रुग्णवाढीच्या पार्श्वभूमी   वर ठाणे महापालिकेचा निर्णय

ठाणे : लक्षणे नसलेले आणि घरीच राहूनच उपचार घेत असलेले करोना रुग्ण ओळखता यावेत तसेच या रुग्णांच्या बेजबाबदारपणामुळे शहरात करोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी पालिका प्रशासनाने अशा रुग्णांच्या हातावर शिक्का मारण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाची प्रशासनाने गेल्या दोन दिवसांपासून अंमलबजावणी करण्यास सुरुवात केली आहे.

ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये गेल्या आठ दिवसांपासून दररोज १४० ते १७० च्या आसपास करोना रुग्ण आढळून येत आहेत. यापूर्वी शहरात दररोज ७० ते ८० रुग्ण आढळून येत होते. रुग्णसंख्येत अचानकपणे वाढ झाल्यामुळे महापालिका यंत्रणा दक्ष झाली असून करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. शहरामध्ये आढळून येणाऱ्या एकूण रुग्णांपैकी ८५ टक्के रुग्णांमध्ये कोणतीही लक्षणे नसतात. त्यामुळे ते शासनाच्या नियमानुसार घरीच उपचार घेतात. असे रुग्ण घराबाहेर पडले तर त्यांच्यामुळे संसर्ग वाढू शकतो. त्यामुळे अशा रुग्णांना ओळखता यावे यासाठी त्यांच्या हातावर शिक्के मारले जात होते. गेल्या महिन्यांमध्ये रुग्णसंख्या कमी झाल्याने ही पद्धत बंद करण्यात आली होती. परंतु शहरात आता रुग्ण वाढू लागल्यामुळे पालिका प्रशासनाने घरीच उपचार घेणाऱ्या रुग्णांच्या हातावर शिक्के मारण्यास सुरुवात केली आहे, अशी माहिती महापालिकेचे आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.

‘कारवाई होणारच’

ठाणे महापालिका क्षेत्रात आस्थापना सुरू ठेवण्यासाठी ठरवून देण्यात आलेली वेळ तसेच करोना नियमाचे पालन करावे. कुणालाही त्रास देण्याचा आमचा उद्देश नाही. मात्र, करोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आस्थापनांच्या मालकांनी हे नियम पाळणे गरजेचे आहे. या नियमांचे उल्लंघन होत असल्याचे आढळून आले तर संबंधितांवर कारवाई होणार असून त्यात कुणाचीही गय केली जाणार नाही, असे आयुक्तांनी स्पष्ट केले.