पूर्वा साडविलकर-रोशनी खोत

ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या ग्रामीण भागात मोठय़ा प्रमाणावर मागणी असलेली मातीची मडकी, चुली आणि मातीच्या भांडय़ांच्या विक्रीवरही करोना विषाणूचे सावट पसरले आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे या मातीच्या वस्तूंची विक्री ठप्प झाली असून कुंभारकाम पूर्णपणे बंद झाले आहे. त्यामुळे या व्यवसायावर अंवलंबून असलेल्या कुटुंबीयांकडे शेकडो रुपयांचा माल शिल्लक असून ऐन हंगामात विक्री बंद असल्याने ग्रामीण भागातील कुंभारकाम करणाऱ्यांसमोर आर्थिक पेच निर्माण झाला आहे.

ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील कल्याण, मुरबाड, शहापूर, भिवंडी, विक्रमगड, मोखाडा, तलासरी या तालुक्यांमधील गावांमध्ये आजही मोठय़ा प्रमाणात मातीची मडकी, मोठे माठ, चुली, मातीची भांडी यांचा वापर केला जातो. मार्च ते मे या काळात उन्हाच्या झळा वाढू लागल्याने ग्रामीण भागांमध्ये मडकी आणि माठांना मोठी मागणी असते. तर या भागांमध्ये आजही जेवण बनवण्यासाठी घरात पर्याय म्हणून मातीच्या चुलीचा वापर केला जातो. काही विशेष प्रकराचे पदार्थ बनवण्यासाठी मातीची बांडी हे भांडे वापरण्यात येते.

ही सर्व मातीची भांडी तयार करण्याचे काम विविध गावांमधील कुभांर समाज करतो. पावसाळ्यापूर्वी ग्रामीण भागातील नागरिक चुली आणि बांडी या वस्तू खरेदी करतात, तर उन्हाळ्याच्या काळात मडक्यांना मोठी मागणी असते. या काळात लग्न समारंभासाठीही मडक्यांची खरेदी केली जाते. त्यामुळे मार्च ते मे महिन्यापर्यंतच्या कालावधीत कुंभार काम करणाऱ्यांना चांगले उत्पन्न मिळते.

हे कुंभार काम करणारे कामगार गावोगावी जाऊन या वस्तूंची विक्री करतात. तसेच जवळच्या शहरांमधील मोठे व्यापारीही या वस्तूंची खरेदी या कुंभारांकडून करतात.

मात्र, सध्या टाळेबंदीत ही सर्व साखळी तुटली आहे. ग्रामीण भागातील अनेक गावांच्या सीमा बंद असल्याने मातीच्या वस्तूंची विक्री करण्यासाठी जाणे शक्य होत नसल्याचे प्रतीक कुंभार यांनी सांगितले.

मार्च ते मे महिन्यात या मातीच्या वस्तूंना मोठी मागणी असते. ग्रामीण भागातील आठवडी बाजारांमध्येही चुली आणि मडक्यांची चांगली विक्री होते. मात्र, यंदा करोनामुळे बाजार बंद असल्याने ही सर्व विक्रीच ठप्प झाली आहे. तसेच वाहतूक ठप्प असल्याने शहरांमधील किरकोळ विक्रेतेही आमच्याकडून माल खरेदी करण्यासाठी येत नसल्याने घरामध्ये हजारो रुपयांचा माल शिल्लक असल्याचेही त्यांनी सांगितले.

वाडा तालुक्यातील गोऱ्हे गावात अक्षय घोष्टेकर आणि त्यांचे कुटुंबीय मातीच्या वस्तू बनवून त्याची विक्री करतात. मार्च ते मे महिन्यात उन्हाळा तसेच लग्नसरई असल्यामुळे मोठय़ाप्रमाणात मातीची भांडी तयार करण्याच्या ऑर्डर आल्या होत्या. परंतु टाळेबंदी जाहीर झाल्याने या ऑर्डर रद्द झाल्या असून तयार माल घरातच पडून असल्याचे अक्षय यांनी सांगितले. वस्तू तयार असून त्याची विक्री होत नसल्यामुळे घोष्टेकर कुटुंबीयांना सध्या आर्थिक चणचण भासू लागली आहे.

मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान

कल्याण शहरातील कुंभारवाडय़ामध्ये आजही मोठय़ा प्रमाणात काळे माठ तयार केले जातात. काही विशिष्ट समाजातील लग्नांमध्ये या माठांचा वापर केला जात असल्याने लग्नसराईच्या काळात या मातीच्या माठांना मोठय़ा प्रमाणात मागणी असते. या माठांवर नक्षीकाम करण्यासाठी जास्त खर्च येत असल्याने ऑर्डरनुसार माठ तयार केले जातात. यंदाच्या वर्षीही या माठांना मोठय़ा प्रमाणात मागणी होती. त्यामुळे माठ तीन ते चार महिन्यांपूर्वीच तयार करून ठेवले होते. मात्र करोनामुळे अनेक विवाह सोहळे रद्द झाल्याने हे तयार माठ शिल्लक राहिले असून अनेकांचे मोठय़ा प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे.