|| पूर्वा साडविलकर

अनेक महिने घरदार विसरून रुग्णांच्या सेवेसाठी झटणाऱ्या परिचारिकांचा निर्धार

ठाणे : आप्त आणि कुटुंबापासून कित्येक महिन्यांचा दुरावा…. काळजाचा ठोका चुकविणारा विषाणू कहराचा वाढता आलेख… या सगळ्यात न डगमगता रुग्णांच्या सान्निध्यात राहून त्यांना धीर देण्यापासून बरे होण्याच्या टप्प्यापर्यंत सर्वात मोठा आधार परिचारिकांनी दिला. यंदाच्या ‘जागतिक परिचारिका’ दिनाला त्यामुळे वेगळेच परिमाण लाभले असून या आरोग्य कर्मचाऱ्यांनी आपला करोनाविरोधातील लढा आणखी व्यापक करण्याचा निर्धार केला आहे.

वर्षभरापूर्वी करोनाविषयी गैरसमज समाजात होते. थेट करोना वार्डात काम करणाऱ्या परिचारिकांचा करोनायोद्धा म्हणून गौरव होत होता. पण त्या राहत असलेल्या वसाहतींमध्ये, संकुलांमध्ये हिच्यामुळे आपल्याकडे हा रोग पसरला तर, अशा चर्चाही दबक्या आवाजात सुरू असायच्या. पहिल्या लाटेला आम्ही हरविले, आता दुसऱ्या लाटेचा सामना करताना आम्ही काही सहकारी गमावले, माणसातील भल्या-बुऱ्या अशा अनेक प्रवृत्तींचा सामना दररोज होत आहे. हे सारे कुठवर चालेल याची कल्पना नाही. आम्ही मात्र न थांबता लढायचे ठरविले आहे, हा बुलंद आणि आश्वासक स्वर ठाण्यातील मध्यवर्ती शासकीय रुग्णालयातील परिचारिकांकडून ऐकायला मिळतो.

करोना काळात वैद्यकीय सेवा बजावताना आपल्या  सहकाऱ्यांचे, आप्त-स्वकीयांचे होणारे मृत्यू, दररोज उपचार घेत असलेले रुग्ण, अचानक प्रकृती अस्वस्थ झाल्याने त्यांची होणारी तगमग, बरे झालेल्या रुग्णांच्या चेहऱ्यावरील समाधान अशा परस्परविरोधी अनुभवांचा सामना जगभरातील परिचारिकांना करावा लागत आहे. प्रातिनिधिक उदाहरण म्हणून ठाण्यातील सिव्हिल रुग्णालयातील २०० परिचारिकांनी सांगितलेल्या वर्षभरातील झुंजीचा तपशील थक्क करणारा आहे.

एकदा ‘पीपीई’ कीट घालून अतिदक्षता विभागात प्रवेश केला की आपल्याला कोणत्याही प्रकारचा संसर्ग होऊ नये यासाठी कामाची वेळ संपेपर्यंत पाणी घेणे तसेच जेवण करणे सुरुवातीच्या काळात शक्य होत नव्हते. आताही ही दक्षता घ्यावीच लागते. यावेळी भूक, तहान विसरून आम्ही रुग्णांना सेवा देतो, अशी माहिती रुग्णालयातील परिचारिकांनी दिली.

करोनाच्या पहिल्या लाटेत काम करताना माझा मुलगा दोन वर्षाचा होता. त्याला माझ्यामुळे कोणत्याही प्रकारचा त्रास होऊ नये, यासाठी त्याला मी नऊ महिने पाळणाघरात ठेवले. या काळात मला त्याला पाहताही आले नाही, असा अनुभव भाग्यश्री बारटक्के यांनी सांगितला. नऊ महिन्यानंतर जेव्हा मी त्याच्यासमोर आले तेव्हा त्याने मला काही क्षण ओळखलेदेखील नाही, असेही त्या म्हणाल्या.

अतिदक्षता विभागात जेवढे रूग्ण दाखल होतात, त्यांना कित्येक दिवस आपल्या कुटुंबाला भेटता येत नाही. त्यामुळे ते मानसिकरीत्या खूप खचतात. अशा वेळी परिचारिका म्हणून नाही तर त्यांचे नातेवाईक म्हणून वावरावे लागते. त्यांना औषधोपचारासह मानसिक आधारही द्यावा लागतो. या सर्र्व परिचारिकांनी वर्षभर ते काम निष्ठेने केले.

करोनाच्या सुरुवातीच्या लाटेत काम करताना घाबरत होते. तेव्हा आपल्यामुळे कुटुंबाला त्रास व्हायला नको यासाठी सुरुवातीचे ५ ते ७ महिने रुग्णालयातील वसतिगृहात राहत होते. त्यावेळी कुटुंबाला भेटता येत नव्हते याचं दु:ख होत होते. मात्र आपणाला योद्धा म्हटले जात असल्याचा आनंद असायचा अशी प्रतिक्रिया नीता काळे यांनी दिली.

या विभागात काम करताना अनेकदा मनावर दगड ठेवून काम करावे लागते. एखादा रुग्ण बरा होईल अशा टप्प्यावर येत असतो आणि अचानक त्याची प्राणवायू पातळी कमी होत जाते. त्यानंतरची तगमग पाहताना अंगावर काटा येतो. स्वत:ला खंबीर ठेवून रुग्णांचे मनोबल वाढवणे आव्हानात्मक आहे – दीपा नायर, परिचारिका.

दिन विशेष…

फ्लॉरेन्स नाइटिंगेल (१८२०- १९१०) यांचा जन्मदिवस म्हणून १९६५ पासून १२ मे हा दिवस ‘जागतिक परिचारिका दिन’ म्हणून ओळखला जातो. १८५४ साली झालेल्या क्रिमियन युद्धात जखमी सैनिकांवर युद्धभूमीवर उतरून त्या औषधोपचार करीत. आधुनिक शुश्रूषा शास्त्राच्या संस्थापक म्हणून त्या ओळखल्या जातात.

दोन बहिणींना गमावल्यानंतरही…

रुग्णालयाच्या कोविड कक्षात कार्यरत असलेल्या गीता भांगरे यांच्या बहिणीला करोना झाला. भांगरे यांनी आपल्या रुग्णालयातच तिला दाखल केले. मात्र उपचार सुरू असतानाच तिचा मृत्यू झाला. करोनाच्या दुसऱ्या लाटेत त्यांच्या दुसऱ्या बहिणीचाही मृत्यू झाला. मात्र रुग्णसंख्या वाढत होती. प्रत्येक कर्मचारी या काळात रुग्णालयात असणे आवश्यक होते. त्यामुळे स्वत:च्या दु:खाला विसरून त्या रुग्णांना धीर देत होत्या.