करोनाची लागण झालेल्या पोलिसांचे मुर्त्यूसत्र अद्याप सुरूच असून बुधवारी मिरा-भाईंदरमधील कशीमिरा वाहतूक विभागाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल पवार यांचे निधन झाले. त्यांच्यावर अंधेरी येथील सेवन हिल्स रुग्णालयात उपचार सुरु होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि वृद्ध आई असा परिवार आहे.

अनिल पवार (वय ५६) यांना आठ दिवसापूर्वी करोनाची लागण झाल्याचे समोर आल्यानंतर त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतू, तीन दिवसांपूर्वी त्यांची प्रकृती आणखी खालावली होती, दरम्यान उपचार सुरु असताना बुधवारी त्यांनी शेवटचा श्वास घेतला. त्यांच्या निधनामुळे मिरा भाईंदर शहरात शोककळा पसरली आहे. अत्यंत शिस्तबद्ध आणि कडक पोलीस अधिकारी म्हणून त्याची ओळख होती. करोनाविरुद्ध लढा देण्याकरीता आपल्या सहकाऱ्यांना सकारात्मक मार्गदर्शन करणाऱ्या अधिकाऱ्याचे निधन झाल्यामुळे वाहतूक पोलिसांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अकरा महिन्यांपूर्वी अनिल पवार यांची कशीमिरा वाहतूक विभागाच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकपदी निवड करण्यात आली होती. तसेच त्यांच्या सेवा निवृत्तीचे अवघे दोनच वर्ष शिल्लक राहिले होते. दरम्यान, त्यांच्या पत्नीला देखील करोनाची लागण झाली असून अंधेरी येथील सेवन हिल्स रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.