सप्टेंबर महिन्यात दहा हजारांहून अधिक रुग्ण

ठाणे : करोना नियंत्रणासाठी महापालिका स्तरावर वेगवेगळे उपाय आखले जात असले तरी सप्टेंबर महिन्यात शहरात १० हजार ८३२ नव्या रुग्णांची भर पडली आहे. गेल्या महिनाभरापासून शहरात पाच हजारांहून अधिक चाचण्या केल्या जात आहेत.

महापालिका क्षेत्रामध्ये आतापर्यंत आढळून आलेल्या एकूण ३६ हजार ७७१ पैकी दहा हजारांहून अधिक बाधित सप्टेंबर महिन्यात सापडल्याने प्रशासनापुढील  चिंता वाढली आहे. याशिवाय याच महिन्यात एकूण ९९५ पैकी १५६ जणांचा मृत्यूही झाल्याचे पुढे आले आहे. ठाणे महापालिका क्षेत्रामध्ये सध्या ३ हजार ६५९ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. तसेच आतापर्यंत ९९५ जणांचा मृत्यू झाला आहे. आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी जून महिन्याच्या अखेरीस पालिकेची सूत्रे हाती घेतली आणि त्यानंतर शहरात करोनाचा वाढलेला प्रादुर्भाव रोखण्यावर विशेष भर दिला. त्यासाठी विविध उपाययोजना केल्या. त्याचा परिणाम ऑगस्ट महिन्यात दिसू लागला होता. जुलै महिन्यात दररोज सरासरी चारशे ते पाचशे रुग्ण आढळून येत होते, तर ऑगस्ट महिन्यात दररोज सरासरी दोनशेच्या आसपास रुग्ण आढळून येत होते. त्यामुळे ऑगस्ट महिनाअखेर शहरात करोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यात प्रशासनाला यश आल्याचे चित्र होते. असे असतानाच सप्टेंबर महिन्यात शहरात पुन्हा रुग्णसंख्या वाढू लागली असून दररोज ससरासरी चारशेच्या आसपास रुग्ण आढळून येत आहेत.

  • २५ हजार ९०९ – ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत एकूण करोनाबाधित
  • ३६ हजार ७७१ – सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत एकूण करोनाबाधित
  • ८३९ – ऑगस्ट महिनाअखेरपर्यंत एकूण मृत्यू
  • ९९५ – सप्टेंबर महिनाअखेरपर्यंत एकूण मृत्यू
  • १० हजार ८६२ – सप्टेंबरमधील करोनाबाधित
  • १५६ – सप्टेंबर महिन्यात मृत्यू

ठाणे महापालिका क्षेत्रात करोना चाचण्यांची संख्या वाढवण्यात आली असून सप्टेंबर महिन्यामध्ये दररोज पाच हजारांच्या आसपास चाचण्या केल्या जात होत्या. त्यामुळे रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून येत आहे. शहरातील करोनाबाधित रुग्णांचा तात्काळ शोध घेऊन त्यांचे प्राण वाचविता यावेत आणि शहरातील करोनाची साखळी तुटावी यासाठी चाचण्यांची संख्या वाढविण्यावर भर देण्यात येत आहे.

– डॉ. विपीन शर्मा, आयुक्त, ठाणे महापालिका