दोषींवर कारवाई करण्याचे आदेश

ठाणे : अभिनेत्री मीरा चोप्रा हिच्याप्रमाणेच आणखी २५ जणांना बनावट ओळखपत्र बनवून देऊन त्यापैकी १५ जणांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली आहे. त्याचे पडसाद शुक्रवारी स्थायी समितीच्या बैठकीत उमटले. याप्रकरणी चौकशी करून दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश स्थायी समिती सभापती संजय भोईर यांनी दिले आहेत.

राज्य शासनाच्या आदेशानुसार ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण बंद आहे. तरीही महापालिकेच्या पार्किंग प्लाझा लसीकरण केंद्रावर अभिनेत्री मीरा चोप्रा हिने लशीची पहिली मात्रा घेतल्याचा प्रकार समोर आला होता. पालिकेच्या पार्किंग प्लाझा करोना रुग्णालयामध्ये पर्यवेक्षक असल्याचे बनावट ओळखपत्र तयार करून त्याद्वारे तिचे लसीकरण करण्यात आले होते.

या प्रकरणाचा चौकशी अहवाल आरोग्य विभागाचे उपायुक्त विश्वनाथ केळकर यांनी नुकताच आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांच्याकडे सादर केला आहे. त्यामध्ये आणखी २५ जणांना बनावट ओळखपत्र बनवून देऊन त्यापैकी १५ जणांना लस देण्यात आल्याची बाब समोर आली आहे.