भाईंदर : दोन रुग्णांच्या नामसाधम्र्यामुळे रक्तद्रवची गरज असलेल्या करोना रुग्णाऐवजी इतर उपचारासाठी आलेल्या रुग्णाला रक्तद्रव चढविण्यात आला. हा धक्कादायक प्रकार मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या पंडित भीमसेन जोशी या शासकीय रुग्णालयात घडला आहे.

महापालिकेच्या पंडित भीमसेन जोशी रुग्णालयात करोनाबाधित रुग्णांवर उपचार करण्यात येत आहेत. या रुग्णालयात ३० मार्च रोजी तुलसीराम पांड्या (वय ४८) हे करोनाबाधित असल्याने उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. दिवसेंदिवस त्यांची परिस्थिती खालावत गेल्याने ५ एप्रिल रोजी या रुग्णाला रक्तद्रव देण्याचा निर्णय डॉक्टरांनी घेतला. ६ एप्रिल रोजी त्यांच्या नातेवाईकांना रक्तद्रवची मागणी करण्यात आली. तुलसीराम पांड्या यांच्या भावाने ४० हजार रुपये खर्च करून रक्तद्रव मिळवून ते रुग्णालयात दिले. दरम्यान ६ एप्रिल रोजी याच रुग्णालयात तुलसीदास नावाचे दुसरे एक रुग्ण दाखल झाले. या रुग्णाचा करोना अहवाल प्रलंबित असताना तुलसीदास याला तुलसीराम समजून रक्तद्रव देण्यात आला, यामुळे या दोन्ही रुग्णांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे त्यांच्या  कुटुंबीयांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.

माझ्या भावाला रक्तद्रवची अवश्यकता असल्याची मागणी डॉक्टरांनी केली होती. आता या गोंधळामुळे १२ तासांपासून त्याला रक्तद्रव देण्यात आलेला नाही.  रुग्णाचे काही बरे वाईट झाले तर याला जबाबदार कोण? – रोहित पांड्या, तक्रारदार,  तुलसीरामचा भाऊ

रक्तद्रव चुकीच्या व्यक्तीला देण्यात आल्याची घटना घडली आहे. या संदर्भात संपूर्ण चौकशी करून कारवाई करण्यात येईल. रुग्णांना योग्य उपचार देण्याकडे भर आहे. -डॉ. तेजश्री सोनावणे,  मुख्य आरोग्य अधिकारी, पं. भीमसेन जोशी रुग्णालय