News Flash

साठा नाही तरीही परवानगीची प्रक्रिया पूर्ण

मुंबई वगळता ठाणे शहरात १ मेपासून खासगी रुग्णालयांतील लसीकरण बंद करण्यात आले आहे.

लसीकरणासाठी ठाण्यातील ८५ रुग्णालयांची तयारी

ठाणे : महापालिका क्षेत्रातील गृहसंकुले आणि खासगी कार्यालयांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यासाठी प्रशासनाने शहरातील ८५ खासगी रुग्णालयांना नव्या धोरणानुसार परवानगी दिली आहे. परंतु मुंबई, नवी मुंबई शहरांतील काही बड्या खासगी रुग्णालयांमध्ये कंपनीच्या माध्यमातून लससाठा उपलब्ध होत असला तरी, ठाणे शहरातील एक खासगी रुग्णालय वगळता इतर रुग्णालयांना लसपुरवठ्यासाठी कंपन्यांकडून फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे यापूर्वीच समोर आले आहे. त्यामुळे परवानगी मिळाली असली तरी लशींचा साठा आणायचा कुठून, असा पेच या ८५ रुग्णालयांसमोर उभा राहिला आहे.

मुंबई वगळता ठाणे शहरात १ मेपासून खासगी रुग्णालयांतील लसीकरण बंद करण्यात आले आहे. या खासगी केंद्रांवर पैसे भरून लस घेणाऱ्यांची मोठी गर्दी दिसूून येत होती. ही केंद्रे बंद पडल्यामुळे पालिकेच्या केंद्रांवर नागरिकांचा भार वाढल्याचे चित्र आहे. तर दुसरीकडे मुंबई आणि नवी मुंबईतील काही बड्या खासगी रुग्णालयांमध्ये कंपनीच्या माध्यमातून थेट लस उपलब्ध करून देण्यात येत असून यामुळे या ठिकाणी विनाअडथळा लसीकरण मोहीम सुरू आहे. ठाण्यातील अनेक खासगी रुग्णालयांनी अशाच प्रकारे थेट लस खरेदी करून लसीकरण करण्याची तयारी दर्शविली आहे. पण त्यांना लस उत्पादक कंपन्यांकडून लसपुरवठ्यासाठी फारसा प्रतिसाद मिळत नसल्याचे समोर आले होते. या संदर्भात ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठविले होते. ठाणे शहरातील खासगी रुग्णालयांना लशींचा साठा उपलब्ध करून देण्याची मागणीही  त्यांनी केली होती.

एकीकडे लस उत्पादक कंपन्यांकडून लससाठा उपलब्ध होत नसल्यामुळे शहरातील खासगी रुग्णालय व्यवस्थापन अस्वस्थ असतानाच, दुसरीकडे ठाणे महापालिकेने शहरातील ८५ खासगी रुग्णालयांना लसीकरणासाठी परवानगी दिली आहे. करोना प्रतिबंधक लसीकरणाची व्यापकता वाढविण्यासाठी तसेच जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण पूर्ण व्हावे या उद्देशातून महापालिकेने खासगी कार्यालये, औद्योगिक आस्थापना आणि गृहसंकुलांसाठी लसीकरण धोरण निश्चित केले आहे. या धोरणांतर्गत शहरातील ८५ खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्र सुरू करण्यास पालिकेने परवानगी दिली आहे. या सर्व रुग्णालयांचे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण दिले असून त्यामध्ये लसीकरण केंद्राच्या ठिकाणी कोणत्या सुविधा आवश्यक आहेत, त्याचे व्यवस्थापन कसे असायला हवे, याबाबत माहिती देण्यात आल्याचे पालिकेने म्हटले आहे. या केंद्रांवर संबंधित रुग्णालयांनाच लशीचा साठा उपलब्ध करावा लागणार असून त्याची जबाबदारी पालिकेची नसणार आहे. त्यामुळे लसीकरण केंद्राला परवानगी मिळाली असली तरी लशींचा साठा आणायचा कुठून, असा पेच खासगी रुग्णालय व्यवस्थापनापुढे आहे.

एकाच रुग्णालयात सुविधा

ठाणे येथील वर्तकनगर भागातील सिद्धिविनायक रुग्णालय या एकमेव खासगी रुग्णालयाला उत्पादकाकडून लशींचा साठा उपलब्ध झाला आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून आदित्य बिर्ला ग्रुपच्या जवळपास २२०० कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले आहे. या लसीकरण केंद्रावर रुग्णालयाने एका वैद्यकीय अधिकाऱ्यासह दहा जणांचे पथक नेमले आहे. लसीकरणासाठी शासनाने दिलेल्या निर्देशानुसार कोविन पोर्टलवर नोंदणी करणे बंधनकारक असून सर्व कर्मचाऱ्यांची रीतसर नोंदणी करण्यात आली आहे. या रुग्णालयाच्या माध्यमातून आता वागळे येथील आयआयएफएल या खासगी आस्थापनामध्येही लसीकरण सुरू आहे.

ठाणे महापालिकेने नव्या धोरणानुसार ८५ खासगी रुग्णालयांना लसीकरण केंद्र सुरू करण्यास परवानगी दिली आहे. या केंद्रांवर लससाठा उपलब्ध करण्याची जबाबदारी रुग्णालयांची आहे. त्यामुळे ही सर्वच रुग्णालये मिळून लससाठा मिळविण्यासाठी लस उत्पादक कंपन्यांकडे पाठपुरावा करीत आहेत. यासाठी ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र पाठविले आहे. -संतोष कदम, ठाणे अध्यक्ष, आयएमए.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 18, 2021 12:31 am

Web Title: corona vaccination tmc area and private offices akp 94
Next Stories
1 तोतया पोलीस अटकेत
2 लस खरेदीसाठी पैसा आणणार कुठून?
3 संतोष पांगम यांचे निधन
Just Now!
X