पुरेसा साठा नसल्यामुळे गोंधळ होण्याची शक्यता

ठाणे : राज्य शासनाच्या आदेशानंतर ठाणे जिल्ह्यातील कल्याण-डोंबिवली महापालिका क्षेत्रासह ग्रामीण भागात मंगळवारपासून १८ ते ४४ या वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले आहे. तर जिल्ह्यातील अन्य महापालिका आणि नगरपालिका क्षेत्रात बुधवारपासून या वयोगटाचे लसीकरण सुरू होणार आहे. परंतु, जिल्ह्यामध्ये लशींचा पुरेसा साठा उपलब्ध होत नसल्यामुळे या वयोगटाची लसीकरण मोहीम किती प्रभावीपणे राबविली जाईल, याविषयी साशंकता आहे.

केंद्र शासनाच्या आदेशानुसार राज्यात १ मे पासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यात आले होते. पुरेसा लससाठा उपलब्ध होत नसल्याचे सांगत राज्य शासनाने अवघ्या दहा ते बारा दिवसांतच या वयोगटाचे लसीकरण स्थगित केले होते. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून ४४ च्या पुढील वयोगटाचे लसीकरण सुरू होते. या वयोगटातील जास्तीत जास्त नागरिकांचा पहिला डोस झाला आहे. तसेच खासगी रुग्णालयाच्या माध्यमातून गृहसंकुलांमध्ये लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. यामुळे जिल्ह्यातील लसीकरण केंद्रांवरील गर्दी कमी झाल्याचे गेल्या काही दिवसांपासून दिसून येत आहे. मात्र, आता बुधवारपासून ही गर्दी वाढण्याची शक्यता आहे.

केंद्र शासनाने १९ जूनपासून १८ ते ४४ वयोगटाचे मोफत लसीकरण करण्याचे आदेश राज्यांना दिले आहे. त्यानंतर, राज्य शासनाने लसीकरण केंद्रांवर गर्दी होऊ नये म्हणून १८ ते ४४ ऐवजी ३० ते ४४ वयोगटाचे लसीकरण करण्याचे आदेश दिले होते. त्याची अंमलबजावणी जिल्ह्यातील महापालिकांनी सुरू केली होती. परंतु, दोन दिवसांतच, राज्य शासनाने नवे आदेश काढत १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू करण्यास परवानगी दिली आहे. कल्याण-डोंबिवली शहरात आणि ठाणे ग्रामीण भागात १८ वर्षांवरील नागरिकांचे लसीकरण मंगळवारपासून सुरू करण्यात आले. कल्याण-डोंबिवली शहरात २२ केंद्रावर तर ठाणे ग्रामीण क्षेत्रामध्ये ७६ केंद्रावर पूर्वनोंदणी करून आणि ‘वॉक इन’ पद्धतीने लसीकरण मोहीम राबविण्यात येत आहे. तर, ठाणे, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या शहरांमध्ये बुधवारपासून १८ ते ४४ वयोगटाचे लसीकरण सुरू होणार असून त्याचे वेळापत्रक तयार करण्याचे काम पालिका प्रशासनाकडून सुरू होते. तर, भिवंडी महापालिकेने या वयोगटातील लसीकरणाबाबत अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाही.  शासनाचे आदेश प्राप्त झाल्यानंतर यासंदर्भात निर्णय घेण्यात येणार असल्याचे भिवंडी महापालिकेकडून सांगण्यात आले.

 

अपंगांसाठी विशेष मोहीम

अंबरनाथ शहरात एकूण ७५० अपंग नागरिक आहेत. या नागरिकांसाठी येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये विशेष लसीकरण मोहीम सुरू करण्यात येणार असल्याची माहिती अंबरनाथ नगरपालिकेकडून देण्यात आली आहे.