|| कल्पेश भोईर

 

शेतकरी वर्षभरात तिसऱ्यांदा संकटात

वसई : सध्या देशासह संपूर्ण राज्यात करोनाने धुमाकूळ घातला आहे. यामुळे त्याचा विपरीत परिणाम विविध प्रकारच्या गोष्टींवर झाला असून याचा सर्वाधिक फटका वसईतील फुलशेतीला बसला आहे. बाजारात फुलशेतीचा मालच विक्रीसाठी जात नसल्याने ऐन सणासुदीच्या हंगामात बागायतदारांना लाखो रुपये उत्पन्नावर पाणी सोडावे लागले आहे.

वसईच्या बहुतांश भागात फुले व फळभाज्यांची लागवड केली जाते. या भागातून मोठय़ा प्रमाणात विविध प्रकारची फुले व फळभाज्या याचे उत्पादन घेतले जाते. त्यामध्ये चाफा, मोगरा, सायली, जुई, तगर, गुलाब, जास्वंद, नेवाली अशा विविध प्रकारच्या फुलांची लागवड करण्यात आली आहे, तर मदनबाण या सुगंधी फुलांचीही लागवड केली आहे. दीड महिन्याआधीच या फुलांची लागवड केली होती. गुढीपाडव्याला चांगले उत्पादन निघेल या अनुषंगाने लावण्यात आले होते. परंतु आता अशा संकटामुळे मालच बाजारात पोहचू शकला नसल्याने त्याचे पीकही वाया गेले असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले आहे.

मात्र मागील काही दिवसांपासून संपूर्ण जगासह राज्यालाही करोना या रोगाने ग्रासले आहे. त्यामुळे बहुतेक ठिकाणच्या बाजारपेठा या बंद आहेत, त्यामुळे शेतात तयार झालेला विविध फुलांचा मालही विक्रीसाठी जात नाही. या अशा निर्माण झालेल्या आपत्तीमुळे नागरिकांची होणारी गर्दी टाळण्यासाठी मंदिरे व इतर सर्व धार्मिक स्थळेही बंद झाली असल्याने तयार झालेली फुलेही पडून खराब होत आहेत.

तसेच यंदाच्या चालू वर्षांत तिसऱ्यांदा वसईच्या भागातील शेतकरी संकटात सापडला आहे, याआधी वसईत झालेली अतिवृष्टी, अवकाळी पाऊस, आर्थिक मंदी आणि आता करोनाचे सावट यामुळे शेतकऱ्यांचे  अर्थगणित कोलमडले आहे.

‘शासनाने दिलासा द्यावा’

सध्या करोनाचे मोठे संकट ओढवले आहे. त्यामुळे सरकारला नाइलाजास्तव संपूर्ण देश लॉकडाऊन करावा लागला आहे. त्यामुळे वाहतूक व्यवस्था, बाजारपेठा सर्वच बंद असल्याने तयार झालेल्या फुलांच्या विक्रीसाठी जाऊ  शकत नाही. त्यामुळे हा संपूर्ण माल घरातच पडून राहिला आहे. ज्यांनी आधी  माल विकला आहे, त्यांची रक्कमही थकीत आहे. तर दुसरीकडे शेतमजुरांना देण्यासाठी हातातही पैसे नाहीत. त्यामुळे फूल शेतकऱ्यांवर दुहेरी संकट ओढवले आहे. यासाठी शासनाने लॉकडाऊन काळात दिवसातून काही वेळा तरी फुलांचा माल विक्रीसाठी द्यावा, जेणेकरून थोडा तरी हातभार लागू शकेल, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली.

करोनामुळे बाजारपेठा, धार्मिक स्थळेही बंद पडल्याने याचा मोठा परिणाम आमच्या फुलशेती, फळभाज्या या व्यवसायावर झाला आहे. यंदाच्या वर्षी तिसऱ्यांदा विविध प्रकारच्या समस्येमुळे आम्ही अडचणीत सापडलो आहोत. शासनानेही शेतकऱ्यांची अडचण समजून सहकार्य करावे.

– किरण पाटील, शेतकरी

मागील काही दिवसांपासून फुलविक्रीवर मोठा परिणाम झाला आहे. लॉकडाऊन असल्याने माल विक्रीसाठी बाहेर जात नाही. तसेच फुलांचा माल नाशवंत असल्याने लवकर खराब होतो. त्यामुळे नुकसान होत आहे.

– भूषण भोईर, फुलविक्रेते शेतकरी