ठाणे : सुमारे आठवडाभरापूर्वीपर्यंत नियंत्रणात आलेल्या करोना विषाणूने ठाणे जिल्ह्याात वेगाने पसरायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवड्यातील पाच दिवसांत जिल्ह्याात २ हजार ४०१ नव्या करोनाबाधितांची नोंद झाली असून दिवसाला सरासरी ५०० रुग्ण आढळून येत आहेत. करोनाप्रसाराचे सर्वाधिक प्रमाण ठाणे, कल्याण, डोंबिवली या शहरांमध्ये असून हा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ठाणे जिल्ह्यात गेले दोन महिने करोनाच्या दैनंदिन रुग्णसंख्येत सातत्याने घट होत होती. तसेच रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले होते. परिणामी रुग्णालयांमध्ये उपलब्ध खाटांची संख्याही जास्त होती. मात्र, गेल्या आठवड्यात बुधवारपासून ठाणे जिल्ह्याातील नव्या करोनाबाधितांचा आकडा धडकी भरवू लागला आहे.

१७ ते २१ फेब्रुवारी या पाच दिवसांच्या कालावधीत २ हजार ४०१ नवे करोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून आले आहेत तर, ३० जणांचा मृत्यू झाला. ठाणे आणि कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील रुग्णांची संख्या वाढण्याचे प्रमाण सर्वाधिक आहे. ठाणे महापालिका हद्दीत पाच दिवसांत ७८६ रुग्ण आढळून आले आहेत, तर, कल्याण डोंबिवलीत ६९९ रुग्ण आढळून आले आहेत. त्यामुळे प्रशासन सावध झाले आहे. पोलिसांकडून दररोज रात्री गस्त घालण्यात येत आहे. तसेच नागरिकांना मुखपट्टी वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीच्या ठिकाणी कारवाईही तीव्र करण्यात आली आहे.