रुग्णालयातील कर्मचारी अटकेत

ठाणे : ठाणे महापालिकेच्या बाळकूम येथील ग्लोबल रुग्णालयातील मोबाइल चोरी प्रकरणी कापूरबावडी पोलिसांनी रुग्णालयातील आणखी एका कर्मचाऱ्याला अटक केली आहे. राहुल वराड्रा (२२) असे अटकेत असलेल्या आरोपीचे नाव असून त्याला पोलीस कोठडी मिळाल्याची माहिती कापूरबावडी पोलिसांनी दिली. काही दिवसांपूर्वीच अशाच प्रकारे मोबाइल चोरी प्रकरणी एका कर्मचाऱ्याला कापूरबावडी पोलिसांनी अटक केली होती. रुग्णांच्या साहित्यांची चोरी रुग्णालयातील कर्मचारीच करत असल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.

ठाण्यात राहणारा एक करोनाबाधित रुग्ण एप्रिल महिन्यात उपचारासाठी दाखल झाला होता. उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्याच्या नातेवाईकांनी त्याच्या साहित्याची तपासणी केली असता त्यामध्ये मोबाइल गहाळ झाल्याचे समोर आले. याप्रकरणी रुग्णाच्या नातेवाईकांनी रुग्णालय प्रशासनाकडे तक्रार दिली होती. तक्रारीनंतर रविवारी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे मोबाइलचे स्थळ तपासले असता एक व्यक्ती हा मोबाइल वापरत असल्याने निदर्शनास आले. पोलिसांनी त्या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याची चौकशी केली असता, त्याने हा मोबाईल रुग्णालयात काम करणाऱ्या राहुल वराड्रा याच्याकडून विकत घेतल्याचे समोर आले. त्यानंतर पोलिसांनी राहुलला ताब्यात घेतले. त्याची कसून चौकशी केली असता, त्याने गुन्ह््याची कबुली दिली.

याआधीही एकाला अटक

दोनच दिवसांपूर्वी कापूरबावडी पोलिसांनी रुग्णालयात काम करणाऱ्या दीपक सावंत (२९) यालाही अटक झाली होती. पोलिसांनी त्याच्याकडून दोन रुग्णांचे मोबाइल आणि सोन्याच्या दागिन्यांच्या चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे. रुग्णालयातील कर्मचारी चोरीचे प्रकार करू लागल्याने रुग्णालय प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.