करोनाबाधित लहान मुलांसाठी शाळांमध्ये काळजी केंद्रे

कल्याण : करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेमध्ये लहान मुलांना संसर्ग होण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. हा धोका लक्षात घेऊन लहान मुलांचे शाळेशी असलेले मानसिक, भावनिक नाते विचारात घेऊन कल्याण-डोंबिवली महापालिकेने करोनाबाधित होणाऱ्या आठ ते १२ वयोगटांतील मुलांसाठी पालिकेच्या शाळा, प्राथमिक, माध्यमिक विद्यालयांमध्ये विलगीकरण, काळजी केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

विद्यार्थी आणि शिक्षक या नात्याचा विचार करून काळजी केंद्र, विलगीकरणात उपचार घेत असलेल्या मुलांना आजारमुक्त ठेवण्यासाठी मुलांशी दूरदृश्य प्रणालीद्वारे संवाद, त्यांचे मनोरंजन करण्यासाठी मुख्याध्यापक, शिक्षकांना सज्ज राहण्याच्या सूचना देण्यात येणार आहेत, असे आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी सांगितले.

तिसऱ्या लाटेच्या वेळी लहान मुले अधिक संख्येने करोना काळजी, विलगीकरण केंद्रात असतील अशी भीती आहे. त्यामुळे कल्याण-डोंबिवली महापालिकेने विद्यार्थी, पालक आणि शिक्षक यांच्या समन्वयातून ‘माझा विद्यार्थी-माझी जबाबदारी’ ही संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. करोनाची बाधा झालेल्या मुलांना शाळेतील विलगीकरण कक्षात, काळजी केंद्रात दाखल केले जाईल. या मुलांना आपण आपल्या शाळेत आहोत. दूरदृश्य प्रणालीद्वारे आपले शिक्षक, मुख्याध्यापक संपर्कात आहेत, असे वातावरण शाळाशाळांमधील विलगीकरण, काळजी केंद्रांत ठेवले जाईल. उपचार घेत असलेल्या मुलांना करोना आजाराच्या भीतीपासून दूर ठेवण्याचा कसोशीने प्रयत्न प्रशासनातर्फे केला जाणार आहे. कोणत्याही आजारपणात वैद्यकीय उपचारांबरोबर लहान मुलांना भावनिक, मानसिक आधाराची खूप गरज असते. त्यामुळे मुले शाळेतील विलगीकरण, काळजी केंद्रात उपचार घेत असली तरी त्यांच्या सोबतीला शाळेच्या आवारात पालकांचा मुलांशी संवाद राहावा यासाठी पालकांच्या निवासाची व्यवस्था केली जाईल, असे आयुक्त डॉ. सूर्यवंशी यांनी सांगितले.

पालिकेच्या सध्या सुरू असलेल्या संस्थात्मक विलगीकरण, काळजी केंद्रात सर्व वयोगटांतील करोनाबाधित उपचार घेतात. अशा ठिकाणी लहान मुलांना ठेवणे योग्य होणार नाही. सध्याच्या विलगीकरण केंद्रात लहान मुलांची घुसमट नको म्हणून प्रशासनाने शाळांचा पर्याय निवडला आहे. पालिकेच्या ७४ शाळांसह खासगी प्राथमिक, माध्यमिक शाळा, तेथील विद्यार्थी संख्येची माहिती प्रशासनाने संकलित करण्याचे काम सुरू केले आहे. ‘आमची शाळा, विलगीकरण, काळजी केंद्र’ या संकल्पनेतून शाळा विलगीकरण, काळजी केंद्रात रूपांतर करण्यात येणार आहे.

काळजी केंद्रातील मुलांच्या मनोरंजनासाठी दररोज मुख्याध्यापक, शिक्षक दूरदृश्य प्रणालीद्वारे गाणी, गमतीजमती, गोष्टी, मनोरंजन खेळ, विनोदी चित्र खेळांचे सादरीकरण करतील, असे नियोजन प्रशासन अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली केले जात आहे. ८ ते १२ वयोगटांतील मुलांना करोना संसर्गाची सौम्य लक्षणे आढळून आली तर त्या मुलांना पालकांच्या संमतीने जवळील शाळेतील विलगीकरण, काळजी केंद्रात दाखल करून घेतले जाईल. वैद्यकीय सुविधांनी ही सर्व केंद्रे सज्ज ठेवण्यात येणार आहेत.

वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. अश्विनी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विलगीकरण, काळजी केंद्रातील सुविधांची जुळवाजुळव केली जाणार आहे.

करोना संसर्गाच्या तिसऱ्या लाटेत बालकांना अधिक बाधा होण्याची शक्यता वर्तविण्यात आल्याने मुलांचे शाळा, शिक्षकांशी असलेले भावनिक नाते विचारात घेऊन बाधित मुलांसाठी शाळांमध्ये विलगीकरण, काळजी केंद्र सुरू करण्याचे नियोजन केले आहे. माझा विद्यार्थी-माझी जबाबदारी हा उपक्रम शिक्षकांच्या माध्यमातून तिसऱ्या लाटेच्या काळात राबविण्याचे नियोजन केले जात आहे. मुलांचे मन आजारापासून दूर ठेवून आपण आपले शिक्षक, पालक यांच्या सहवासात आहोत, असे वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

– डॉ. विजय सूर्यवंशी, आयुक्त, कल्याण-डोंबिवली महानगरपालिका