ठाणे :  केंद्र शासनाने १ एप्रिलपासून ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांचे लसीकरण मोहीम सुरू करण्याचे आदेश दिले. मात्र, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लशींचा तुटवडा निर्माण झाल्याच्या तक्रारी येत होत्या. लसीकरणाचा पुरेसा साठा जिल्ह्यात उपलब्ध नसल्यामुळे लसीकरणास ब्रेक लागण्याची शक्यता अनेकांकडून वर्तविण्यात येत  होती. असे असतानाच राज्य शासनाने गुरुवारी ठाणे जिल्ह्याला  २ लाख ४६ हजार ९८० लशींचा साठा उपलब्ध करून दिला आहे.

ठाणे जिल्ह्यात मार्च महिन्यापासून करोना रुग्णसंख्येत पुन्हा वाढ होऊ लागली असून या पार्श्वभूमीवर लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी सर्वच पातळीतून होत आहे. तसेच केंद्र शासनाने १ एप्रिलपासून ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांना लस देण्याचे आदेश दिले आहेत. जानेवारी महिन्यात आरोग्य सेवक, पोलीस तर, मार्चमध्ये ४५ ते ६० वर्षांपर्यंतचे सहव्याधी असलेले व्यक्ती आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी लसीकरण मोहीम सुरू होती. त्यापाठोपाठ आता १ एप्रिलपासून लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असून त्यात ४५ ते ६० वर्षांपर्यंतच्या सर्व नागरिकांना लस देण्यात येत आहे. मात्र, जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून लशींचा तुटवडा निर्माण झाल्याचे चित्र होते. त्यामुळे येत्या काही दिवसांतच लसीकरण मोहिमेला ब्रेक लागण्याची शक्यता अनेकांकडून वर्तवली जात होती. असे असतानाच राज्य शासनाने गुरुवारी जिल्ह्याला २ लाख ४६ हजार ९८० लशींचा पुरवठा उपलब्ध करून दिला आहे. त्यामध्ये २ लाख ३२ हजार ६७० कोव्हिशिल्ड तर १४ हजार ३१० कोव्हॅक्सिनचा समावेश आहे. यामुळे लसीकरणाचा वेग वाढण्याची चिंता आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.