आठवडाभर बाजार बंद असल्याने खरेदीसाठी ग्राहकांची गर्दी; पुरवठा घटल्याने दरांत वाढ

मुंबई/ठाणे :  करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठी वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती ३१ मार्चपर्यंत बंद करण्याच्या निर्णयाचा विपरित परिणाम मंगळवारी मुंबई, ठाण्यासह आसपासच्या शहरांत पाहायला मिळाला. बुधवारपासून भाजी न मिळण्याची शक्यता गृहीत धरून भाज्यांच्या दुकानांत ग्राहकांची गर्दी उसळली. प्रत्येक ग्राहक दहा दिवसांपेक्षा अधिक दिवस पुरेल इतकी भाजी खरेदी करत असल्याचे दिसून आले. दुसरीकडे, मागणीपेक्षा भाजीपाल्याची आवक कमी झाल्याने सर्वच भाज्यांचे दर वाढले. मात्र, असे असले तरी, नागरिक निमूटपणे भाजी खरेदी करतच होते.

मुंबई, ठाण्यासह महामुंबई क्षेत्राला होणारा भाजीपुरवठा प्रामुख्याने  वाशी एपीएमसीतील घाऊक भाजीबाजारातून होतो. मात्र, करोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेऊन एपीएमसीतील व्यापाऱ्यांनी बुधवारपासून ३१ मार्चपर्यंत बाजारसमिती बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. या काळात एपीएमसीमध्ये कोणतीही भाजीमालाची आवक होणार नाही. या गोष्टीची पूर्वकल्पना देण्यात आल्याने मंगळवारी सकाळपासूनच किरकोळ भाजीदुकानांत ग्राहकांची गर्दी उसळली होती.

दक्षिण मुंबईमधील ग्रॅन्ट रोडच्या भाजी गल्लीमध्ये तर अनेक नागरिक आपल्या खासगी वाहनाने दाखल झाले होते. रस्त्यावर वाट्टेल तशी वाहने उभी करुन ही मंडळी भाजी गल्लीतील गर्दीत दाखल होत होते. भाजी गल्लीमध्ये मुंगीलाही पाय ठेवायला जागा नव्हती. मुळातच अरुंद असलेल्या या गल्लीत भाजी खरेदीसाठी रांगा लावाव्या लावण्यात आल्या होत्या. या गर्दीमुळे तेथे तैनात पोलिसांचा चिंतेचा विषय बनली होती. मात्र त्यांना बघ्याची भूमिका घ्यावी लागली. हेच चित्र ठाणे, नवी मुंबई या शहरांतही दिसून आले. बोरिवलीतील भाजी बाजारात ग्राहकांची इतकी गर्दी होती की, अनेक ठिकाणी पोलिसांना जमावाला पांगवण्यासाठी लाठीमार करावा लागला.

पुढील दहा दिवस भाजीबाजार बंद राहिल्यास भाजी मिळणार नाही, या भीतीने जो तो जास्तीत जास्त भाज्या खरेदी करण्याकडे भर देत होता. त्या तुलनेत एकूणच मुंबई परिसरात भाजीची आवक कमी होती. नेहमीच्या तुलनेत भाजीपाल्याची आवक लक्षणीयरित्या कमी असल्याने किरकोळ बाजारात भाज्यांच्या दरात १० ते ८० रुपये इतकी वाढ झाली. असे असले तरी, अनेक नागरिक जवळपास पाचशे ते आठशे रुपये इतक्या किमतीची भाजी खरेदी करून जात होते, अशी माहिती दुकानदारांनी दिली.

वाशी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत पुणे, नाशिक, सोलापूर अशा विविध जिल्ह्य़ातून भाज्यांची आवक होत असते. परंतु या भागातून भाज्यांची आवक ९० टक्क्य़ांनी घटली असून त्यामुळे भाज्यांच्या दरात वाढ झाल्याचे वाशी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या भाजी विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. तर, अनेक ठिकाणी पोलिसांनी किरकोळ विक्रेत्यांच्या भाजीच्या गाडय़ा अडवून धरल्याने ठाणे येथील मंडईतून भाजी खरेदी करावी लागली व परिणामी दरांत वाढ झाली, असा दावा ठाण्यातील एका विक्रेत्याने केला.

कांदे बटाटे महागले

भाज्यांसह कांदे बटाटय़ांच्या किंमतीतही १०  ते २० रुपयांनी वाढ झाली आहे. पूर्वी किरकोळ बाजारात ५० रुपये किलो दराने विकले जाणारे कांदे सद्यस्थितीत ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत. तर, ४० रुपये किलो दराने विकले जाणारे बटाटे सद्यस्थितीत ६० रुपये किलो दराने विकले जात आहेत.

खराब भाजीचाही खप

नवी मुंबई : करोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचा काही किरकोळ विक्रेत्यांनी गैरफायदा घेतल्याचेही दिसून आले. वाशी एपीएमसीच्या भाजी मंडईत खराब म्हणून फेकून देण्यात आलेल्या भाज्या गोळा करून त्यांची विक्री करण्यात येत असल्याचे दिसून आले.

रस्त्यांवर शुकशुकाट

रविवारच्या संचारबंदीनंतर सोमवारी मुंबईच्या अनेक भागातून नागरिक बाहेर पडू लागल्याने अनेक ठिकाणी वाहतूक कोंडीची समस्या निर्माण झाली होती. याच तत्काळ शासनाकडून घेण्यात आल्याने मंगळवारी अनेक रस्त्यांवर शुकशुकाट पहायला मिळाला. तर पोलिसांनी देखील रस्त्यांवर गस्त वाढवल्याने कोणीही घराबाहेर निघाले नाही.

बेकऱ्या बंद

संचारबंदीच्या काळात जीवनावश्यक वस्तूंची दुकाने आणि बेकऱ्या उघडय़ा राहतील, असे स्पष्ट करण्यात आले होते. मात्र मंगळवारी बहुसंख्या बेकऱ्या बंदच होत्या. त्यामुळे खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनाा माघारी परतावे लागले.

किराणा दुकानांबाहेरही रांगा

मुंबई : संचारबंदी लागू झाल्यानंतर मंगळवारी प्असंख्य मुंबईकरांनी किरकोळ बाजारपेठांमध्ये धाव घेतली आणि भाजीपाला-फळांच्या खरेदीसाठी एकच झुंबड उडाली. यावेळी पोलिसांनी मात्र बघ्याची भूमिका घेतली होती. ३१ मार्चनंतर देखील ही संचारबंदी कायम राहण्याची भीती काही नागरिकांना आहे. त्यामुळे अन्न धान्याचा तुटवडा होण्याची शक्यता असल्याने अनेकजण संपूर्ण महिनाभराचे सामान दुकानातून खरेदी करत आहेत. मुंबईच्या अनेक भागात सोमवार पासून ही परिस्थिती पहायला मिळत आहे. काही ठिकाणी मात्र ग्राहक तीन ते चार फुटाचे अंतर ठेवून रांगामध्ये उभे राहत होते.