जिल्ह्यात करोनाबाधित आढळण्याचे प्रमाण कमी; आठवडाभरात ४२३ जणांचा मृत्यू

ठाणे : राज्यभर लागू करण्यात आलेले निर्बंध आणि विविध उपाययोजनांमुळे ठाणे जिल्ह्यात गेल्या तीन आठवड्यांपासून नव्या करोनाबाधितांची संख्या घटू लागली आहे. जिल्ह्यात महिनाभरापूर्वी चार ते पाच हजार रुग्ण दररोज आढळून येत होते. मात्र, आता ही संख्या दीड हजारांपर्यंत खाली घसरली आहे. त्यामुळे दिलासा मिळत असला तरी, करोनामृत्यूंचे वाढते प्रमाण मात्र, आरोग्य व्यवस्थेपुढे नवे आव्हान उभे करत आहे. गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात ४२३ जणांच्या मृत्यूची नोंद झाली.

करोनावर उपचार घेणाऱ्या सरासरी ५० ते ६० जणांचा दररोज मृत्यू होत आहे. जिल्ह्यात रविवारपर्यंत ८ हजार ५०६ जणांचा करोनामुळे मृत्यू झालेला आहे. तर, आठवड्याभरात ४२३ जणांचा मृत्यू झालेला आहे. सर्वाधिक मृत्यू हे कल्याण-डोंबिवली, ठाणे, मीरा-भाईंदर आणि नवी मुंबई क्षेत्रातील आहेत. सहव्याधी आणि उपचारासाठी उशिराने दाखल झालेल्यांचा मृतांमध्ये सर्वाधिक समावेश असल्याची माहिती आरोग्य विभागातील अधिकाऱ्यांनी दिली.

राज्यात करोनाच्या रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसांपासून घटू लागली आहे. ठाणे जिल्ह्यातही रुग्णसंख्या घटत असल्याचे सकारात्मक चित्र आहे. जिल्ह्यात १० मे ते १६ मे या आठवड्याभरात ११ हजार १३४ करोनाबाधित आढळून आले. याची सरासरी केल्यास दिवसाला सरासरी १ हजार ५०० ते १ हजार ६०० रुग्ण आढळून येत आहे. सुमारे महिन्याभरापूर्वी हे प्रमाण आठवड्याला २५ ते ३० हजार इतके होते. टाळेबंदीमुळे नागरिकांचे बाहेर पडणे कमी झाल्याने संसर्गाचा धोका टळला आहे. तसेच चाचण्यांची संख्या वाढविल्याने एखादा रुग्ण आढळल्यास तो इतरांच्या संपर्कात येण्यापूर्वीच त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात येते. त्यामुळे बाधित रुग्णांचे प्रमाण कमी होत आहे. असे जिल्हा प्रशासनाकडून सांगितले जात आहे. असे असले तरी रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण अद्यापही कायम आहे. महिन्याभरापासून जिल्ह्यात दिवसाला सरासरी ६० ते ६५ जणांचा करोनामुळे मृत्यू होत आहे. १० ते १६ मे या कालावधीत ४२३ जणांच्या मृत्यूची नोंद आहे. सर्वाधिक मृत्यू हे कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्र, ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर शहरातील आहेत. करोनामुळे अतिबाधित होऊन रुग्णालयात उशिराने दाखल झालेल्या तसेच सहव्याधी असलेल्यांचे प्रमाण मृतांमध्ये अधिक आहे. कल्याण डोंबिवली क्षेत्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुमारे १८ ते २० जणांचा मृत्यू होत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत ८ हजार ५०६ करोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.

शहरात करोनाबाधित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर

ठाणे : शहरात करोनाबाधित रुग्णांवर उपचारांचा प्रभावी परिणाम होत असून करोनातून बरे होण्याचे प्रमाण ९५ टक्क्यांवर पोहोचले आहे. ठाणे शहरात आतापर्यंत १ लाख २० हजार ९७६ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती ठाणे महापालिका प्रशासनाने दिली.

ठाणे शहरात गेल्या काही दिवसांपासून दिवसाला सरासरी २५० ते ३५० रुग्ण आढळून येत आहे. त्यामुळे गेल्या महिन्याच्या तुलनेत शहरात करोना रुग्णसंख्या घसरत असल्याचे चित्र आहे. त्यातच शहरात रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. बाधित रुग्णांसाठी अलगीकरणाची यंत्रणा, योग्य उपचार पद्धती यांमुळे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. शहरात आतापर्यंत एकूण १ लाख २० हजार ९७६ करोनाबाधित रुग्ण बरे झाल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली.

सक्रिय रुग्णांच्या संख्येतही घट

जिल्ह्यात रविवारपर्यंत केवळ १८ हजार ४९८ करोनावर उपचार घेत होते. त्यामध्ये ठाणे, कल्याण डोंबिवली, नवी मुंबई, भिवंडी, उल्हासनगर, मीरा-भाईंदर या सहा महापालिका क्षेत्रांत १४ हजार १५ रुग्ण आहेत. तर बदलापूर आणि अंबरनाथ नगर परिषद क्षेत्रात १ हजार ५५५ आणि ग्रामीण क्षेत्रात २ हजार ९२८ सक्रिय रुग्ण आहेत.

जिल्ह्यात सहव्याधी असलेल्या रुग्णांच्या मृत्यूचे प्रमाण हे सुमारे ७० टक्के आहे. तर काही रुग्ण उपचारासाठी उशिराने दाखल झाल्याने त्यांचा मृत्यू होत आहे. – डॉ. गौरी राठोड, उपसंचालक, आरोग्य विभाग.