|| मिल्टन सौदिया

आर्चबिशप यांच्याकडून नागरिकांना वैयक्तिक प्रार्थनेवर भर देण्याचे आवाहन

वसई : करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी वसईतील सर्व चर्चमधील मुख्य मिस्साविधी व्यतिरिक्त इतर सर्व प्रार्थनाविधी अनिश्चित काळाकरिता स्थगित करण्यात आले आहेत. लोकांना प्रार्थनेसाठी चर्चमध्ये येण्याचे आवाहन न करता त्यांनी वैयक्तिक तथा कौटुंबिक प्रार्थनेवर अधिकाधिक भर द्यावा, यासाठी प्रबोधन करण्याच्या सूचना वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी सर्व ख्रिस्ती धर्मगुरूंना दिल्या आहेत.

नायगावजवळील पालीपासून वसई-विरारसह मोखाडा, डहाणू, तलासरीपर्यंत पसरलेल्या वसई धर्मप्रांतात पालघर, विक्रमगड, वाडा, भिवंडी, शहापूर या परिसराचाही समावेश होतो. याठिकाणी एकूण ५२ चर्च आहेत. बहुतेक चर्चमध्ये नियमितपणे रोज सकाळी दोन आणि संध्याकाळी एक अशा तीन मिस्साविधी होतात. याव्यतिरिक्त विविध नोव्हेना प्रार्थना तसेच ठरावीक दिवशी विशिष्ट संताला वाहिलेली प्रार्थना होते.

सध्या ख्रिस्ती धर्मीयांचा उपवासकाळ सुरू आहे. त्यामुळे दर रविवारी संध्याकाळी होणाऱ्या येशूच्या दु:खसहनाच्या प्रार्थनेसाठी चर्चमध्ये लोकांची तुडुंब गर्दी होते. करोनाचा प्रसार रोखण्यासाठी गर्दीवर नियंत्रण यावे यासाठी वसई धर्मप्रांताचे आर्चबिशप डॉ. फेलिक्स मच्याडो यांनी या संदर्भात पत्रक जारी करून चर्चमधील मुख्य मिस्साविधी व्यतिरिक्त ज्या अन्य प्रार्थना होतात, त्या अनिश्चित काळासाठी स्थगित केल्या आहेत.

चर्चमधील नियमित मिस्साविधी तथा उपवासकालीन मिस्साविधी पुरेशी दक्षता घेऊन सुरू राहतील. मात्र, यासाठी लोकांनी स्वखुशीने यायचे आहे. लोकांनी चर्चमध्ये यावे यासाठी कोणत्याही प्रकारे सक्ती किंवा आवाहन न करण्याच्या सूचना आर्चबिशपांनी सर्व चर्चच्या धर्मगुरूंना निर्गमित केल्या आहेत.

जागरण प्रार्थना, उपवासकालीन रिट्रिट, क्रुसाच्या वाटेची भक्ती, पापनिवेदन साक्रामेंत निवेदन, दैवी दयेच्या नोव्हेनासह सर्व प्रकारच्या नोव्हेना प्रार्थना यांसह धर्मग्राम पाळकीय मंडळ, संडेस्कूल, आल्तार सेवा संघ, युवा संघटना, सेंट विन्सेंट डी पॉल, सोडॅलिटी, उपासना समिती, वाचक संघ, पवित्र ख्रिस्त शरीराचे असाधारण प्रसेवक, पवित्र आत्म्याचा संघ यांच्या सर्व सभा तसेच विवाह मार्गदर्शन शिबीर, ईशज्ञान वर्ग, श्रद्धाबांधणी वर्ग, युवदर्शनचे सर्व कार्यक्रम आणि गुडशेफर्ड कम्युनिटी व ‘कॅरिझमॅटिक रिन्यूअल’तर्फे आयोजित केलेले कार्यक्रम पुढील सूचना येईपर्यंत रद्द असतील.

व्याख्यानमाला रद्द

चर्चच्या आवाहनाला प्रतिसाद देत वसईतील विविध सामाजिक संघटनांनी त्यांचे रक्तदान तथा अन्य उपक्रम रद्द केले आहेत. अनेक संघटनांतर्फे उपवासकालीन प्रबोधनपर व्याख्यानमाला आयोजित केल्या होत्या. या व्याख्यानमालांची काही सत्रे संपन्नही झाली होती. मात्र, आर्चबिशपांच्या आवाहनानंतर उर्वरित सत्रे रद्द करण्यात आली आहेत.

पालघरचे जिल्हाधिकारी यांचे परित्रपक तथा मुंबईचे आर्चबिशप यांच्या सतत संपर्कात राहून सांप्रत स्थितीचा परामर्श घेण्यासाठी वसई धर्मप्रांतातील धर्मगुरूंची सभा बोलावली होती. त्यानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे.’’

-डॉ. फेलिक्स मच्याडो, आर्चबिशप, वसई धर्मप्रांत