राज्य शासनाच्या आदेशाला केराची टोपली

जयेश सामंत / नीलेश पानमंद

ठाणे : खासगी प्रयोगशाळांना करोना चाचणीसाठी २२०० रुपये तर घरी येऊन चाचण्या केल्यास २८०० रुपये दर राज्य शासनाने निश्चित केला असला तरी ठाणे महापालिका क्षेत्रात मात्र आजही करोना चाचण्यांसाठी सरसकट २८०० दर आकारला जात आहे. खासगी प्रयोगशाळांकडून राज्य शासनाच्या आदेशाला केराची टोपली दाखविली जात असून महापालिका प्रशासनाचेही याकडे दुर्लक्ष झालेले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये यापूर्वी करोना चाचणीसाठी ४५०० रुपये घेतले जात होते. हा दर परवडत नसल्यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय व्यक्ती चाचणी करण्यासाठी पुढे येत नव्हती. यामुळे शहरातील झोपडपट्टय़ा, चाळी आणि मध्यमवर्गीय वसाहतींमध्ये करोनाचा संसर्ग वाढण्याची भीती व्यक्त होऊ लागली होती. त्यातच एका खासगी प्रयोगशाळेकडून तीन हजार रुपयांत करोना चाचणी केंद्र सुरू करण्यात आले होते. त्यामुळे शहरात चाचण्यांचे दर समान नसल्याचे चित्र होते. या सर्वाच्या पार्श्वभूमीवर महापालिका प्रशासनाने खासगी प्रयोगशाळांची बैठक घेऊन ३००० रुपयांचा दर निश्चित केला होता. मात्र हे दरही महागच असल्याचे शहरातील नागरिकांचे म्हणणे आहे. असे असतानाच खासगी प्रयोगशाळांमध्ये करोना चाचण्यांसाठी २२०० रुपये तर घरी येऊन चाचण्या केल्यास २८०० रुपये इतका दर राज्य शासनाने निश्चित केला. तरीही शहरात आता चाचणीसाठी सरसकट २८०० रुपये घेतले जात असल्याचे चित्र आहे.

‘करोना चाचण्या मोफत करा’

ठाणे शहरातील नागरिकांसाठी भाजपतर्फे कमल कवच योजनेंतर्गत करोना चाचणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या ठिकाणीही चाचणीसाठी २८०० रुपये आकारले जात आहेत. या संदर्भात भाजपचे ठाणे शहराध्यक्ष निरंजन डावखरे यांच्याशी संपर्क साधला असता, राज्य शासनाच्या चाचण्यांच्या दरपत्रकामध्ये बराच गोंधळ असून यामुळेच ही संभ्रमावस्था आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजनेतून नागरिकांना चाचण्यांची सुविधा मोफत उपलब्ध करून देणे गरजेचे आहे, अशी मागणीही त्यांनी या वेळी केली.

राज्य शासनाने निश्चित केलेल्या दराप्रमाणेच खासगी प्रयोगशाळांनी करोना चाचणीचे पैसे घेतले पाहिजेत. जर असे प्रकार घडत असतील तर तातडीने संबंधितांना याबाबत तशा सूचना देण्यात येतील.

– गणेश देशमुख, अतिरिक्त आयुक्त, ठाणे महापालिका

खासगी प्रयोगशाळा राज्य शासनाच्या आदेशाप्रमाणे पैसे घेतात की नाही, यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी महापालिका प्रशासनाची असून त्यांनी जास्त पैसे घेणाऱ्यांविरोधात कारवाई करायला हवी.

– नरेश म्हस्के, महापौर, ठाणे