्यांची सुविधा उपलब्ध होणार आहे.

– गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका