सध्या जगभरात करोना व्हायरसचा फैलाव होत असल्याने लोकांमध्ये भीतीचं वातावरण असून आपल्यालाही त्याची लागण होऊ नये यासाठी पूर्वकाळजी घेतली जात आहे. भारतातही करोना व्हायरसने शिरकाव केला असल्याने भीतीचं वातावरण आहे. आतापर्यंत ३९ जणांना करोनाची लागण झाली आहे. लोकांना सार्वजनिक ठिकाणी गर्दी न करण्याचा तसंच मास्क वापरण्याचा सल्ला दिला जात आहे. पण भिवंडीत वापरलेले मास्क धुवून पुन्हा विकण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, इम्रान शेख नावाची व्यक्ती विदेशातून आणलेले मास्क धुवून विक्री करण्याचा प्रयत्न करत होता. वळ ग्रामपंचायतींचे ग्रामसेवक अमोल कदम यांच्या तक्रारीनंतर इम्रान शेखविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांकडून देण्यात आलेल्या आदेशानंतर रविवारी रात्री उशिरा हे मास्क नष्ट करण्याची प्रक्रिया सुरु करण्यात आली.

भिवंडीत परदेशातून आलेल्या भंगारात मास्कची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. करोना व्हायरसमुळे मास्कला असलेली मागणी लक्षात घेता इम्रान शेख हे मास्क धुवून विकण्याचा प्रयत्न करत होता. पण याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्याने त्याचा भांडाफोड झाला. यानंतर आरोग्य विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असता पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न झाल्याचं निदर्शनास आलं. यानंतर पोलिसांकडे तक्रार देत मास्क नष्ट करण्याचे आदेश देण्यात आले.