वसई : करोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येमुळे वसई-विरार शहरातील करोनाचा कहर अधिक गडद बनू लागला आहे. एप्रिल महिन्याची सुरुवात होताच रुग्णवाढीचा वेग तीन ते चारपटीने  वाढला आहे. सोमवारी वसईत ५१७ नवीन करोना रुग्णांची नोंद झाली असून अवघ्या पाच दिवसांत तब्बल १ हजार ९७८ नवीन करोनाचे रुग्ण आढळून आले आहेत, तर ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

वसई-विरार शहरात करोनाचा प्रादुर्भाव वेगाने पसरू लागला आहे. दिवसागणिक करोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने शहराची चिंता अधिक वाढू लागली आहे. मार्च महिन्यात दिवसाला सरासरी १०० रुग्ण आढळून येत होते. परंतु एप्रिल महिन्याची सुरुवात होताच दिवसाला सरासरी  ३०० ते ४०० रुग्ण आढळून येऊ  लागले आहेत. वसईत सोमवारी पालिकेच्या हद्दीत ५१७ नवीन रुग्ण आढळून तर ३ जणांचा मृत्यू झाला आहे.  दिवसभरात २०० रुग्ण करोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.

सध्या वसई-विरार शहरातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ३५ हजार १४९ झाली आहे. करोनामुक्तांची संख्या ३१ हजार १९ झाली आहे. आतापर्यंत ९२१ जणांचा बळी गेला आहे.  करोनाच्या द्सऱ्या लाटेत सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने उपचाराधीन रुग्णांच्या संख्येत वाढ होत असून ३ हजार २०९ झाली आहे.