पुरवठादारांचा शून्य प्रतिसाद आणि केंद्र सरकारच्या नव्या धोरणामुळे ठाणे पालिकेचा विचार

ठाणे : तिजोरीत खडखडाट असतानाही करोना नियंत्रणासाठी पाच लाख लसींच्या खरेदीसाठी जागतिक निविदा काढणाऱ्या ठाणे महापालिकेने पुरेशा प्रतिसादा अभावी ही निविदा गुंडाळण्याची तयारी केल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. केंद्र सरकारने कोविशिल्ड लसींच्या दुसऱ्या मात्रेसाठी वाढविलेली मुदत, राज्यांना पुरेशा प्रमाणात लसपुरवठ्यासाठी आखलेले नवीन धोरण आणि खासगी रुग्णालयांत वाढते लसीकरण या पार्श्वभूमीवर स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत स्वतंत्रपणे लसखरेदी करण्याची आवश्यकता उरलेली नाही. त्यामुळे पालिकेने लसखरेदीसाठी काढलेल्या जागतिक निविदेस मुदतवाढही दिली नसल्याचे समजते.

मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिका प्रशासनाने लस खरेदीसाठी काढलेल्या जागतिक निविदेला अजूनही प्रतिसाद मिळालेला नाही. यापूर्वी या निविदेस सात दिवसांची मुदतवाढ देण्यात आली होती. मात्र, त्यानंतरही लसपुरवठादार कंपन्यांकडून प्रतिसाद न मिळाल्याने पालिकेने या निविदेत पुन्हा मुदतवाढ देऊ केलेली नाही. याबाबत आयुक्तांच्या स्तरावर चर्चा सुरू असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये एकूण ५६ लसीकरण केंद्रे आहेत. यापैकी ३५ केंद्रांवर नागरिकांचे लसीकरण सुरू आहे. उर्वरित केंद्रे लस तुटवड्यामुळे बंद आहेत. गेल्या काही महिन्यांपासून हे चित्र कायम आहे. लस तुटवड्याची समस्या दूर करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून वेगवेगळ्या पर्यायांवर चर्चा सुरू होती. त्याचदरम्यान मुंबई महापालिकेच्या धर्तीवर ठाणे महापालिकेने पाच लाख लशींच्या खरेदीसाठी जागतिक निविदा मागविण्याची घोषणा केली होती. या लस खरेदीसाठी निधी कुठून आणणार, असा     प्रश्न उपस्थित करत भाजपने टीका केली होती. त्यावर यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये करोना उपाययोजनांसाठी दोनशे कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आली असून त्यातील ५० कोटी रुपये खर्चून पाच लाख लशींची खरेदी करण्यात येणार असल्याचे ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के यांनी स्पष्ट केले होते.

या निविदेला अपेक्षित प्रतिसाद मिळेल, असे दावे प्रशासनाकडून करण्यात येत होते. ८ जूनपर्यंत निविदा भरण्याची अंतिम मुदत होती. या मुदतीत लसपुरवठा कंपन्यांकडून निविदेला प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे निविदेला आणखी सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली. १६ जूनपर्यंत निविदा भरण्याची अंतिम तारीख होती. या मुदतवाढीनंतरही लसपुरवठा कंपन्यांनी प्रतिसाद दिलेला नाही. त्यामुळे या निविदेला पालिकेने तिसऱ्यांदा मुदतवाढ दिलेली नाही. यामुळेच पालिकेने ही निविदा प्रक्रिया गुंडाळली असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

ठाणे महापालिकेमार्फत लस खरेदीसाठी जागतिक निविदा काढण्यात आली होती. सात दिवसांची मुदतवाढ देऊनही निविदेस लसपुरवठा कंपन्यांकडून प्रतिसाद मिळालेला नाही. या निविदेबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नसून याबाबत आयुक्त स्तरावर चर्चा सुरू आहे. या चर्चेअंती होणाऱ्या निर्णयाप्रमाणे पुढील कार्यवाही करण्यात येईल.  – संदीप माळवी उपायुक्त, ठाणे महापालिका